अशी होती मौर्यकालीन वस्त्रपरंपरा...

विशाखा टिकले-पंडित
Tuesday, 26 February 2019

पूर्वीच्या काळात ज्या मूर्ती सापडल्या, त्यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते, की त्या वेळी स्त्रियांनी भरगच्च दागिने घालण्याची पद्धत रूढ होती.

एखाद्या पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिकेची निर्मिती करताना कथानकाप्रमाणे तो काळ जिवंत करणं हे खूप मोठं आव्हान असतं. ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ हा प्रकार अस्तित्वात असला, तरी त्या काळाच्या जवळपास जाणारं चित्र उभं करणं गरजेचं असतं. अशा कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात, तेव्हा त्याच्या मेकिंग स्टोरीज बनतात. या गोष्टी वाचताना जाणवतो त्यामागचा अभ्यास आणि त्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम. रामायण-महाभारतासारख्या भव्य मालिका बनल्या, तेव्हा तो काळ उभा करण्यासाठी किती मेहनत घेतली गेली असेल, याची कल्पना येते. 

या अभ्यासासाठी सर्वोत्तम स्रोत म्हणजे त्या काळातील साहित्य. साहित्यातून त्या कालखंडातील समाजजीवन उलगडत जातं. तसंच उत्खननाच्या माध्यमातून किंवा अचानक गवसलेल्या काही मूर्ती, शिलालेख, प्राचीन गुहांच्या मदतीने तो काळ समजून घेणं सोपं होतं. उदाहरणच द्यायचं झालं, तर बिहारमधील दीदारगंज परिसरात गंगा नदीच्या काठी सापडलेली यक्षीची मूर्ती. ही मूर्ती बनवण्यासाठी वापरला गेलेला दगड, मूर्तिकामाची शैली, त्यावरील चमक पाहता ही मूर्ती मौर्यकालीन असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला.

मौर्यकालातील समाजजीवन आणि एकंदरीतच वस्त्रप्रावरणं याची कल्पना यक्षी मूर्तीवरून येते. हडप्पा संस्कृतीतल्या मूर्तीप्रमाणेच या मूर्तीतल्या स्त्रीच्या हातात कोपरापर्यंत बांगड्या दिसतात. केस घट्ट बांधलेले असून कपाळावर छोट्या छोट्या माळांनी बनलेली बिंदीसदृश गोल आकारातील आभूषणं दिसतात. सिनेमातील गाण्यामध्ये आणि काही प्रदेशातील लग्न- समारंभांमध्ये आवर्जून दिसणारी बिंदी ही किती पूर्वीची फॅशन होती, हे या मूर्तीकडे पाहताना कळतं. गळ्यातल्या माळा, कर्णभूषणे; तसंच अधोवस्त्रावर पाच पदरी कंबरपट्टाही दिसतो. या मूर्तीतल्या स्त्रीने अधोवस्त्र म्हणजे कमरेच्या खाली साडी परिधान केलेली दिसते.

ही साडी नेसण्याची पद्धत अगदी महाभारत मालिकेपासून ते आजच्या अनेक पौराणिक मालिकांमध्येही आवर्जून पाहायला मिळते. कमरेभोवती मोठा सुती कपडा गुंडाळून साडीच्या निऱ्या काढतो त्याप्रमाणे निऱ्या काढून त्याचा एक भाग नऊवारी साडीप्रमाणे दोन्ही पायांमधून पाठीमागे खोचला जात असे. दीदारगंज इथं सापडलेल्या मूर्तीतल्या यक्षीने शरीराचा वरचा भाग झाकण्यासाठी कोणतेही वस्त्र धारण केलेले नसले, तरी तरीदेखील त्या काळात स्त्रिया शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी उत्तरिया म्हणजे स्कार्फसारखं लांब वस्त्र लपेटून घेत असतं. उत्तरिया हे कधीकधी एका खांद्यावरून; तर कधी दोन खांद्यांवरून घेतलं जात असे. त्या वेळचे कपडे हे मुख्यत्वे सुती आणि मलमलपासून बनवले जात असत. पुरुषदेखील अधोवस्त्र नेसत असत. पूर्वीच्या काळातील ज्या मूर्ती सापडल्या त्यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते, की त्या वेळी स्त्रियांनी भरगच्च दागिने घालण्याची पद्धत रूढ होती. 

पुढे चंद्रगुप्ताच्या म्हणजे गुप्त संस्कृतीत उत्तरिया, अंतरिया, अधोवस्त्रं वापरली जात असली, तरी शिवणकाम केलेले कपडे या काळात जास्त लोकप्रिय ठरले होते. याआधी एक संपूर्ण वस्त्र वेगवेगळ्या पद्धतीने शरीराभोवती गुंडाळले जात असे. पण गुप्त काळात शिवणकाम केलेले कपडे संपन्नतेचे लक्षण मानले जात असे. गुप्त काळात स्त्रिया घोळदार अंतरिया वापरायच्या, ज्याला अनेक चुण्या असायच्या. अंतरिया म्हणजे कमरेच्या खालचा भाग झाकणारं वस्त्र. हे अनेकदा साडीसारखं नुसतं लपेटून घेण्याचीही पद्धत होती. लांब हातांचे अंगरखे हे खास दरबारी आणि प्रतिष्ठित लोक वापरत असत. राजे-महाराजे हे रेशमी अंतरिया वापरत आणि अंतरिया घट्ट राहावा यासाठी त्यावर मोती जडवलेले खास पट्टे वापरले जात असत. त्याचबरोबर कायुरा (बाजूबंध), कुंडल (कानातले), किणकिणी (पैंजण), मेखला किंवा कटीसूत्र (कंबरपट्टा) यासारखे सोन्याचे दागिने त्या काळी वापरले जात असत. दागदागिन्यांसोबत वेगवेगळ्या केशभूषाही त्या वेळी केल्या जात असत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News