मानवी मनाचा शोध घेणे कठीण आहे. कारण कधी कुणाच्या मनाच्या कोपऱ्यात काय दडलेले असेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच मन कधी कधी चलबिचल होते..एखादा निर्णय घेताना मन अस्थिर होते. मनात काही तरी वेगळेच दडलेले असते. त्यातच हल्लीची पिढी खूप हुशार व प्रगल्भ आहे आणि तितकीच ती खंबीर आणि बिनधास्त आहे. त्यांची विचार करण्याची पद्धत काहीशी वेगळी आहे. प्रेम..लग्न आणि एकूणच मानवी नातेसंबंध यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन निराळा आहे. अशा मानवी नातेसंबंधांच्या गुंतागुंतीची, आजच्या तरुण पिढीचा विचार करण्याची...त्यांच्या मनात चाललेल्या भावभावनांची कथा "मनफकिरा' या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
खरे तर अशा कथेवर चित्रपट बनविणे खूप कठीण काम होते. परंतु दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने हे आव्हान उत्तम पेलले आहे. आजच्या पिढीची ही कथा सांगताना जुन्या संस्काराचा आणि कौटुंबिक नातेसंबंधांना कुठे धक्का लागणार नाही याची काळजी तिने घेतली आहे. चार मुख्य व्यक्तिरेखांभोवती फिरणारे या चित्रपटाचे कथानक काहीसे गुंतागुंतीचे आहे खरे. पण हळूहळू हा गुंता सैल होत जातो आणि आपल्या मनात चाललेल्या प्रश्नांची योग्य अशी उकल करतो. भूषण (सुव्रत जोशी) आणि रिया (सायली संजीव) यांचे ऍरेंज मॅरेज झालेले असते. त्यांच्या लग्नाची पहिली रात्र. दोघेही एकमेकाच्या बहुपाशात आकंठ बुडालेले असतात आणि एका सर्वोच्च क्षणी अचानक भूषणच्या तोंडून माही (अंजली पाटील) असे नाव येते.
ही माही म्हणजे भूषणची प्रेयसी. भूषण लंडनला गेलेला असताना त्याची भेट स्वच्छंदी आणि आनंदी जीवन जगणाऱ्या माहीशी होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. परंतु ते प्रेम काही पुढे सरकत नाही आणि भूषणला रियाशी लग्न करावे लागते. पहिल्याच रात्री अशी घटना घडल्यानंतर दोघांचाही भूतपूर्व काळ समोर येतो. रियादेखील नचिकेत (अंकित मोहन) नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडलेली असते. ते दोघेही आपल्या भूतकाळाला उजाळा देतात तेव्हा त्यांना समजते की आपले लग्न झालेले असले तरी आपण मनाने काही एकत्र आलेलो नाही...विचारांनी एकत्र आलेलो नाही आणि मग विविध घडामोडी घडतात. अभिनेत्री म्हणून चांगली इनिंग खेळल्यानंतर मृण्मयी आता दिग्दर्शक बनली आहे आणि तिने ही कथा सुंदररीत्या पडद्यावर रेखाटली आहे. खरे तर अशी कथा निवडणे आणि ती तितक्याच धाडसाने मांडणे यामध्ये कौशल्य व तितकीच हुशारी लागते. मृण्मयीने हे धाडस केले आहे. पात्रांना अनुसरून कलाकारांची अचूक निवड, त्याला साजेशा अशा योग्य पटकथेची जोड, तितकेच श्रवणीय गाणी...
असा सगळाच मामला छान जमलेला आहे. चार प्रमुख व्यक्तिरेखांभोवती फिरणारी ही कथा असली तरी अन्य व्यक्तिरेखाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी भूषणची आई (रेणुका दफ्तरदार). रेणुका दफ्तरदार यांनी ही भूमिका चपखल साकारली आहे. मुळात कथेचा प्लॉट छोटा आहे. परंतु दिग्दर्शिकने त्यावर पटकथा बांधताना प्रत्येक व्यक्तिरेखेला छान पद्धतीने प्रेझेंट केले आहे. कलाकारांनीही दिग्दर्शिकेचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविला आहे. सुवृत्त जोशी, सायली संजीव, अंकित मोहन व अंजली पाटील यांनी चोख कामगिरी केली आहे. विचाराने गोंधळलेल्या आणि थोडी विनोदी अंगाने जाणाऱ्या भूषणची व्यक्तिरेखा सुव्रतने सफाईदारपणे साकारली आहे.
सायली संजीव आणि अंजली पाटील यांच्या भूमिका तितक्याच दमदार आहेत. माही ही अल्लड आणि अवखळ तसेच बिनधास्त स्वभावाची आहे तर रिया काहीशी विचारपूर्वक पाऊल टाकणारी आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी कमालीचा अभिनय केला आहे. दोघींनीही आपल्या भूमिकेचे बेअरिंग व्यवस्थि सांभाळले आहे. अंकित मोहननेदेखील तितकीच मेहनत आपल्या भूमिकेवर घेतली आहे. किरण यज्ञोपवित तसेच अन्य कलाकारांचीही कामे ठीकठाक. चित्रपटाला संगीत सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरेने दिले आहे. त्यांचीही कामगिरी उत्तम झाली आहे. घरी गोंधळ...हे गाणे झकास. लंडन येथील विविध लोकेशन्स सिनेमॅटोग्राफर्सने आपल्या कॅमेऱ्यात छान टिपली आहेत. काही त्रुटी सिनेमात असल्या तरीही एकूणच मामला जमलेला आहे. मानवी नातेसंबंधाची हळूवार गोष्ट मांडताना त्यातील धागेदोरे छान विणले आहे.