मेट्रोत 6 हजार कामगारांची आवश्यकता; तरुणांना मिळणार रोजगार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 June 2020
  • अकुशल कामगारांना  मोठी संधी

मुंबई : मेट्रो 3 या प्रकल्पामध्ये भुयारी स्थानके, बोगद्यामध्ये कुशल, अकुशल कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) पुढाकार घेतला असून कंत्राटदारांमार्फत राज्यातील कुशल, अकुशल कामगारांसाठी 5, 637 रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील आणि बार फिक्‍सिंग), वेल्डर, इतर (वायरमन) आणि अकुशल कामगार, रिगर, पाईप फिटर आणि क्रेन ऑपरेटर अशा नऊ विभागांत या जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

देशभरात लागू केलेल्या संचारबंदीमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे अनेक कामगारांनी आपापल्या राज्यात परतायला सुरुवात केली. परिणामी मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो प्रकल्पांसह विविध विकासकामांना ब्रेक लागण्यास सुरुवात झाली असून कंत्राटदारही चिंतेत आहेत. यामुळे एमएमआरसीतर्फे नऊ विभागांमध्ये एकूण 5,637 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये स्थापत्य कामांत भुयारी मेट्रो स्थानकामध्ये स्लॅब, कॉलम, कॉक्रिटीच्या भिंती, जिने व इतर कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लोखंडी सळीची बांधणी (फिटर्स), ढाच्याची बांधणी करण्यासाठी (कारपेंटर्स) तसेच कॉंक्रीट करण्यासाठी कुशल कामगारांची गरज आहे. खोदकाम, साफसफाई व इतर कामांसाठी अकुशल कामगारांची आवश्‍यकता भासणार आहे.

अकुशल कामगारांना देणार प्रशिक्षण

या जागांसाठी कामगारांनी एमएमआरसीतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांना संपर्क साधायचा आहे. तसेच आवश्‍यक अर्हता, अनुभव नसलेल्या अकुशल कामगारांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इच्छुक कामगारांनी नेमून दिलेल्या कंत्राटदारांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच श्रमिक छावण्या उभारत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

उपलब्ध जागा

गवंडी : 277
सुतारकाम : 804
फिटर (स्टील फिक्‍सिंग आणि बार फिक्‍सिंग) : 2038
वेल्डर : 163
इतर (वायरमन) : 59
अकुशल कामगार : 1877
रिगर : 312
पाईप फिटर : 58
क्रेन ऑपरेटर : 49

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News