हे थोडे अवघडच आणि फायदेशीर आसन
- तो जमिनीला साधारणपणे समांतर होईपर्यंत वर घ्यावा. गुडघा ताठ असावा. कंबरेतून उजव्या बाजूला नीट वाकावे. पाठ गोलाकार होणार नाही, याची काळजी घ्यावी.
उत्थित परिघासन हे थोडे तोलात्मक आसन आहे. यापूर्वी आपण परिघासनाचा सराव कसा करायचा, हे पाहिले आहेच. या आसनामध्ये हातावर व गुडघ्यावर संपूर्ण शरीराचा भार उचलला जातो. प्रथम परिघासनाप्रमाणेच दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवून गुडघ्यावर उभे राहावे. उजवा पाय उजव्या बाजूला सरळ करावा. टाच जमिनीला टेकवावी. त्यानंतर कंबरेतून उजव्या बाजूला वाकावे.
छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे उजवा हात जमिनीवर पुढे टेकवावा. आता या हाताच्या तळव्यावर किंचित जोर देऊन डाव्या हाताने उजवे पाऊल पकडावे. उजवा पाय थोडासा गुडघ्यात वाकवून मग वर उचलावा. तो जमिनीला साधारणपणे समांतर होईपर्यंत वर घ्यावा. गुडघा ताठ असावा. कंबरेतून उजव्या बाजूला नीट वाकावे. पाठ गोलाकार होणार नाही, याची काळजी घ्यावी. डाव्या हाताचा दंड कानाला टेकलेला असावा.
नजर समोर स्थिर असावी. श्वसन संथ सुरू ठेवावे. आसन सोडताना सावकाश उलटक्रमाने सोडावे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही याच पद्धतीने आसन करावे. झटके देऊन, खूप ओढूनताणून सराव करू नये. हळूहळू आसन जमू लागेल. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसन करण्याचा प्रयत्न करावा. या आसनाच्या नियमित सरावाने लवचिकता वाढते.
हात व पायाचे स्नायू सुदृढ होतात. हातांतील ताकद वाढते. अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, नवीन अवघड आसन केल्याचा आनंद मिळतो. मात्र, गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी गुडघ्यावर उभे राहून हे आसन करू नये. अन्यथा त्रास आणखी वाढू शकतो.