राज्यात महायुती कायम ; सेनेचं पुन्हा तेच कारण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • उद्धव ठाकरे - विधानसभेलाही ‘आमचं ठरलं’
  • हिंदुत्वासाठी युती

कोल्हापूर - ‘लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात काही ठरले होते, तसेच विधानसभेलाही ‘आमचं ठरलं’ आहे. आमची युती मजबूत आहे, तसेच ती आणखी मजबुतीने पुढे जाणार आहे. त्यामुळे ज्यांना युती व्हावी असे वाटत नाही, त्यांच्या दु:खात मी काही सहभागी होणार नाही,’ असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतही महायुतीवर शिक्‍कामोर्तब केले.

शिवसेनेच्या नूतन खासदारांसह अंबाबाईच्या दर्शनाला सहकुटुंब आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हॉटेल सयाजी येथे पत्रकार परिषद घेतली.

या वेळी त्यांच्याबरोबर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विनायक राऊत आदींसह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, महायुतीच्या प्रचाराची सुरवात श्री अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन कोल्हापुरातून झाली. त्यावेळी व्यासपीठावरुन अंबाबाईला दंडवत घातला होता.

आज पुन्हा अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झालो आहे. कोल्हापूरचा खासदार भगव्याचा असायला हवा, अशी इच्छा होती. ही इच्छा येथील जनतेने पूर्ण केली आहे. त्याबद्दल मी कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानतो. त्यांना मानाचा मुजरा करीत आहे, या शब्दांत त्यांनी येथील जनतेविषयी कृतज्ञता व्यक्‍त केली. लोकसभा अधिवेशनाचा पहिला दिवस १७ जून रोजी आहे. तत्पूर्वी, १६ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.  

हिंदुत्वासाठी युती
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेचे उपाध्यक्षपद असो किंवा लोकसभेतील वाढीव प्रतिनिधित्व याची चर्चा सुरू आहे. मात्र, आम्ही केवळ दोन-चार पदांसाठी युती केलेली नाही. हिंदुत्वासाठी युती केली आहे.

अमित शहा गृहमंत्री झाल्यावर ते काश्‍मीरमध्ये जे काही करू इच्छितात, त्यासाठी युती केली आहे. एखादी गोष्ट हक्‍काने मागणे म्हणजे त्याला नाराजी समजता कामा नये. नाराजी व्यक्‍त करायची तेव्हा केली. आता सर्व व्यवस्थित आहे. युती तुटू देणार नाही.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News