रजोनिवृत्तीसाठी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 May 2019

मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती हा बदल स्त्रियांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक असू शकतो. साधारणपणे वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी मासिक पाळी बंद होणे याला मेनोपॉज असे म्हणतात.

मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती हा बदल स्त्रियांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक असू शकतो. साधारणपणे वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी मासिक पाळी बंद होणे याला मेनोपॉज असे म्हणतात. भारतीय स्त्रियांचे रजोनिवृत्तीचे सरासरी वय सुमारे सत्तेचाळीस वर्षे आहे. रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रीकरिता एक वेगळा अनुभव असू शकतो.

इस्ट्रोजेन हॉर्मोन कमी झाल्यामुळे मूड बदलणे, डोकेदुखी, हॉट फ्लॅश किंवा अचानक खूप गरम वाटणे, रात्री घाम येणे, थकवा, अनिद्रा, वजन वाढणे, उदासीनता, चिडचिडपणा, योनीमार्गात कोरडेपणा आणि लैंगिक समस्या यासारखी काही लक्षणे दिसून येतात. तसेच रजोनिवृत्तीनंतर हृदयविकार आणि हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो. रजोनिवृत्ती एक नैसर्गिक बदल असल्याने त्यासाठी वैद्यकीय उपचारांची आवश्‍यकता नसते, पण दरम्यान स्त्रियांच्या मनोवैज्ञानिक, जैविक आणि भावनिक गरजांवर लक्ष देणे आवश्‍यक असते. त्यामुळे लक्षणे सुसह्य करणे आणि संभाव्य आजारांपासून बचाव करणे हे महत्त्वाचे ठरते. व्यायाम, योग्य आहार, स्वस्थ जीवनशैली आणि ताण कमी करणे हे रजोनिवृत्ती अधिक सुकर होण्यासाठी प्रभावी मार्ग आहेत.

योगाच्या अभ्यासाने हॉर्मोन्स संतुलित करण्यास मदत होते, वजन नियंत्रणात राहते, हॉट फ्लॅशेस कमी होतात, चिडचिडेपणा कमी करून मूड चांगला होण्यास मदत होते, शांत झोप लागते आणि  मानसिक तणाव कमी करून मनःस्थिती प्रसन्न राहते. रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या संभाव्य आजारांपासून बचावही करता येतो. अधोमुख श्वानासन, सुप्तबद्ध कोनासन, जानुशीर्षासन, पश्‍चिमोत्तानासन, शशांकासन या  आसनांमुळे मन शांत होते, मानसिक तणाव कमी होतो, पुनरुत्पादनाच्या अवयवांना चांगला रक्तपुरवठा होतो आणि त्यांचे कार्य सुधारते.

सेतुबंध सर्वांगासन केल्यास हॉर्मोन्सचे संतुलन होते तसेच चिंता, वारंवार मूड बदलणे कमी होऊन उत्साह वाढतो. हलासन थकवा, अस्वस्थता, चिंता आणि चिडचिडपणा आणि अनिद्रा दूर करते. विपरीत करणी आणि सर्वांगासन यासोबत शीतली प्राणायाम, आदिमुद्रा, यामुळे हॉट फ्लॅशेसचा त्रास कमी होऊ शकतो. अनुलोम विलोम,  चंद्रभेदन, भ्रामरी, शीतली प्राणायाम, ओंकारजप, ध्यान मन शांत करून मानसिक तणाव कमी करतात.

ज्ञानमुद्रा, योनीमुद्रा, योनीशून्य मुद्रा, प्राणमुद्रा मन शांत करतात, शरीरात वाढलेली उष्णता कमी करतात आणि शांत झोप लागते.  रजोनिवृत्ती म्हणजे जीवनातून निवृत्ती नव्हे तर एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. योगाभ्यासाने सकारात्मक दृष्टिकोन घेऊन या नवीन सुरुवातीचा आनंद घेता येऊ शकतो.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News