शाळांमध्ये 'अग्निशामक यंत्रणा' सक्‍तीची 

मिलिंद देसाई
Monday, 2 March 2020
  • शिक्षण खाते; नूतनीकरणासह नवीन शाळांसाठी "फायर सेफ्टी सर्टिफिकेट'ची मागणी 

बेळगाव: नवीन शाळा सुरु करण्यासाठी किंवा शाळा नूतनीकरणासाठी परवानगी पाहिजे असल्यास यापुढे अग्निशामक दलाकडून 'फायर सेफ्टी सर्टिफिकेट' बंधनकारक केले आहे. मात्र, त्यासाठी 20 हजारांपेक्षा अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे, 'फायर सेफ्टी सर्टिफिकेट' अभावी शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक अर्ज अडकून पडले आहेत. 

काही महिन्यांपूर्वी बंगळूरसह राज्यातील काही ठिकाणी शाळांमध्ये शॉर्टसर्किट व अन्य कारणांमुळे आगीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने सर्व शाळांमध्ये आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक यंत्रणा बसविण्याची सूचना केली होती. त्यानुसार काही खासगी शाळांनी अग्निशामक यंत्रणा बसविली आहे. मात्र, अनेक शाळांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, शाळा नुतनीकरण परवान्यासह नवीन शाळेसाठी परवानगी हवी असल्यास आता 'फायर सेफ्टी सर्टिफिकेट' देणे अनिवार्य आहे. तसेच यापुढे प्रत्येक शाळेत अग्निशामक यंत्रणा अत्यावश्‍यक केली आहे. 

शाळेत अग्निशामक यंत्रणा बसवायची असल्यास मोठा खर्च अपेक्षित आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर अग्निशामक दलाकडून सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे. त्यामुळे, शाळांना अतिरिक्‍त भार सहन करावा लागणार आहे. शाळा नुतनीकरण परवान्यासाठी 10 हजारांचे शुल्क भरावे लागते. तर फायर सेफ्टी सर्टिफिकेटसाठी 20 हजारांचा खर्च येत आहे. त्यामुळे परवाना नुतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या शाळांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. तसेच नवीन शाळा सुरु करताना देण्यात येणाऱ्या माहितीवेळी अग्निशामक यंत्रणा असल्याचे सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. अनेकांनी परवाना नुतनीकरणासाठी अर्ज केला आहे. परंतु अग्निशामक दलाकडून सर्टिफिकेट न मिळाल्याने अनेक अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे, व्यवस्थापन मंडळांना परवाना नुतनीकरणासाठी शिक्षण खात्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, शिक्षण हक्‍क कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक सर्व उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच शाळा इमारतींच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलली जात असल्याने सर्वच शाळांना अग्निशामक यंत्रणा बसवून घ्यावी लागणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळांना अग्निशामक यंत्रणा बसविण्याची सूचना केली होती. मात्र, अनेक शाळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच यापुढे शाळा नुतनीकरण परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या शाळांना फायर सेफ्टी सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. सर्व शाळांनी आगीवर नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 
- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News