वैद्यकीय साक्षरता महत्त्वाची..

नेत्वा धुरी
Monday, 1 April 2019

रुग्णांची व्यवस्थित तपासणी न करता रुग्णांना आजारपणाची भीती घालणे, थातुरमातुर औषधे देऊन रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तयार करणे आणि ताबडतोब शस्त्रक्रिया करणे, असा अनुभव कित्येक खासगी रुग्णालयांतील रुग्णांना येत आहे. रुग्णाच्या असाह्यतेचा फायदा घेतला जातो; मात्र असे होऊ नये म्हणून आपल्याला उपचारांबाबत मूलभूत माहिती असायला हवी. थोडक्‍यात वैद्यकीय साक्षरतेची गरज सध्या निर्माण झाली आहे.

रुग्णांची व्यवस्थित तपासणी न करता रुग्णांना आजारपणाची भीती घालणे, थातुरमातुर औषधे देऊन रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तयार करणे आणि ताबडतोब शस्त्रक्रिया करणे, असा अनुभव कित्येक खासगी रुग्णालयांतील रुग्णांना येत आहे. रुग्णाच्या असाह्यतेचा फायदा घेतला जातो; मात्र असे होऊ नये म्हणून आपल्याला उपचारांबाबत मूलभूत माहिती असायला हवी. थोडक्‍यात वैद्यकीय साक्षरतेची गरज सध्या निर्माण झाली आहे.

आजारपणात माणूस कशाला जास्त थकतो? आजारपणाला... सततच्या उपचारांना... खर्चाच्या आवाक्‍याला... अशी कितीतरी उत्तरं आपली ज्येष्ठ मंडळी देतील. हल्ली त्याहूनी भलता प्रकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची व्यवस्थित तपासणी न करता रुग्णांना आजारपणाची भीती घातली जाते. आपल्या आजाराबाबत कोणतीही माहिती नसलेले रुग्ण घाबरून जातात आणि शस्त्रक्रियेसाठी लगेच तयार होतात. रुग्णाला भीती घालून थेट त्यांना शस्त्रक्रियेला नेऊन जीवाशी खेळले जात असल्याचा भयावह अनुभव नुकत्याच माझ्या परिचयाच्या व्यक्तीने घेतला.

सकाळी उठल्यावर त्याच्या आईनं आज आपली शस्त्रक्रिया असून, तासाभरात डॉक्‍टर्स मला शस्त्रक्रियेसाठी नेणार असल्याचं सांगितलं. रुग्णालय हाकेच्या अंतरावर असल्यानं त्याची आई नवऱ्यासह शस्त्रक्रियेसाठी निघाली. आदल्या दिवशी रात्री सोनोग्राफीच्या अहवालात तिच्या दोन्ही किडन्यांत सहा खडे असल्याचे निदान झाले होते. ‘लगेच शस्त्रक्रिया करा नाहीतर जीवाशी काहीतरी घडेल’, या वाक्‍याचा त्याच्या आईनं चांगलाच धसका घेतला. घरात जाऊन पैशाची जुळवाजुळव करून दुसऱ्या दिवशी त्या रुग्णालयांत दाखल झाल्या. रात्रभर मनातल्या विचारांनी त्याची आई चांगलीच हैराण झाली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुगर थेट २४० वर पोहोचली; तर पुढील चार तासांत शुगर २८० वर पोहोचली होती. घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेण्यासाठी त्याची धावाधाव सुरूच होती. युरोलॉजिस्ट येताच त्यांनी रुग्णाला थेट शस्त्रक्रियेसाठी आत नेण्याचा सल्ला दिला. वाढलेली शुगर, फिटनेस सर्टीफिकेट याबाबत विचारणा करूनही युरोलॉजिस्टकडून काहीच उत्तर न आल्यामुळे त्याने थेट आईला रुग्णालयाबाहेरच काढलं.

कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला असलेले आजार, ते नियंत्रणात आणण्यासाठी दिले जाणारे औषधोपचार, शस्त्रक्रियेपूर्वी आवश्‍यक असणारे फिटनेस सर्टीफिकेट याबाबत कसल्याही हालचाली न करता शस्त्रक्रिया केली गेली तर रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं, एवढी मूलभूत माहिती त्याला होती. कदाचित त्याने युरोलॉजिस्टकडून जे काही चाललंय ते चालू द्यावं, असं केलं असतं तर कदाचित त्यानं आपल्या आईला गमावलं असतं. आपल्या जीवावर बेतलेल्या प्रकरणाचा त्याच्या आईनं चांगलाच धसका घेतला.

मूत्रमार्गातून रक्त जात असल्याची गेल्या सहा महिन्यांची त्याच्या आईची तक्रार संबंधित डॉक्‍टरांनी दुर्लक्षिली. दुखत नसेल तर काळजी करायची गरज नाही असं सांगत मूतखड्यांची पुसटशी कल्पनाही त्याच्या आईला डॉक्‍टरांनी दिली नाही. घरातल्यांना त्रास नको म्हणून अंगावर काढण्याची चांगलीच किंमत त्याच्या आईला मोजावी लागली. औषधोपचारांनी मूतखडे विरघळण्याची वेळ निघून गेल्यानं त्याच्या आईची शस्त्रक्रिया करावीच लागली. दुसऱ्या नामांकित रुग्णालयांत शस्त्रक्रिया करून सध्या त्याची आई आराम घेत आहे.

या घटनेचा दाखला हा वैद्यकीय साक्षरतेबाबतच्या गरजेसाठी नमूद करतेय. आपल्यावरील किंवा जवळच्यांवरील औषधोपचार, त्याबाबत असलेल्या शंका विचारणं, शस्त्रक्रियेपूर्वीच सेकंड ओपिनिअन जरुरीचं असल्याचं प्रत्येक डॉक्‍टर सांगतो. आपल्या रुग्णाला उपचारांची माहिती देताना योग्य उपचार केले जात नसतील, तर मग हरकती नोंदवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.

डॉक्‍टरांकडे उपचार घेण्यापूर्वी त्यांची प्रोफाईल आज सगळीच रुग्णालये आपापल्या संकेतस्थळावर उपलब्ध करतात. डॉक्‍टरांची माहिती देणारे असंख्य ॲप्लिकेशन्स, संबंधित डॉक्‍टरांच्या संघटनेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. त्यामुळे उपचारांची घाई, सेकंड ओपिनिअन न घेता होणारी घाई, मधुमेह, रक्तदाब, हायपरटेंशन आदी रुग्णांच्या उपचारांतील रिस्क फॅक्‍टर त्यावर डॉक्‍टरांकडे असलेल्या उपाययोजनांची खातरजमा करूनच उपचारांना सुरुवात करणं हा योग्य निर्णय राहतो. अन्यथा वर्षातील शस्त्रक्रियांचं पॅकेज रुग्णालयाला पुरवण्यासाठी टपलेल्या डॉक्‍टरांपासून सावध राहणं कठीणच...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News