आधुनिक स्त्री
“यत्र नार्यः पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवतः।”
जेथे स्त्रीचा गौरव केला जातो, तिला सन्मानाने वागविले जाते, तेथे देवतेचे वास्तव्य असते. स्त्रीच्या केवळ अस्तित्वाने घराला 'घरपण' येते. खो म्हणजे करुणा, पावित्र्य आणि ममता यांचा संगम! कधी आई, कधी वहिनी, तर कधी बहीण अशा विविध रूपांत सहजतेने वावरणारी आजची स्त्री ही अत्यंत कार्यक्षम आहे.
आज स्त्रिया उच्च शिक्षण घेऊन, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरत आहेत. मात्र तरीही, कधी कधी स्त्री-पुरुष समानता मृगजळाप्रमाणे भासते. आज एकविसाव्या शतकातसुद्धा हुंडा पद्धती अस्तित्वात आहे. अजूनही पैशासाठी नवपरिणित सुनांचा छळ सुरूच आहे.
स्त्री-स्वातंत्र्याची कल्पना खेड्यापाड्यात फारशी रुजलेली नाही. स्त्रीला 'दासी' मानले जाते. तिचे शिक्षण अर्ध्यावरच बंद केले जाते. या जुन्या रूढी झुगारून, अन्यायाचा तुरुंग फोडून, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आजच्या स्त्रीने स्वातंत्र्याच्या अमर्याद आकाशात मुक्त विहार करायला शिकले पाहिजे!
'न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति' या उक्तीला खोटे ठरविले पाहिजे! फार पूर्वी स्त्रियांना 'अबला' मानले जात असे. त्यांना स्वातंत्र्य नव्हते; शिक्षणाचे दालन खुले नव्हते, 'चूल आणि मूल' एवढेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. अशा परिस्थितीत तत्कालीन समाजाचा रोष पत्करून 'महात्मा फुले यांनी शिक्षणाची गंगोत्री स्त्रियांपर्यंत पोहोचविली. त्यांच्या पत्नीने, सावित्रीने सनातन रूढी झुगारून शिक्षण घेतले. इतकेच नव्हे, तर समाजाचे शिव्याशाप, शेणगोळे असे सारे अपमान सहन करून मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य हाती घेतले.
महर्षि अण्णासाहेब कर्वे यांनी अथक परिश्रम घेऊन, विधवा विवाहास मान्यता प्राप्त करून दिली. स्त्री शिक्षणासाठी ते अहोरात्र झटले; कारण या सगळ्यांना ठाऊक होते की, 'एक पुरुष शिकला, तर तो एकटाच शहाणा होतो'; आणि 'एक स्त्री शिकली तर सारे कुटुंबच शहाणे होते!' म्हणूनच स्त्री शिक्षणाची गरज ओळखून महात्मा गांधी म्हणत, “एक माता शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे!"
आधुनिक काळातील कर्तृत्ववान स्त्रीला या सर्वच द्रष्ट्या महापुरुषांचा अभिमान वाटतो!भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान 'इंदिराजी' यांनी स्वकर्तृत्व सिद्ध करून दाखविले. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार', 'वीस सूत्री कार्यक्रम', 'बँकांचे राष्ट्रीयीकरण', 'अणुनिर्मिती' अशा अनेक गोष्टी त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या. 'बांगलादेश' युद्ध जिंकून सगळ्या जगालाच आश्चर्याचा धक्का दिला. अगदी शेवटीसुद्धा देशासाठी प्राणाची आहुती दिली. अखेरच्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या, "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक एक थेंब आहे, तोपर्यंत या देशाच्या एकतेसाठी मी लढत राहीन!"
भारताची सुवर्णकन्या 'पी टी उषा' ही सुद्धा आपली योग्यता खेळाच्या मैदानात वेळोवेळी सिद्ध करून दाखवीत आहे. 'मॅगसेसे पुरस्कार पटकाविणाऱ्या व कैद्यांच्या जीवनात माणुसकी निर्माण करून त्यांचे रूक्ष जीवन फुलविणाऱ्या 'किरण बेदी' केवळ अद्वितीय आहेत, तर आपले सारे आयुष्य असहाय्यांच्या सेवेला वाहिलेल्या जागतिक कीर्तीच्या सेवाभावी 'मदर तेरेसा' यांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे!
प्रत्येक शतकात स्त्री-रूपे बदलत आहेत. कधी ती पराक्रमी झाशीची राणी असू शकेल, कधी पतिव्रता सीता असू शकेल, कधी पतीचा शाप भोगणारी निरपराध अहिल्या असू शकेल, तर कधी यमाला अडवून, त्याला विनवणी करून पतीचे प्राण पुन्हा आणणारी सावित्री असू शकेल!
स्त्री ही भावनाप्रधान असू शकते; पण ती 'अबला' नाही. ती नवी आव्हाने कणखरपणे पेलू शकते आणि म्हणूनच,
जिच्या हाती पाळण्याची दोरी,
ती जगाते उद्धारी !
असा तिचा यथार्थ गौरव केला जातो.
- गौरव खळदकर
एसवाय, बीएससी संगणक शास्त्र, एच व्ही देसाई महाविद्यालय, पुणे