अमितशहांच्या टार्गेटवर आता महाराष्ट्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा रोडमॅप ठरविण्यासाठी बैठकांचे सत्र

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या ‘मोड’मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या ‘कोअर कमिटी’च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज चर्चा केली.

महाराष्ट्रासोबतच हरियाना आणि झारखंड विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. केंद्रात मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लगेचच होणाऱ्या या विधानसभा निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असतील. साहजिकच या राज्यांमध्ये यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर या राज्यांमधील कोअर ग्रुपच्या नेत्यांसमवेत शहा यांनी आज बैठक घेतली. संघटना सरचिटणीस रामलाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, त्याचप्रमाणे हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मंत्री अनिल वीज हेदेखील बैठकीत सहभागी झाले होते.

हरियानाचे माजी केंद्रीय मंत्री चौधरी वीरेंद्रसिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यासह येथील प्रदेशाध्यक्ष आदी उपस्थित होते. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशातही नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड अपेक्षित आहे. तर, स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष शहा गृहमंत्री झाल्यामुळे भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचीही नियुक्ती संघटनात्मक निवडणुकांच्या माध्यमातून होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक बदलांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरविण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबतही या वेळी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असेही फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.

पश्‍चिम बंगालबाबत केंद्राला चिंता
दरम्यान, पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधील हिंसक चकमकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली असून, केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी राज्य सरकारकडून अहवाल मागविल्याचे समजते. उत्तर २४ परगणा, हातगाचा आदी ठिकाणी हिंसाचारात काल तीन जणांचा मृत्यू झाला होता.

त्यातील दोघे भाजप कार्यकर्ते आहेत. यावर गृह मंत्रालयाने राज्य सरकारला हिंसाचार रोखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच, कर्तव्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशा कानपिचक्‍याही गृह खात्याने दिल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News