मी, आई आणि बाळ

नेहांकी अरविंद
Tuesday, 13 August 2019

जवळ घेता क्षणी मला चावण्याचा
प्रयत्न करतो अतोनात,
मोत्यांचे दाणेच ते जणू,
गुलाबी ओठांतुन लुकलुकणारे दोन दात.

आईची खरी किंमत उमजते,
जेव्हा एक मुलगी आई होते.
त्यादिवशी आईचा हात हातात घेऊन
आपसुकच पाणी डोळ्यातुन झिरपते.
            
त्या कठीण समयी पंचवीस वर्षाचा
माझा तुझ्यासोबतचा प्रवास
झरकन डोळ्यासमोरुन गेला.
आणि एक एक क्षणी तुझी माझ्यासाठी
 काढलेली कळ आठवून गेला.

मी एका जीवासाठी विव्हळत असताना
तु बाहेर दोन जीवांसाठी प्रार्थना करत होतीस.
रात्रीचे १२.३० वाजले पण त्या
रुमच्या बाहेरुन तु काही हलत नव्हतीस.
            
पंचवीस वर्षांची चिमुरडी मी,
तु किती फुलांच्या पाकळी सारखी सांभाळलीस.
काही मिनीटांच्या जीवाला घेऊन
तु किती आनंदाने नाचलीस.

डिंकाचा लाडू, तूप, मेथीच लाडू,
बाळाच्या शी-शू चा वास,
त्याच्या धुनीने घरहि तुडूंब भरलं
तुझी नोकरी सांभाळून तारेवरची
कसरत पाहून मन थोडं हादरलं.
            
तुपातल चिकन, नाचणी पापड,
वरण भात आणि त्यावर सोडलेल तूप.
सकाळी सकाळी पिण्यास गरम गरम सूप.

माहेरी राहण्याचा वेगळाच थाट,
आयते मिळे जेवणाचा ताट.
  माहेरची चटई जणू मखमलीचा खाट.
            
येवढ्या थकव्यातही चेह-यावरचं
हसू मिटू नाही दिल.
बाळाला पाहायला येणा-या
पाहुण्यांचही आदराने सगळ केलं.

तु त्या सहा महीन्यात मी व बाबू
अशी दोन बाळं सांभाळली.
सासरी येताच एका बाळाचं करता करता
माझी खूपच तारांबळ उडाली.

सहा महीने मी तुझ्याकडे
दुसरे बालपण जगून आले.
माझ्या घरी आल्यावर परत
मॊठे झाल्याची जाणीव झाली.

गेले ते आरामाचे दिवस,
पदरी बांधून आईचा समज,
एकटी सांभाळतेय बाळाला,
का रे रड्तॊय सोन्या,
नक्की काय हवय़ं तुला?

रात्रीचं जागरण, बदला ती लंगोट वारंवार.
खेळतोय किती रे सोन्या रात्रीचे वाजलेत चार. 
जांभयांच्या गर्देत रात्र ती संपली,
झोप ना रे बाळा थकलेय मी फार.

घडाळ्याचा काटा सहा वर येतो,
झोपेची देवी डोळ्यातुन पसार होते,
माझ्या बाळाच्या डोळ्यात विराजमान होते,
माझ्या सोन्याला निर्देत घेऊन जाते.

घडाळ्याच्या काटेवर कामे चालतात,
ही काटे आपल्याकडुन कामे आवरुन घेतात.
कामे आवरुन बसते मी जशी,
सोनुल्या तेव्हाच का करतो शु शु आणि शी शी.

डाळीची खिचडी, नाचणीचे सत्व,
माझ्या बाळाची नवीच तत्व.
रांगतो आता पूर्ण घर,
भिती माझ्या मनात पडला तर...

जवळ घेता क्षणी मला चावण्याचा
प्रयत्न करतो अतोनात,
मोत्यांचे दाणेच ते जणू,
गुलाबी ओठांतुन लुकलुकणारे दोन दात.

दिवसांमागुन दिवस जात आहे,
रोज आईपणांचे धडे शिकवत आहे.
एका एका दिवसांनी बाळ मोठं होतय,
आणि माझ्या मनाच्या कोप-यात वेडे मन
    आई आई करतय... आई आई करतय...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News