राधिका दिवेकर यांना सोरायसिस असल्याचे निदान झाले आणि जणू त्यांचे आयुष्यच गोठून गेले. आजाराची लक्षणे गंभीर झाल्यानंतर त्यांना कुटुंबाकडूनही सहकार्य मिळेनासे झाले. आजार बळावला की पती आणि सासू तिला माहेरी पाठवत असत. सासरच्या मंडळींनी तिला शरीरावरून टोमणे मारण्यास सुरुवात केली आणि आपल्या ६ वर्षांच्या मुलाजवळ जाण्यासही बंदी आणली. सोरायसिसमुळे सहन कराव्या लागणाऱ्या असंख्य मानसिक तणावांमुळे आपण कधी बरेही होऊ शकतो, ही आशाच तिने सोडून दिली. यातून तिचे मानसिक आरोग्य बिघडले, कालांतराने तिला डिप्रेशनचाही त्रास होऊ लागला.
डॉ. शहनाझ आरसीवाला
सोरायसिस हा एक ऑटो-इम्युन स्वरूपाचा आजार आहे. यामध्ये त्वचेच्या नवीन पेशी सामान्य परिस्थितीच्या तुलनेत अधिक वेगाने विकसित होतात. आपले शरीर दर १० ते ३० दिवसांच्या चक्रामध्ये नवीन पेशी विकसित करते आणि या नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. सोरायसिसमध्ये नवीन पेशी ३ ते ४ दिवसांमध्येच विकसित होतात. त्यामुळे शरीराला जुन्या पेशी नाहीशा करण्यास पुरेसा वेळच मिळत नाही. मग या सगळ्या पेशी त्वचेच्या पृष्ठभागावर साचू लागतात आणि कोरडे, खाज सुटणारे, ढलप्यांसारखे दिसणारे, लालसर किंवा चंदेरी रंगाचे चट्टे त्वचेवर उठतात.
त्वचेवर परिणाम करणारा ऑटो-इम्युन आजार यापलीकडेही सोरायसिसचे परिणाम जाणवतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, या आजाराचे मानसिक व भावनिक परिणाम अधिक गंभीर आहेत. अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. सोरायसिसमुळे रुग्णांमध्ये मानसिक अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते. आम्ही असे अनेक रुग्ण पाहिले आहेत, ज्यांना या आजाराचा सामना करताना सगळ्यांपासून अलिप्त राहायचे असते. सामान्यतः सोरायसिसच्या दर १० पैकी ३ रुग्णांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसून येतात. विशेषत: त्यांना कुटुंब आणि सामाजिक व्यवस्थेचा पाठिंबा नसल्यास हे प्रमाण अधिक वाढते. मानसिक आधार असलेले रुग्ण उपचारांना चांगला प्रतिसाद देतात आणि प्रसंगी आजारातून त्यांची सुटकादेखील होते.
मुंबईतील सैफी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट डॉ. होझेफा भिंदरवाला म्हणाले, ‘आजवरच्या अनुभवानुसार सोरायसिसच्या १० पैकी ७ रुग्णांना सामान्य ते गंभीर स्वरूपाच्या डिप्रेशनचा त्रास असतो. मात्र, अस्वस्थता आणि तणाव अशी दोन्ही लक्षणे विचारात घेतली तर सोरायसिसच्या रुग्णांचा हा आकडा ९० टक्क्यांच्याही वर आहे. अस्वस्थता आणि डिप्रेशन हे दोन्ही त्रास सोरायसिसशी निगडित असले तरी ‘ऑबसेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर’ यासारखे इतर त्रासही सोरायसिससोबत होऊ शकतात. काही रुग्णांना सायकोसिसचाही (स्किझोफ्रेनिया आणि मॅनिया बायपोलार डिसऑर्डर) त्रास होतो.
तज्ज्ञांच्या मते, ऑबसेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर असणारे सोरायसिसचे रुग्ण स्वच्छतेचा काहीसा अतिसोस बाळगतात आणि पाण्याचा प्रचंड वापर करतात. यामुळे सोरायसिसचा त्रास वाढतच जातो. तर काही रुग्ण स्वत:च औषधे घेऊन स्वत:चे नुकसान करून घेतात आणि यात स्वत:च्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. सोरायसिसच्या संदर्भात सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगायला हवा. कारण, यातून फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यालाही धोका असतो. रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा सहभाग फार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच उपचार अधिक परिणामकारक होतात. औषधोपचार आणि सायकोथेरपीबरोबरच रुग्ण आणि कुटुंबाचे सायकोएज्युकेशन (मानसिक जनजागृती) याचा एकूण उपचारांमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे, रुग्णाने डर्माटॉलॉजिस्टसोबतच सायकिॲट्रिस्टचीही मदत घ्यायला हवी. प्रत्येक रुग्णाचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेऊन त्यानुसारच उपचारांची आखणी करायला हवी,’ असे डॉ. होझेफा म्हणाले.
त्यामुळेच, सोरायसिस आणि संबंधित नैराश्याचा सामना करणाऱ्यांनी त्यांच्या डर्माटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने सायकिॲट्रिस्टला भेटणे सयुक्तिक राहील.
( लेखक प्रिन्स अली खान हॉस्पिटल येथे डर्मटोलॉजिस्ट आहे.)