'कोकणची माणसं साधी भोळी' हे गाणं ऐकलं की पहिला आठवतं ते, कोणालाही आपलसं करणारी कोकणची साधी माणसं. अगदी साधी-सरळ स्वभाव असलेली माणसं. अशाच त्या माणसांमधला तो एक. जेव्हा पहिल्यांदा मी त्याच्याशी बोलली, तेव्हा त्याच्या प्रत्येक मॅसेजमध्ये एक साधेपणा जाणवत होता. तशी आमची ओळख इन्स्टाग्रामवरची; पण आमच्यातल्या मैत्रीचं 'मी आणि तु'चं नात अगदी घट्ट जुळलं होतं.
खरंतर मस्करकीत त्याचं भविष्य ओळखण्यावरून आमच्या सुंदर मैत्रीची सुरवात झाली. हळूहळू बोलणं वाढत गेलं तसं, नंतर इन्स्टाग्रामवर आम्ही एकमेकांचे नंबर शेअर केले. आमचं नातं कुठेतरी मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे जायला लागलं.
आम्हा दोघांचा स्वभाव तसा पुर्णतः एकमेकांच्या विरुद्धचं. मी स्वभावाला तशी फटकळ, अल्लड, रागीट थोडीशी खडूस आणि थोडीशी फिल्मी आणि तो मात्र साधा-सरळ, अभ्यासु; पण कधीतरी मनं झालं तर माझं ऐकून तोही फिल्मी डायलॉग मारतोय. माझ्या मॅसेजच्या रिप्लाय वरून माझा मूड कसा आहे, ते ओळखणं अगदी बरोबर त्याला जमतं. माझा राग घालवणं, माझा मूड चांगला करणं अगदी सहज जमतं त्याला.
मी एक दिवस कॉल नाही केला की संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाण्याअगोदर; 'अगं तुझा आवाज ऐकायचं मन करतंय' असा मॅसेज करायला तो कधीच विसरत नाही. दिवसातुन दहावेळा मी रागावून, चिडून, मला मॅसेज करू नकोस, मला नाही बोलायचं तुझ्याशी, असा रिप्लाय करते, तरीसुध्दा ऑफिसला जाताना आणि ऑफिस सुटल्यावर 'ट्रेनमधून नीट उतर, काळजी घे! घरी पोहोचल्यावर मॅसेज कर' आणि कामाकडे लक्ष दे! असा काळजीपूर्वक रखाना असायचाच.
तो मला नेहमीचं म्हणतो; मी त्याला हसवून, त्याच्या आयुष्यात येऊन त्याच आयुष्य सुंदर केलं, कधी कधीतर मी डॉक्टर आहे आणि त्याचं आयुष्य वाढवते असं सांगतो; पण खरं सांगायचं झाल्यास, काही कारणांमुळे एक वर्षभर मी जगाशी अबोला धरला, कोणाशीही नीट बोलेनाशी झाली; त्यावेळी सगळ्यात सांभाळून घेतलं ते म्हणजे त्याने. आयुष्यात येणारे सगळ्या प्रॉब्लेम्सला हसत-हसत सामोरे जायला त्याने शिकवलं. पुन्हा आयुष्य खुलून जगायला शिकवलं. मनात कोणताही स्वार्थ न ठेवता नाती मनापासून जोडली की ती कायम टिकतात, मग ती नाती रक्ताची असो वा मनाने जोडलेली.
नात्यांमधील थोडासा का होईना ना गोडवा मला त्याच्या सोबतीने मिळाला. प्रत्येक मुलीला अगदी तिचा आयुष्याचा साथीदार जसा असावा असं वाटतं, अगदी तसाच आहे तो. त्याच्याही आयुष्यात कोणीतरी त्याच्यासारखी साधी-सरळ साथीदार मिळावी; पण जेव्हा-जेव्हा हाच विचार मनात येतो तेव्हा मन सतावत राहतं, जर त्याच्या आयुष्यात कुणी आली तर तो माझ्याशी बोलणं टाळणार तर नाही ना? का? माझ्याशी बोलणारच नाही? कुणी तिसऱ्याच्या येण्याने तो दूर तर नाही होणार?
खरंतर आम्ही अजुन समोरा समोर भेटालोच नाही, पण प्रत्यक्षात आम्ही मनाने एकमेकांना रोज भेटतो. त्याचं माझ्यासोबत असणं मला मला हवं हवंस वाटतं. ते म्हणतात ना, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा एक मित्र असतो, ज्याला सगळे तिचा बॉयफ्रेंड समजतात. हा माझा मित्र आहे की प्रियकर हे तर माहीत नाही? मित्र असो किंवा प्रियकर; पण तो माझ्यासवे माझ्या आयुष्यभराचा साथीदार व्हावा असं मला नेहमीच वाटतं.