चटकदार पदार्थांची चव चाखण्यासाठी येथे नक्की भेट द्या

शलाका सावंत
Wednesday, 6 March 2019

ठाणे रेल्वेस्थानकातून पहाटे ५ पासून ते मध्यरात्रीपर्यंत लाखोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात. फ्रॅंकीपासून ते अप्प्यांपर्यंत भारतीय, पाश्‍चिमात्य पदार्थांची चटकदार चव खवय्यांना उपलब्ध करून देण्यासाठी पश्‍चिमेकडील दादा पाटील वाडीतील खाऊगल्लीला नक्की भेट द्या.

ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरून बी केबिनच्या दिशेने बाहेर पडल्यावर प्रथम खवय्यांच्या सेवेसाठी फ्रॅंकी सेंटर आहे. आजवर मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या वडापावला आव्हान देत तरुणाईच्या जिभेला खुणावणाऱ्या चटकदार फ्रॅंकीने खवय्यांना खूश केले आहे. महाराष्ट्रातील घराघरांत लहानपणापासून दिली जाणारी तूप-साखर-पोळी, आखाती प्रदेशात मूळ असणारा श्वारमा, कोलकात्याची खासियत असलेला काठी रोल, या प्रकारातूनच उदयाला आलेली फ्रॅंकी प्लॅटफॉर्मवर उभे असताना, रस्त्यावर चालताना अगदी कुठेही खाता येऊ शकते.

ही फ्रॅंकी बनवताना बघण्याची मजा काही वेगळीच असते. ती खाण्यासाठी या ठिकाणी रांगा लागलेल्या दिसून येतात. तेलाने थपथपलेल्या मैद्याच्या पोळीला खरपूस भाजून त्यावर मसाला, बटाट्याची भाजी, नुडल्स, चिकन, अंड टाकल्यावर पांढऱ्याशुभ्र पोळीला छान तपकिरी रंग येतो. यानंतर दुसरीकडे त्याच तव्यावर दुसऱ्या फ्रॅंकीची जय्यत तयारी सुरू असते. अंडे शिजल्यावर चिकनच्या तयार सारणातून काही चिकनचे तुकडे सरळ रांगेत लावले जातात. व्हिनेगरमध्ये हिरव्या मिरच्या कापून ठेवलेले पाणी हळूहळू या सारणावर सोडले जाते. यानंतर खरी मजा असते फ्रॅंकीच्या विशेष मसाल्याची. प्रत्येक फ्रॅंकीच्या दुकानातील मसाल्याची चव वेगळी असते. फ्रॅंकी मसाल्यानंतर वेळ येते कांद्याची. वरून भरपूर कांदा घालून ही फ्रॅंकी खाण्यासाठी तयार केली जाते. फ्रॅंकी खल्ल्यावर एका भिंतीच्या अंतराने दाक्षिणात्य पदार्थांचे दुकान येथे आहे.

साध्या डोशापासून ते उत्तप्प्यापर्यंत ५०हून अधिक खाद्यपदार्थ या ठिकाणी उपल्बध आहेत. त्यापुढे रसवंतीमधील उसाचा रस पिऊन अनेकांची मने तृप्त होतात. चार पावलांवर ‘अँपेटाईट’ हे मोमोज्‌साठीचे प्रसिद्ध छोटेखानी रेस्टॉरंट आहे. मोमोज्‌ या खाद्यपदार्थाला ठाणेकरांच्या मनात स्थान मिळवून देण्याची किमया या रेस्टॉरंटने केली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. इथलं चीज, मटण, चिकन, पनीरने भरलेल्या मोमोज्‌ची चव चाखण्यासाठी खवय्ये दुरवरून या ठिकाणी येतात. त्याचपुढे मांसाहारी खवय्यांसाठी ‘शोरमा’ हा जगप्रसिद्ध खाद्यपदार्थही या ठिकाणी उपलब्ध आहे. शोरमाच्या मशीनवर चिकन तासन्‌ तास कोळशाच्या मंद आचेवर शिजत असते. सर्वप्रथम पिटा ब्रेड म्हणजेच खबूस घेऊन तो शोरमा मशीनवर हलकासा भाजून घेतला जातो. त्यानंतर त्यावर ऑर्डरप्रमाणे तिखट, गार्लिक, स्वीट किंवा सेझवान सॉस पसरवला जातो.

‘पिकल’ म्हणजेच व्हिनेगरमध्ये मुरवत ठेवलेले काकडी, बीटचे लांब चिरलेले काप त्यावर ठेवले जातात. नंतर बारीक चिरलेला कोबी आणि गाजर टाकले जाते. यानंतर खरी मजा असते. कारण तेव्हा असली मसाला त्यामध्ये भरला जातो आणि ते म्हणजे मंद आचेवर भाजत असलेले चिकन. एका मोठ्या चाकूने चमच्याच्या साह्याने विशिष्ट पद्धतीने ते चिकन कातरून घेतले जाते. मग फ्रेंच फ्राईज आणि ते चिकन ठासून भरले जाते. त्यावर बटर पेपर लावून शोरमाचे एका बाजूचे तोंड उघडे ठेवून खालच्या बाजूचे टोक बंद करण्यात येते. प्लेटमध्ये मेओनिज सॉस आणि पिकलसोबत सर्व्ह केले जाते.

त्यापुढे काही पावलांवर ‘टकिन्स स्क्वेअर’ असे आगळ्यावेगळ्या खाद्यपदार्थांचे छोटेखानी दुकान आहे. यामध्ये नेहमीच्या खाद्यपदार्थांपेक्षा काहीतरी हटके खाद्यपदार्थ चाखण्याची संधी आहे. नावाप्रमाणे सर्व काही चौकोनी म्हणजेच स्क्वेअर आकारात बनवून दिले जाते. आपल्या कल्पनेपलीकडील बिर्याणी, शोरमा सारखे पदार्थही या ठिकाणी चौकोनी आकारात उपलब्ध होतात. तेही अगदी स्वस्त दरात. तसेच येथील लेमन आणि पायनॅपलपासून तयार करण्यात आलेली पेय तर सर्वांच्याच पसंतीस येत आहे. त्याच्या पुढे असणाऱ्या पाणीपुरीच्या स्टॉलवर तर पाहावे तेव्हा गर्दी दिसून येते. झणझणीत, तिखट, क्रिस्पी, कुरकुरीत, गोड, आंबट, ठसका देणारे आणि बरंच काही. ही विशेषणे लागू पडणारा पाणीपुरी हा एकच पदार्थ आपल्या नजरेसमोर येतो. समस्त भारतीयांच्या जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे पाणीपुरीची चव. स्टेशनच्या दिशेने येणारे प्रवासी या कॉर्नरवरील पाणीपुरीची चव चाखल्याशिवाय पुढे जातच नाहीत, असे येथील विक्रेत्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News