लहान मुलांमधील यकृताचे आजार बऱ्याच वेळेस दुर्लक्षित राहतात. भारतात हे प्रमाण पुष्कळ आहे. बरेचदा या आजारांबद्दल असलेली उपेक्षा, योग्य उपचारपद्धतींचा अभाव किंवा आर्थिक दडपणामुळे या मुलांना योग्य उपचारांपासून वंचित राहावे लागते. काही प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते. या आजारांचे अचूक निदान आणि उपचार भारतामध्ये मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. अनेक दानशूर व्यक्तींमुळे अगदी यकृतरोपण शस्त्रक्रियेपर्यंतची उपचारपद्धती अगदी रास्त दरात उपलब्ध आहे.
मुख्य लक्षणे :
१) भूक न लागणे, २) पोट मोठे होणे, ३) कावीळ होणे, ४) शरीराची वाढ खुंटणे, ५) चिडचिडेपणा वाढणे, ६) झोप नीट नसणे, ७) रक्ताची उलटी होणे किंवा शौचातून रक्त जाणे, ८) कुपोषणाची लक्षणे दिसू लागणे. लहान मुलांमध्ये हिपॅटायटिस ए, ई आणि बी यांबरोबरच व्हायरल हेपॅटायटिसही आढळतो. त्यामुळेच अन्नपाण्याची स्वच्छता राखणे आणि उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक असते. त्यामुळे ए, ई हेपॅटायटिस टाळता येऊ शकतो. तसेच ‘ए’ आणि ‘बी’ची लस सर्व बालकांना दिल्यास हा आजार टाळता येतो. आईवडिलांना ‘बी’ काविळीची लागण झालेली असल्यास त्यांच्या मुलांनाही लस देणे अत्यावश्यक आहे. गरोदरपणात आईवर योग्य औषधोपचार होणे आवश्यक आहे.
ॲक्युट लिव्हर फेल्युअर : यकृत अचानक खराब झाल्यास जिवास धोका होतो आणि अशा वेळी यकृतरोपणामुळे जीव वाचू शकतो.
यकृताचा कर्करोग - काही बालकांमध्ये यकृताचा जीवघेणा कर्करोग होतो, अशावेळी यकृतरोपणाची शस्त्रक्रिया हीच उपचारपद्धती
लागू पडते. काही वेळेस यकृतातील रक्तवाहिन्यांमध्ये दोष झाल्यामुळे यकृताचा आजार उद्भवतो. या आजाराचे लवकर अचूक निदान झाल्यास यकृताचा मोठा आजार टाळता येतो.
पित्त साचल्यामुळे होणारे आजार : यामध्ये पित्तनलिका जन्मतः नीट तयार न झाल्यामुळे यकृताचा आजार उद्भवतो. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये बिलियरी अट्रेसिया (Biliary Atresia) असे संबोधतात. बाळाची शी पांढरट होत असल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरी आहे. प्रोग्रेसिव्ह फॅमिलियल इंट्राहेपॅटिक कोलेस्टॅसिस या आजारात कावीळ वाढत जाते. २ॲटोईम्युन लिव्हर डिसीज : प्रौढांप्रमाणे लहान मुलांमध्येही हा आजार आढळतो. सुरवातीच्या काळात यकृताच्या रक्त तपासणीमध्ये बदल आढळतो. वेळेवर औषधोपचार केल्यास यकृताचा सिऱ्हॉसिस टाळता येऊ शकतो.
मेटाबॉलिक लिव्हर डिसीज, विल्सन्स डिसीज : यकृतात तांब्याचे प्रमाण वाढल्याने हा आजार होतो. तो आनुवंशिक आहे. त्यामुळेच एका मुलास आजार असल्यास बाकीच्या भावंडांचीही योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. या आजाराचे निदान रक्त,
लघवी, डोळे तपासून करता येते, तसेच यकृताच्या बायोप्सीत त्यातील तांब्याचे प्रमाण नोंदवले जाते. लहान वयात अथवा तरुणपणी लिव्हरचा आजार झाल्यास हा आजार आहे की नाही, हे पडताळणे आवश्यक आहे.
ग्लुकोजेन स्टोरेज डिसीजसारखे असेच अजूनही आजार क्वचितप्रसंगी आढळतात.
१) लहान मुलांना उघड्यावरचे कुपोषित अन्न देऊ नये. त्यांना देण्यात येणारे पाणी सुरक्षित आहे, याची काळजी घ्यावी.
२) काही यकृताचे आजार आनुवंशिक असतात, त्यामुळे कुटुंबातील
निकटच्या नातलगांना असे आजार असल्यास गर्भधारणेपूर्वी डॉक्टरकडे समुपदेशनासाठी जावे, तसेच गरोदरपणात नियमित चाचण्या कराव्यात.
३) आई-वडिलांना ‘हेप-बी’, ‘सी’ची बाधा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती उपचारपद्धती अवलंबावी तसेच काळजी घ्यावी.
४) आपल्या पाल्यास wilson''s disease असल्यास अन्य मुलांचीही चाचणी करून घ्यावी.
५) नवजात शिशूंची विष्ठा पांढरट असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.
६) काविळीची लक्षणे आढळल्यास, बाळाची भूक मंदावल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या चाचण्या कराव्यात.
७) यकृतावर साइड इफेक्ट करणारी औषधे काही अन्य कारणांनी द्यावी लागल्यास डॉक्टरांकडे नियमित जाऊन योग्य चाचण्या कराव्यात. उदा. क्षयरोगाची औषधे.
८) बाळाची वाढ नीट होत नसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
९) हेपॅटायटीस ए व बीची लस उपलब्ध असून ती बालकांना द्यावी.