मोदींची चीनलक्ष्यी रणनीती, काय असेल डाव ?

तुषार सोनवणे
Sunday, 9 June 2019
  • परराष्ट्रमंत्रीपदी एस. जयशंकर यांच्यासारख्या अनुभवी आणि हुशार माजी परराष्ट्र सचिवांची नियुक्ती
  • परराष्ट्र धोरणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत

परराष्ट्रमंत्रीपदी एस. जयशंकर यांच्यासारख्या अनुभवी आणि हुशार माजी परराष्ट्र सचिवांची नियुक्ती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण परराष्ट्र धोरणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत दिलेच आहेत. त्याचबरोबर मालदीव आणि श्रीलंका हे सार्कचे दोन सदस्य देश आपल्या पहिल्याच परराष्ट्र दौऱ्यासाठी निवडून त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय रणनीतीची चुणूकही दाखवली आहे. मोदींच्या या दौऱ्याचे महत्त्व काय, त्यामागील धोरण काय याविषयीचे हे टिपण..

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील शपथविधीसाठी ‘सार्क’ देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात पाकिस्तानचाही सामावेश होता. सार्क देशांशी द्विपक्षीय संबध मजबूत करण्याचा तो एक भाग होता; परंतु दहशतवादी घटनांनंतर भारताने पाकिस्तानशी अनेक विषयांवर फारकत घेतली. त्यामुळे मोदींच्या दुसऱ्या शपथविधीसाठी कोणाला आमंत्रित केले जाईल,  हा आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय बनला होता.

मोदी सरकारने ‘बिमस्टेक’ देशांना आमंत्रित केल्याने, भारत सार्कपेक्षा बिमस्टेक देशांना यापुढे जास्त महत्व देणार असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय राजकारणात गेला. असे असले, तरी सार्कमधीलही सर्वच देश भारतासाठी अधिक महत्वाचे आहेत. त्यामुळे मोदींच्या पहिल्या विदेश दौऱ्यात मालदीव आणि श्रीलंकेला पहिले प्राधान्य दिले हे स्पष्टच आहे. नवनियुक्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. सार्कमधील सर्वच देशांना (अर्थातच पाकिस्तान वगळता) जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा राजकिय मैत्रीपूर्ण संबंधांसाठी भारत महत्त्वाचा वाटावा, असा विश्वास त्यांच्यात निर्माण व्हायला हवा, ही सध्याच्या भारतीय परराष्ट्रीय धोरणाची गरज आहे.

मालदीवसारख्या हिंदी महासागरातील या छोट्याशा देशात पंतप्रधानाचा पहिला विदेश दौरा करण्यातइतपत महत्व काय? एकतर मालदीवचे सध्याचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह हे भारत-मालदिव द्विपक्षीय मैत्रीसंबधांचे खंदे समर्थक मानले जातात. मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर त्यांनी भारत आपला सर्वात जवळचा मित्र आहे असे म्हटले होते. मालदीवला भारताने प्रत्येक राजकीय, आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीत मदत केली आहे.

भारताच्या लेखी या देशाला महत्त्व असण्याचे आणखी एक कारण दडले आहे ते आशियातील सत्तास्पर्धेत. हिंदी महासागरावरील वर्चस्वाच्या स्पर्धेत हा देश महत्वाचा ठरतो. हिंदी महासागरावर भारताचे प्रभुत्व असल्याने ते चीनसारख्या देशांना रूचत नाही. त्यामुळे मालदीव, सेशल्स, मॉरिशससारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून या देशांच्या माध्यमातून हिंदी महासागरात आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा चीनचा डाव आहे.

चीनची मालदिवशी सलगी वाढली ती भारताला शह देण्याच्या हेतूने. या देशात चीनने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करून आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे तेथील प्रभावक्षेत्र वाढविणे हा मोदींच्या या दौ-याचा हेतू दिसतो. सार्क देशांना शपथविधीस आमंत्रित न केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणूनही मालदिव आणि श्रीलंका या देशांना सर्वप्रथम भेट देण्याचा पंतप्रधानांचा मानस असावा.

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर दक्षिण आशियातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्रीलंकेतील ही घटना संपूर्ण दक्षिण आशियायी क्षेत्रासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मोदींनीही आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यात श्रीलंकेला स्थान दिलेले दिसते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News