मराठवाड्यात प्रथमच कलाक्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी
जालन्यातील जेईएस महाविद्यालयात या वर्षापासून B.VOC Performing Folk Art हा यूजीसी व विद्यापीठ मान्यता प्राप्त नवीन डिग्री कौशल्य अभ्यासक्रम सुरू होत आहे.
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत मराठी भाषा व मराठी संस्कृती पुढे नेण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामुळे स्थानिक कलावंतांना आता कलेचे शिक्षण घेण्यासाठी पुण्या - मुंबईला जाण्याची गरज नाही.
आज लोककला काळाच्या ओघात लोप पावत आहेत. या लोककलांना व्यावसायिक स्वरूप देण्याकरिता एक प्रस्ताव यूजीसीकडे मागच्या वर्षी मांडण्यात आला होता, त्याला यूजीसीने मान्यता दिली आहे. हा कौशल्य आधारित पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून यात सहा सेमिस्टर असणार आहेत. यात प्रत्येक सेमिस्टरला एक कलाप्रकार देण्यात आला आहे.
यूजीसीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्याला चॉईस बेस, क्रेडिट बेस अशी शिक्षण प्रणाली देण्यात आली आहे. यात विद्यार्थ्यांना कुठल्याही टप्प्यावर एक्सिट पॉईंट देण्यात आला आहे. जर एखाद्या विद्यर्थ्याला वाटलं की एकच सेमिस्टर शिकायचं आहे तर तो ते करू शकतो. या अभ्यासक्रमानुसार सहा महिन्याचं एक सेमिस्टर जरी पूर्ण केले तरी त्याचं सर्टिफिकेट मिळणार, एक वर्षाचं केला तर डिप्लोमा सर्टिफिकेट, दोन वर्ष ऍडव्हान्स डिप्लोमा, तीन वर्ष डिग्री सर्टिफिकेट मिळणार.
प्रत्येक वर्षात एक कला प्रकार ठेवण्यात आला आहे. जर त्या विद्यर्थ्याने पहिल्या वर्षीच एक्सिट पॉईंट घेतला तर त्याच्या हाती त्याच्या रोजगाराचा साधन राहील म्हणून पहिल्या सेमिस्टर मध्ये वाघ्या मुरळी हा प्रकार घेतला आहे, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये गोंधळ , तिसऱ्या सेमिस्टरमध्ये कीर्तन, भारूड, चौथ्यामध्ये लावणी, पोवाडा, पाचव्यामध्ये तमाशा आणि त्याच पूर्ण मॅनेजमेन्ट, सहाव्यामध्ये आंबेडकरी जलसा हा ठेवला आहे. यासाठी त्या त्या कला क्षेत्रातील सुप्रसिद्ध कलावंत प्राध्यापक प्रत्यक्ष अध्यापन करणार आहेत.
यासोबत भाषिक कौशल्य ज्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, रायटिंग स्किल, क्रिएटीव्ह रायटिंग, मिडिया रायटिंग व वादन, गायन सादरीकरण एकत्रित असणार आहे. फिल्म इंडस्ट्री, प्रसार-माध्यमे, स्वतंत्र व्यवसाय, मालिका चॅनल, सोशल मीडिया सारख्या विविध क्षेत्रात जॉब मिळवण्याची पात्रता यातून विद्यार्थ्याच्या अंगी येणार आहे. युजीसीकडून ग्रांट असल्याने एका वर्षाची फी एक हजार रुपये असणार आहे.
युजीसी अकॅडमिक कॅलेंडरनुसार १ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरु होतील. यासाठी विद्यापीठामध्ये कौशल्य आधारित गोष्टींना भर देत संगीत आणि डिजिटल अशा दोन प्रयोगशाळा असणार आहेत. थिअरीला १२ क्रेडिट तर प्रॅक्टिकलसाठी १८ क्रेडिट आहेत. एका पेपरला ४ क्रेडिट असणार आहेत. २५ ऑक्टोबर ही प्रवेश घेण्याची अंतिम तारीख आहे.