वैद्यकीय विद्यार्थ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील नवीन पदव्युत्तर डॉक्‍टरांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काहीच आठवड्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई:  महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील नवीन पदव्युत्तर डॉक्‍टरांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काहीच आठवड्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंता वाढली आहे. महापालिका अधिकारी आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्‍टर (मार्ड) यांनी याची दखल घेत कोरोनाचा संसर्ग कमी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

गेल्या दोन ते तीन आठवड्यांत सायन हॉस्पिटलमधील तीन, नायरच्या दोन आर केईएममधील एका विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून एमडी आणि एमएस पदवी घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश सुरू झाले आहे. सायन रुग्णालयात नवीन दाखल झालेल्यांपैकी तीन रेसिडेंट डॉक्‍टरांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सायन रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सांगितले. मार्चपासून रुग्णालयातील 300 हून अधिक आरोग्यसेवा कर्मचारी संक्रमित झाले होते. पण गेल्या दोन महिन्यांत ही संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यापुढे अधिक खबरदारी घेऊन, डॉक्‍टरांमधील संक्रमण कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे खुद्द डॉक्‍टरांनी ठरवले आहे. कुणालाही कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना खबरदारीचे उपाय सुचविले असून संरक्षक संसाधने देण्यात आली आहेत. तसेच, योग्य ते प्रशिक्षण दिले जात असल्याचे सायन रुग्णालय अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

नायर रुग्णालयात नवीन निवासी डॉक्‍टरांपैकी दोन डॉक्‍टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. मार्चपासून रुग्णालयात 80 डॉक्‍टरांना, यात 67 रहिवासी, 10 वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि तीन शिक्षक सदस्यांना बाधा झाली आहे. नवीन विद्यार्थी बरे झाल्यानंतर आम्ही त्यांना पीपीई किट सुरक्षितपणे परिधान करण्याचे आणि त्यांच्यासाठी स्वच्छता राखण्याची माहिती व्हिडीओ क्‍लिपद्वारे समजावून सांगितल्याचे मार्डच्या वतीने सांगण्यात आले.
केईएम रुग्णालयातील नवीन वैद्यकीय विद्यार्थ्यांपैकी एकाची पॉझिटिव्ह चाचणी झाली. केईएममध्ये येण्यापूर्वी निवासी डॉक्‍टर जेजे रुग्णालयात असल्याचे तेथील डॉक्‍टर सांगतात. त्यामुळे या वर्षी कोव्हिड आणि कोव्हिडपासून बचाव याकडे जास्त लक्ष देण्यात आले आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे डॉक्‍टरांनी आणि नागरिकांनी पालन करावे, असा सल्ला "मार्ड'कडून देण्यात आला आहे.

योद्‌ध्यांनी स्वत:चे रक्षण करणे गरजेचे
पीजी विद्यार्थ्यांची तिसऱ्या वर्षाची परीक्षा असल्याने ते सुटीवर आहेत. एमडी, एमएसच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कोविड ड्युटीवर पाठविण्यात आले नसल्याने अन्य डॉक्‍टरांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. सात दिवस काम आणि सात दिवस क्वारंटाईन असताना आम्ही दहा दिवस काम आणि पाच दिवस क्वारंटाईन होऊन काम केले असल्याचे डॉक्‍टर सांगतात.
कनिष्ठ डॉक्‍टरांसाठी त्यांच्या कारकीर्दीचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे साथीच्या महामारीत या योद्‌ध्यांनी स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे मार्डकडून सांगण्यात आले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News