नातं टिकविण्यासाठी ‘मॅरेज कोचिंग’

शलाका सावंत
Friday, 28 June 2019

जोडीदाराशी प्रभावी संवाद कसा साधावा, नात्यातील समस्यांचं मूळ कारण कसं ओळखावं आणि नाते संबंधांतील समस्या सोडवण्यासाठी त्वरित कोणती उपाययोजना करावी याविषयी प्रसिद्ध समुपदेशक लीना परांजपे ‘मी, लग्न आणि...!’ या कार्यक्रमातून सांगणार आहेत. शनिवारी, २९ जून रोजी घंटाळी येथील सहयोग मंदिरमध्ये संध्याकाळी पाच ते सात या वेळेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ‘मॅरेज कोचिंग’विषयी... 

‘डे स्टीनेशन वेडिंग’, ‘बिग फॅंट ट्रेडिशनल वेडिंग’ असे बक्कळ पैसा खर्च करून रंगवलेल्या लग्न- सोहळ्याची स्वप्नं पाहणारी आजकालची तरुण पिढी. आपला जोडीदार निवडताना महिन्याला सहा आकडी पगार, आवडती व्यक्ती, घर-गाडी, आर्थिक स्थैर्य एवढ्या निकषांवर एकत्र येतात खरं; मात्र हे नातं टिकविण्यासाठी लागणारं ज्ञान नसल्याने नव्या पिढीला स्वत:चं लग्न टिकवण्यासाठी मात्र ‘मॅरेज कोच’चा आधार घ्यावा लागतोय. आपल्या आवडत्या प्रियकर-प्रेयसीशी लग्न होऊनही दररोजच्या ताणतणावात आणि धावपळीत जोडीदारासोबत ‘नांदा सौख्य भरे’ हे वाक्‍य त्यांच्यासाठी स्वप्नवत ठरलं आहे. याची अनेक कारणं आहेत; पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं आहे, जोडीदारासोबत वेळच व्यतीत न करणं.
 
नवविवाहितांमध्ये घटस्फोट घेणाऱ्यांचं प्रमाण २०१० पर्यंत चार टक्के होतं, ते २०१९ मध्ये १४ टक्‍क्‍यांच्या वर गेलं आहे. सध्याच्या इन्स्टंट फूडच्या जमान्यात तरुण-तरुणींची लग्नंसुद्धा इन्स्टंट जुळतात आणि नवलाईचे दिवस संपल्यावर सुरू होतात नवरा-बायकोमधील भांडणं. अनेकदा ही भांडणं इतकी टोकाला जातात की, लग्नाची प्रेमळ बेडी तुटून विभक्त होण्यावाचून पर्याय राहत नाही. आजच्या काळातील जोडप्यांची मानसिकता आणि गरज ओळखून ‘मी, लग्न आणि ...!’ या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, लग्नसंबंधाचा संपूर्ण प्रवास सहा टप्प्यांत सांगणारी मराठी-हिंदी गाणी, मुलाखत आणि प्रश्नोत्तरांतून संवाद साधत या कार्यक्रमातून ठाणेकरांना ‘नांदा सौख्यभरे’चं गोड गुपीत उलगडणार आहे.
 
जुन्या पिढीतलं लग्न आणि नव्या पिढीतलं लग्न यातला फरक समजावून सांगताना भारतातील एकमेव ‘मॅरेज कोच’ असलेल्या ‘ठाणेकर’ लीना परांजपे यांच्या मते, विवाह ही एक पवित्र संस्था आहे, असं पूर्वी मानलं जायचं. पण आता जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा पूर्णपणे बदलल्या आहेत. यामुळे काही जणांची लग्नं अपयशी ठरत आहेत; तर बहुतेकांचा लग्न टिकवण्यासाठी काही ना काही संघर्ष सुरू असतो. सध्याच्या काळात जोडीदाराकडून फक्त जवळिक अपेक्षित नसते, तर लग्नानंतरही एकमेकांची वैयक्तिक वाढ आणि विकास शक्‍य होईल, हीसुद्धा अपेक्षा असते. दुर्दैवाने, बदलत्या जीवनशैलीमुळे आपलं नातं टिकवण्यासाठी आजची जोडपी एकमेकांना अत्यंत कमी वेळ देतात आणि त्यामुळे त्यांचे नाते टिकवण्याचे प्रयत्नही अपुरे पडतायत.

विवाहविषयक समुपदेशकाचं म्हणजे मॅरेज  काऊन्सिलिंगचं काम पॅसिव्ह आहे; तर विवाह प्रशिक्षक म्हणजे मॅरेज कोचिंगचं काम ऍक्‍टिव्ह आहे. ज्याप्रमाणे क्रिकेट टीमचे प्रशिक्षक खेळाडूंसोबत राहून त्यांच्याकडून नियमित सराव करवून घेतात, त्याप्रमाणे मॅरेज कोचसुद्धा आवश्‍यकता भासल्यास जोडप्यांसोबत प्रत्यक्ष राहून त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांना थेट सूचना देतात, असंही लीना परांजपे यांनी सांगितलं.  ठाण्यात हाेणाऱ्या लीना परांजपे यांच्या ‘मी, लग्न आणि...!’ या नि:शुल्क कार्यक्रम आजच्या पिढीतील दाम्पत्यांना  सौख्यभरे नांदण्यासाठी प्रेरणा देईल, अशी अपेक्षा आहे. संसारात भांड्याला भांड लागतच असतं, पण त्याचा परिणाम काडीमोड होईपर्यंत जायला नको, ही सदिच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्ण होवो!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News