मल्हारगड (सोनोरी)
- महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिध्द आहे.
- पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात.
महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिध्द आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांग ही पूर्वपश्चिम पसरलेली आहे.
याच रांगेला भुलेश्र्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. पुण्याहून सासवडला जातांना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.
मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धापाऊण तास पुरतो. किल्ल्याची तटबंदी, बुरूज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली, तरी बऱ्याच ठिकाणी ती शाबूत आहे. याशिवाय सोनेरी गावात असलेली पानसे यांची गढी, लक्ष्मी-नारायणाचे मंदिर, मुरलीधराचे मंदिर या पहाण्यासारख्या गोष्टी आहेत.
मल्हारगड हा छोटेखानी किल्ला, पानसे (वाडा) गढी, लक्ष्मी-नारायणाचे आणि मुरलीधराचे मंदिर ही ठिकाणे मुंबई-पुण्याहून एका दिवसात पाहून होतात.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम १७५७ ते १७६० या काळात झाले. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरूध्दच्या बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.