भारतीय वैद्यकीय परिषदेने केला कोरोना संदर्भात 'हा' महत्वपूर्ण दावा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज 30 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

मुंबई : देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज 30 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील कोरोनाबाधित संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला असून देशात समूह संसर्गास सुरुवात झाल्याचा दावा भारतीय वैद्यकीय परिषदेने (आयएमए) केला आहे. यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे आयएमएचे चेअरमन डॉ. व्ही. के. मोंगा यांनी म्हटले आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरांसोबतच ग्रामीण भागांनाही कोरोनाचा विळखा पडत आहे. हे वाईट संकेत आहेत. त्यामुळे हा कोरोनाचा समूह संसर्ग असल्याचे आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सांगितले; मात्र अद्याप केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात समूह संसर्ग असल्याचे मान्य केलेले नाही. अनेक आरोग्यतज्ज्ञांनीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या दाव्याला आव्हान दिले आहे.

देशातील सद्यस्थिती
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक 38 हजार 902 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 543 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 लाख 77 हजार 618 वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत 26 हजार 816 जणांचा मृत्यू झाला आहे; तर 6 लाख 77 हजार 423 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 3 लाख 73 हजार 379 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाचे नवे हॉटस्पॉट
शहरांमधील रुग्णांची संख्या कमी होत असताना ग्रामीण भागांमध्ये आता परिस्थिती गंभीर होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचे नवे हॉटस्पॉट आढळू लागले आहेत, असे आयएमएतर्फे सांगण्यात आले. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्र सरकारची मदत घ्यावी, असे आवाहन डॉ. मोंगा यांनी केले. 70 टक्के लोकसंख्येला या विषाणूची लागण होऊन त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणे आणि इतर 30 टक्के लोकसंख्येला संसर्गापासून बचावासाठी प्रतिबंधक उपाय करणे, असे दोनच
पर्याय आता उरल्याचे त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News