सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्‍यात तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेल्या 17 एकरवर विजयदुर्ग किल्ला दिमाखात उभा आहे.

मुंबई: ऐतिहासिक वैभव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा किल्ला केंद्र सरकारच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या अखत्यारितील भारतीय पुरातत्त्व विभागाकडे असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला परवानगी द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्‍यात तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेल्या 17 एकरवर विजयदुर्ग किल्ला दिमाखात उभा आहे. या किल्ल्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, छत्रपती शिवाजी महाराज यांनी बिजापूरच्या आदिलशाहपासून तो 1653 मध्ये जिंकला होता. त्यानंतर त्याचे विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आले. पोर्तुगीज सैन्याबरोबर सरदार कान्होजी आंग्रे यांनी विजयदुर्ग किल्ला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. 1818 मध्ये तो ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन करण्यात आला होता. विजयदुर्ग किल्ला हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र सध्या हा किल्ला जीर्ण अवस्थेत असून, समुद्राकडील बुरुजांची बऱ्याच अंशी पडझड झाली आहे. यामुळे किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची भीती आहे. या किल्ल्याची दुरुस्ती व देखभाल होत नसल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.

पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित!
समाजमाध्यमांमध्ये विजयदुर्ग किल्ल्याची अवस्था प्रसारित झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील किल्ल्याच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. हा किल्ला केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने, त्याची दुरुस्ती राज्य सरकारला करता येत नाही. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास त्याची देखभाल-दुरुस्ती तत्काळ करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचेही अमित देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News