या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे!

प्रवीण सोनवणे यिनबझ
Saturday, 12 September 2020

कधी कधी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. अशा वेळेस धैर्य राखून त्या परिस्थितीला सामोरे जायला हवे. आयुष्य असेच असते जे आपल्याला हवे असते ते मिळत नाही अन ज्याची आपण अपेक्षा करत नाही ते अनपेक्षितपणे आपल्या पदरात येऊन पडते.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्याला इतकं व्यस्त करून घेतलेलं आहे की काही वेळेस आपल्याला घड्याळाकडे पाहण्यासाठी ही वेळ नसतो. त्यामुळे सभोवती काय घडते आहे, काय घडणार आहे याची जाणीव आपल्याला होत नसते.आपण फक्त पळत असतो तेही टाईमच नाही अशी बोंबाबोंब करत!

अशामुळे आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण त्यांना अनुभवण्याचा आधीच हातातून साबण निसटावा तसे निसटले असतात आणि मग जेव्हा आपण आयुष्याची गोळाबेरीज करायला बसतो, तेव्हा आपल्याला समजते की,अरे! आपण पैसा कमविण्याच्या नादात खूप अनमोल असे क्षण गमविले आहेत. त्यामुळे नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आपण आपला प्रत्येक क्षण हा आनंदाने आणि आपल्या मनाप्रमाणे जगला पाहिजे.

आयुष्य म्हटले की त्यात सुख-दुःख,चढ-उतार हे आलेच. मग त्यामध्ये आपण रडत बसायचे की रडता रडता हसायचे हे आपणच ठरवायचे असते. कधी कधी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. अशा वेळेस धैर्य राखून त्या परिस्थितीला सामोरे जायला हवे. आयुष्य असेच असते जे आपल्याला हवे असते ते मिळत नाही अन ज्याची आपण अपेक्षा करत नाही ते अनपेक्षितपणे आपल्या पदरात येऊन पडते.

सुरेश भट आपल्या कवितेतून जेव्हा आयुष्याची व्याख्या करतात तेव्हा ते म्हणतात की,

जीवन छान आहे

थोडे लहान आहे

रडतोस काय वेड्या?

लढण्यात शान आहे

काट्यातही फुलांची झुलती कमान आहे

उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे

जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे!

आपण आपल्याला वेळ दिला पाहिजे. आपल्या नात्यांना वेळ दिला पाहिजे. ज्या गोष्टींतून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टींना महत्व दिले पाहिजे. आवडीचे छंद जोपासले पाहिजेत, आवडीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत, मनमुराद बागडले पाहिजे. अगदी खळखळून हसले पाहिजे. इच्छा आहे तिकडे फिरले पाहिजे, अगदी लहान मुलांप्रमाणे निरागस होऊन जीवनाचा आनंद घेतला पाहिजे.

जीवन एकदाच आहे मग ज्या गोष्टी आपल्याजवळ नाहीत त्यासाठी झुरत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यासाठी देवाचे आभार मानून आपण आपल्या जन्मावर शतदा प्रेम केले पाहिजे.

- प्रवीण सोनवणे

एसवाय बीएससी काॅम्प्युटर सायन्स, एच व्ही देसाई काॅलेज, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News