मोबाईल टेक्‍निशियनमध्ये करिअर संधी

मधुकर घायदार
Tuesday, 4 June 2019
  • मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे.
  • तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे.
  • दिवसेंदिवस मोबाईलमधील फीचर बदलत आहेत.

मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फीचर बदलत आहेत. भारतात मोबाईल सेवेची वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईलधारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय, तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत.

उत्पादन, जोडणी, वितरण, विक्रीपश्‍चात सेवा आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी व अखंड सुरू राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सध्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थांत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने, सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.

संगणकावर करता येणारी बरीचशी कामे आपण स्मार्टफोनवर करू शकतो. मोबाईल क्षेत्रात नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी आज उपलब्ध झाल्या आहेत. कुठलेही यंत्र असो, त्यात ठराविक कालावधीनंतर बारीकसारीक तक्रारी सुरू होतात. मोबाईलही याला अपवाद नाही. म्हणून आज मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण गरजेचे आहे. आजूबाजूला नजर टाकली असता, जितक्‍या प्रमाणात मोबाईलधारकांच्या संख्येत वाढ होत आहे तितक्‍या प्रमाणात मोबाईल दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ मात्र दिसत नाहीत. त्यामुळे मोबाईल दुरुस्ती आणि देखभाल या व्यवसायाला आजही मोठी मागणी आहे.

मोबाईलची माहिती व या यंत्रणेला समजून घेण्याची आवड असेल तर या अभ्यासक्रमात एक संधी दडलेली आहे. मोबाईल दुरुस्ती आणि देखभाल या नावाने अल्पमुदतीचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमात टचस्क्रीन, बॅटरी देखभाल, की-पॅड दुरुस्ती, स्पीकर, माइक दुरुस्ती, सॉफ्टवेअर, तसेच गेम लोडिंग कसे करायचे, हे शिकविले जाते. मोबाईल वापरत असताना भेडसावणाऱ्या समस्या जसे- चार्जिंग, अनलॉकिंग, डिस्प्ले, बॅटरी, की-पॅड, पॉवर ऑन-ऑफ, मोबाईलचे नादुरुस्त भाग बदलणे, दुरुस्ती करणे, असेंब्ली, डीअसेंब्ली यांसारख्या विविध समस्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

मोबाईल दुकानात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत अनेकांनी हे मोबाईल दुरुस्तीचे ज्ञान आत्मसात केले आहे. थेअरीपेक्षा प्रॅक्‍टिकल ज्ञानावर भर देत हे ज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे जात आहे. कौशल्य असलेल्या या व्यवसायात चांगली कमाई होत असल्याने अनेक तरुण याकडे वळत आहेत.मोबाईल रिपेअरिंग हा कोर्स केल्यानंतर तरुणांना अनेक मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरवर तंत्रज्ञ म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे. तरुण स्वतःचा व्यवसायदेखील करू शकतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News