महाराष्ट्रात पुढील वर्षी राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • महाराष्ट्रात पुढील वर्षी राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जिल्हा संघातील विविध खेळाडूंत चुरस निर्माण करायला हवी.

मुंबई: महाराष्ट्रात पुढील वर्षी राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जिल्हा संघातील विविध खेळाडूंत चुरस निर्माण करायला हवी. त्यामुळे खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे मत भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केले.

राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी निधीही मान्य झाला होता; पण ती झाली नव्हती. आता यंदा तर हे अशक्‍य आहे. राज्यातील क्रीडा स्टेडियम विलगीकरण केंद्रे झाली आहेत. ती अजून दोन-तीन महिने असण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत मोसमच जवळपास संपणार आहे. या परिस्थितीत नव्या मोसमातील स्पर्धेची पूर्वतयारी आत्तापासून केल्यास ती चांगल्या प्रकारे होईल, असे शिरगावकर यांनी सांगितले.

राज्य ऑलिंपिकमध्ये सर्वोत्तम आठ संघांचा सहभाग असतो. आता जिल्ह्यात आपण संघातील स्थानासाठी विविध खेळात स्पर्धा करू शकलो, तर त्यामुळे खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल; तसेच एक प्रकारची स्पर्धाही खेळाडूंत जास्त निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय खात्याला काही वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ आयोजित "शालेय क्रीडा स्पर्धांचे स्वरूप बदलणे - काळाची गरज' या विषयावर झालेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय परिसंवादात सहभागी होताना शिरगावकर यांनी मत मांडले.

नवीन खेळांना प्रोत्साहन देणे तसेच खेळाचे आयोजन तालुकास्तरापासून राज्यस्तरापर्यंत योग्य पद्धतीने करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी संघटनांनी एकमेकांना साह्य करायला हवे.
- प्रमोद चांदुरकर, भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News