‘पदव्युत्तर वैद्यकीय’चा आणखी घोळच ; विध्यार्थी पुन्हा उच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • प्रक्रिया रद्द करण्यासाठी १७ विद्यार्थी उच्च न्यायालयात
  • खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेले आरक्षणही रद्द

मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणामुळे निर्माण झालेला घोळ अद्याप संपलेला नाही. मराठा आणि सवर्ण आरक्षण रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर राबवण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीची याचिका १७ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

सवर्ण आरक्षण रद्द झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्यात आली असून, मंगळवारी शेवटचा दिवस असतानाच ही याचिका दाखल झाली. त्यामुळे आता शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने हा प्रश्‍न सोडवला. त्यानंतर न्यायालयाने खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेले आरक्षणही रद्द केले.

या ११६ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्यासाठी ४ जूनपर्यंत प्रक्रिया राबवण्याची मुभा दिली. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया ९५ टक्के पूर्ण झाली असून, मंगळवारी १०० टक्के प्रवेश होतील. तथापि, १७ विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवण्याची मागणी याचिकेद्वारे केल्यामुळे नवा पेच निर्माण झाला.

याचिका दाखल करणाऱ्या या १७ विद्यार्थ्यांपैकी नऊ जणांनी निवड यादीत क्रमांक आला असूनही प्रवेश घेतले नाहीत. तीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन नंतर रद्द केले. चार विद्यार्थ्यांनी प्रवेश राखून ठेवला; तर एका विद्यार्थ्याने नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया विभागात प्रवेश घेतला आहे.  

झालेले प्रवेश
एकूण जागा : १४३६
एकूण प्रवेश : ११२४
राखून ठेवलेले : ७४६
पहिली फेरी : ३३०
दुसरी फेरी : ४००
पहिली ‘मॉप-अप’ फेरी : २६२
दुसरी ‘मॉप-अप’ फेरी : १३२

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News