जितकं प्रदुषणात झाल, तितकं हृदयाचे ठोके कमी होतील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 29 August 2019

स्वच्छ हवा असलेल्या परिसरापेक्षा सर्वाधिक प्रदूषित परिसरांतील लोकांमध्ये अँजिओप्लास्टी करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले

मुंबई : स्वच्छ हवा असलेल्या परिसरापेक्षा सर्वाधिक प्रदूषित परिसरांतील लोकांमध्ये अँजिओप्लास्टी करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. वर्षातील सर्वाधिक प्रदूषित काळ म्हणजेच हिवाळ्यात त्यात वाढ होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. वाढत्या वायुप्रदूषणाचा रक्ताभिसरण संस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे, मात्र विशिष्ट आजारांवर त्याचा कितपत प्रभाव पडतो, हे स्पष्ट झालेले नाही. क्राको येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील संशोधक डॉ. रफाल जनुस्झेक यांनी सांगितले की, स्वच्छ हवा असलेल्या भागातील रहिवासी प्रदूषणातील बदलाबाबत अधिक संवेदनशील असतात; तर अधिक प्रदूषित शहरांमधील रहिवासी अशा बदलांशी मिळते-जुळते घेऊ शकतात. 

पोलंडमधील पर्यावरण संरक्षण मुख्य निरीक्षक कार्यालयाने हवेतील धूलिकणांच्या (पार्टिक्‍युलेट मॅटर) 10 स्तरांबाबत प्रकाशित केलेल्या अहवालानुसार प्रदूषित नसलेली सहा आणि प्रदूषित पाच अशा 11 शहरांची अभ्यासासाठी निवड करण्यात आली. आकाराने 10 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असलेले हे कण (पीएम-10) लोखंड उद्योग, खाणी, गवताची कापणी, लाकूड व कोळसा भट्ट्या, वणवे, धुळीची वादळे आणि वाहनांतील उत्सर्जनातून हवेत मिसळतात. अभ्यासासाठी प्रदूषण नसलेल्या शहरांतून 5648 आणि प्रदूषित शहरांतून 10 हजार 239 रुग्णांची निवड करण्यात आली होती. 

हृदयविकाराचा धक्का (हार्ट अटॅक) आणि अस्थिर हृदयशूळ (अनस्टेबल अंजायना) या आजारांमुळे या रुग्णांच्या रक्तवाहिन्यांत निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी पीसीआय तंत्राद्वारे स्टेंट बसवण्यात आले. वर्षभरातील 52 आठवड्यांत रुग्णांवर करण्यात आलेले हे उपचार आणि त्या विशिष्ट दिवशी असलेली हवेची गुणवत्ता यांची सांगड घालण्यात आली. हिवाळ्यात वायुप्रदूषणात वाढ होत असल्याने हिवाळा आणि अन्य ऋतूंमधील आठवड्यांत आढळलेल्या हृदयरुग्णांबाबत तुलनात्मक विश्‍लेषणही करण्यात आले. 

प्रदूषणातील वाढीचा अँजिओप्लास्टीशी थेट संबंध 
पीएम-10 ची तीव्रता प्रदूषित नसलेल्या शहरांच्या (26.62 mg/m3) तुलनेत प्रदूषित शहरांमध्ये (50.95 mg/m3) अधिक असल्याचे वार्षिक अहवालातून दिसले. प्रदूषित व अप्रदूषित अशा दोन्ही शहरांत पीएम-10 च्या तीव्रतेमधील वाढ आणि अँजिओप्लास्टीमधील वाढ यांचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे डॉ. जनुस्झेक यांनी म्हटले आहे. 

 

प्रदूषित व प्रदूषित नसलेल्या शहरांत अँजिओप्लास्टीचे प्रमाण हिवाळ्याच्या तुलनेत अन्य ऋतूंमध्ये कमी असल्याचे आढळले आहे. हिवाळ्यात तापमानात वाढ करण्यासाठी होणाऱ्या इंधनाच्या वापरामुळे वाढलेले प्रदूषण आणि निर्माण होणारे धुरके यामुळे ही समस्या उद्‌भवत असल्याचे दिसत आहे. 
- डॉ. रफाल जनुस्झेक, संशोधक, क्राको विद्यापीठ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News