कोरोनावर जेवढा उपचार महत्त्वाचा तेवढचं गरजूंना अन्नधान्य 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 April 2020
  • जनता दल सेक्‍युलर पक्षाने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र 
     

मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीमुळे राज्यात आणि एकूणच देशात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला एक महिना होत आला तरी अनेक गरजू आणि गरीब समाज घटकांना अन्नधान्याचा पुरवठा होऊ शकलेला नसून त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप जनता दल सेक्‍युलर पक्षाने केला असून कोणताही भेदभाव न करता जो मागायला येईल, त्याला शिधावाटप दुकानातून अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

कोरोना साथीमुळे आजारी पडणाऱ्यांवर उपचार करणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच गरीब, गरजूंची उपासमार होणार नाही, याकडे लक्ष देणे आजच्या घडीला महत्त्वाचे आहे, असे पक्षाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

केंद्र सरकारने कोणतीही पूर्व कल्पना न देता अनपेक्षितपणे संचारबंदी लागू केली होती, त्यामुळे अनेक कुटुंबांना आवश्‍यक गोष्टींची खरेदी करून ठेवता आली नव्हती. मुळात देशात आणि राज्यातही हातातोंडावर पोट असलेले करोडो लोक आहेत, जे रोजच्या कमाईवरच जगत असतात. या लोकांना आगाऊ कळूनही, पैशाअभावी अन्नधान्याचा साठा करून ठेवणे शक्‍य नाही.

अर्थात राज्य सरकारने तातडीने पावले उचलत शिधावाटप दुकानातून गहू, तांदूळ आधी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या वर्गाला दिलासा मिळाला हे खरे आहे. त्यासाठी सरकारचे आम्ही आभारच मानतो मात्र, सध्याची स्थिति ही अपवादात्मक परिस्थिती आहे, त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने विचार करून चालणार नाही. सरकारने शिधावाटप दुकानातून धान्य देताना अगदी गरीब असलेल्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत तर दारिद्रय रेषेखाली येणाऱ्यांना प्राधान्यक्रमाच्या आधारे धान्य दिले आहे.

मुख्यमंत्री महोदय, प्राधान्यक्रमात येण्यासाठी ग्रामीण भागात 44 हजार तर शहरी भागात 59 हजार रुपयांच्या उत्पन्न मर्यादेची अट आहे. म्हणजे ग्रामीण भागात ज्याचे मासिक उत्पन्न पावणेचार-चार हजार रुपये आहे व शहरी भागात पाच हजार रुपये आहे, तो आज आपल्या योजनेनुसार धान्य मिळवण्यास अपात्र ठरला आहे. महिना ज्यांचे उत्पन्न चार ते पाच हजार रुपये आहे, ते आपल्या गाठीला पैसे राखून असतात, त्यामुळे ते रोजगार वा कामधंदा बंद असताना हा गाठीचा पैसा खर्च करून, आपला उदरनिर्वाह करू शकेल, असा आपला समज आहे का, असा सवाल जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, राष्ट्रीय महासचिव न्या. बी जी कोळसे पाटील, राज्याचे प्रधान महासचिव प्रताप होगाडे, पक्षाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ पी. डी जोशी पाटोदेकर, महासचिव अझमल खान, युवाध्यक्ष नाथा शेवाळे आदींनी केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News