राज्यातील लाखो शिक्षकांचा पेन्शनचा अधिकार हिरावण्यात येणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

राज्याच्या शिक्षण विभागाने खाजगी शाळांतील कर्मचारी विनिमयन कायद्यात सुधारणा करण्यासाठी नियमांचा मसुदा जारी केला आहे.

मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागाने खाजगी शाळांतील कर्मचारी विनिमयन कायद्यात सुधारणा करण्यासाठी नियमांचा मसुदा जारी केला आहे. या मसुद्यामध्ये अनुदानित शाळांची व्याख्या बदलली असून त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांचा पेन्शनचा अधिकार हिरावण्यात येणार असल्याचा आरोप शिक्षक भारतीने केला आहे. त्यामुळे या मसुद्याविरोधात शिक्षक भारती बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. यामध्ये राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले जाईल, असे शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी सांगितले.

शिक्षण विभागाने खाजगी शाळांतील कर्मचारी नियम 1981 मध्ये सुधारणा करण्यासाठी मसुदा तयार केला आहे. या मसुद्यावर हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. शिक्षण विभागाने तयार केलेल्या मसुद्यामध्ये अनुदानित शाळेची व्याख्या बदलली आहे. त्यानुसार, ज्या शाळेला सरकार किंवा एखाद्या प्राधिकरणाकडून पूर्णतः 100 टक्के अनुदान मिळते तीच शाळा अनुदानित, अशी नवी व्याख्या तयार केली आहे. या मसुद्यामधील प्रस्तावित बदलामुळे 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या ,परंतु 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या लाखो शिक्षकांचा पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. त्यामुळे या मसुद्याला शिक्षक भारतीने जोरदार विरोध करावयाचा निर्णय घेतला आहे. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, आमदार कपिल पाटील व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबतचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार 22 जुलै रोजी राज्यभरात शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे. तसेच शिक्षण विभागाच्या मसुद्याविरोधात राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी घरी बसून पोस्टरवर मागणी मांडून आंदोलन करणार आहेत.

सध्याच्या पद्धतीनेच अनुदान द्यावे
राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ अधिसूचना रद्द करावी व विनाअनुदानित शाळांना प्रचलित पद्धतीने अनुदान द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे यांनी सांगितले. तसेच, लाखो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शासनाच्या अधिसूचनेवर हरकत घेणार आहेत. हरकतीचे हजारो मेल शिक्षण सचिवांना पाठविण्यात येणार आहेत, तसेच पोस्टाद्वारेही हरकती शिक्षण सचिवांकडे पोहचवण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News