मुंबई महानगरपालिकेत अमराठी कंत्राटदारांची लॉबी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 June 2020
  • मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचा घणाघाती आरोप

मुंबई : कोरोनाग्रस्तांचे मृतदेह ठेवण्यासाठी बॉडी बॅग खरेदी करण्यावरून चाललेल्या राजकारणात मनसेने उडी घेतली आहे. महाराष्ट्रीय कंपनीने तयार केलेल्या उच्च दर्जाच्या बॉडी बॅग मुंबई महापालिकेने विकत घेऊ नयेत, म्हणून अमराठी लॉबी प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेने केला असून, तटस्थ चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोविड-19 विषाणूबाधेने दगावलेल्या रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी गळतिरोधक बॉडी बॅग आवश्‍यक असतात. मुंबई महापालिकेने औरंगाबाद येथील वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून काही बॉडी बॅग खरेदी केल्या. या कंपनीची केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर नोंदणी असून, त्यांचे दरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. महापालिकेने 20 हजार बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी मे महिन्यात निविदा मागवल्या. त्या प्रक्रियेत ही कंपनी पात्र ठरली होती. संबंधित कंपनीने 1000 रुपयांनी दर कमी करून बॉडी बॅग सर्व करांसह 6 हजार 718 रुपयांना देण्याचा निर्णय घेतला.

या कंपनीचे मालक सतीश कल्याणकर याच काळात महापालिका मुख्यालयात आले. तेथे त्यांची एका व्यक्तीने भेट घेऊन गुप्ता नावाच्या व्यक्तीशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्या व्यक्तीने या व्यवहारासाठी 15 टक्के कमिशन मागितले. कल्याणकर यांनी कमिशन देण्यास नकार दिला. त्यानंतर बॉडी बॅगच्या किमतीवरून वाद निर्माण झाला आणि नंतर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. या प्रकरणात वेदांत इनोटेक कंपनीने आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी कल्याणकर यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

मुंबई महापालिकेत अमराठी कंत्राटदारांची लॉबी असून, त्यांना राजकीय वरदहस्तही आहे. त्यामुळे तेथे मराठी कंत्राटदाराला प्रवेश मिळू दिला जात नाही. मराठी कंत्राटदारांनी प्रयत्न केला, तरीही लॉबी सर्व बाजूंनी त्यांची कोंडी करते, असे संदीप देशपांडे म्हणाले. या प्रकरणात तटस्थ चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसे न झाल्यास मनसेच्या पद्धतीने भ्रष्ट अधिकाऱ्यांचा समाचार घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

पालिकेतील गुप्ता कोण?

महापालिकेतील गुप्ता नावाच्या व्यक्तीने सतीश कल्याणकर यांच्या कंपनीची फ्रॅंचायजी अथवा 15 टक्के कमिशन मागितले होते. बॉडी बॅगची खरेदी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत केली जाते. कंपनीची फ्रॅंचायजी न दिल्यास महापालिकेत काम करू देणार नाही, अशी धमकीही या व्यक्तीने दिली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेतील गुप्ता कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही व्यक्ती एका विरोधी पक्षाशी संबंधित असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे.

"कोविड केंद्रांतही भ्रष्टाचार'

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कोविड केंद्रांच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. मैदानांत उभारलेल्या कोविड केंद्रांमधील सर्व वस्तू भाड्याने घेण्यात आल्या आहेत. या किमतीत या वस्तू विकत घेता आल्या असत्या, असा दावा त्यांनी केला. या भ्रष्टाचारामागे एक टोळी आहे; त्याचीही चौकशी करावी, अशी मागणीही देशपांडे यांनी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News