मानसिक स्वास्थ्य

डॉ. राजीव शारंगपाणी, क्रीडावैद्यक तज्ज्ञ
Monday, 3 June 2019

साऱ्या गोष्टींचा अभाव म्हणजेच मानसिक स्वास्थ्य नसणे. आजची सामाजिक स्थिती मनाचे समाधान घालविण्यासाठी पुरेशी आहे.

मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यापासून केवळ कृत्रिमरीत्याच वेगळे केले जाऊ शकते. समाधानी मन, स्थिर चित्त आणि बुद्धी तसेच, प्रेमळ अंतःकरण या गोष्टी असणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य असणे असे आपण म्हणू शकतो. अर्थातच या साऱ्या गोष्टींचा अभाव म्हणजेच मानसिक स्वास्थ्य नसणे. आजची सामाजिक स्थिती मनाचे समाधान घालविण्यासाठी पुरेशी आहे.

उदा. जाहिरातींचे संदेश आपले मन असमाधानी ठेवण्यास मोठाच हातभार लावत असतात. एखादी गोष्ट आपल्याकडे नाही, पण ती दुसऱ्याकडे आहे, अशा तुलनात्मक जाहिरातींमधून लोक बैचेन होतात. बुद्धी भ्रष्ट होणे आणि चित्त थाऱ्यावर नसणे या त्यापुढील पायऱ्या आहेत. असे लोक पुनःपुन्हा अनुभव येऊन देखील आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त अशा वस्तू आवश्‍यकता नसताना खरेदी करणे, लॉटरीची तिकिटे काढणे, हे करत राहतात.

अशा लोकांच्या अंतःकरणात प्रेम या भावनेचा मागमूसही उद्‌भवत नाही. वासनेलाच प्रेम असे समजण्याइतकी बुद्धी भ्रष्ट असल्याने मानसिक अस्वास्थ्य पूर्ण होते. याची भरपाई वेगवेगळी व्यसने करून केली जाते. त्यातून चित्त थाऱ्यावर नसल्याचे आणि बुद्धीदेखील भ्रष्ट झाल्याचे वारंवार सूचित होते. 

कौटुंबिक स्वास्थ्य हरपते आणि सामाजिक पत जाणे फार लांब नसते. आयुष्यात महत्त्वाकांक्षा ठेवणे हाही जगरहाटीतील आपल्या स्थानाविषयीच्या अवास्तव कल्पनेतून झालेला अहंकाराचा उद्रेक असतो, असे पक्के आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी ही क्षितिजे असतात. ती पाहायला फार मजेदार असतात. तिथे पोचण्याचा प्रयत्न केला की पुन्हा ती लांबवरच असतात, हे प्रत्येकाने अनुभवास येईपर्यंत करून पाहण्यासारखे आहे. मानसिक स्वास्थ्य हे उपचाराने मिळत असते तर किती बरे झाले असते? दुसऱ्यावर त्याची जबाबदारी टाकू शकत नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News