साहित्य सोनियाचिया खाणी

डॉ. सुरेश सावंत, नांदेड
Saturday, 15 August 2020

आजची आमची शालेय ग्रंथालये म्हणजे पुस्तकांची कब्रस्ताने बनली आहेत. ग्रंथालयातील पुस्तकांची कपाटे किंवा पेट्या ह्या पुस्तकांच्या शवपेट्या बनल्या आहेत, हे चित्र जितके दुर्दैवी आहे, तितकेच ते संतापजनकही आहे.

'हल्ली शिक्षक वाचत नाहीत, हल्ली विद्यार्थी वाचत नाहीत', अशी ओरड आपण नेहमीच ऐकतो, पण अशी ओरड करणारे तरी किती आणि काय वाचतात, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ना. यशवंतराव चव्हाण एकदा म्हणाले होते, 'ज्ञान आणि शहाणपण यात अंतर आहे. शिक्षणाने ज्ञान मिळते आणि अवांतर वाचनाने शहाणपण येते. समृद्ध समाजासाठी शहाणपण हवे आणि त्यासाठी वाचन हवेच!' आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीने सांस्कृतिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. सुसंस्कृत मराठी समाज घडावा, यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच विश्वकोश निर्मिती मंडळांची स्थापना केली. बहुजन समाजातील नवशिक्षितांसाठी ग्रंथांचे भांडार उघडे केले. त्या भांडारात आज किती जण डोकावतात, हा प्रश्न अलाहिदा!आजची आमची शालेय ग्रंथालये म्हणजे पुस्तकांची कब्रस्ताने बनली आहेत. ग्रंथालयातील पुस्तकांची कपाटे किंवा पेट्या ह्या पुस्तकांच्या शवपेट्या बनल्या आहेत, हे चित्र जितके दुर्दैवी आहे, तितकेच ते संतापजनकही आहे.

हे चित्र सार्वत्रिक असले, तरी ते शतप्रतिशत खरे नाही. जशी काळ्याकुट्ट ढगालाही रुपेरी किनार असते, तशी ह्या नकारात्मक परिस्थितीलाही सकारात्मकतेची इवलीशी का होईना, पण सोनेरी किनार आहे. सर्व काही संपले आहे, असे समजण्यासारखी निराशाजनक परिस्थिती अजून आलेली नाही. आपण कडेलोटाच्या काठावर उभे असलो, तरी अजून कडेलोट झालेला नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.
आजही काही शिक्षक आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात वाचनसंस्कृतीच्या आणि लेखनसंस्कृतीच्या विकासासाठी असे काही भन्नाट उपक्रम राबवितात, की ते समजल्यावर आपणही स्तिमित होतो, सुखावतो.

चंदगड तालुक्यात कालकुंद्री ह्या खेडेगावी सरस्वती विद्यालय नावाची एक शाळा आहे. शाळेची स्थापना 1953 ची आहे. शाळेत पाचवी ते बारावीचे वर्ग चालतात. शाळेची एकूण विद्यार्थीसंख्या 200 असून 50 टक्के म्हणजे 100 विद्यार्थी नियमित वाचक आहेत. ह्या शाळेच्या ग्रंथालयात 5000 पुस्तके आहेत. शाळेतील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी फार कल्पकतेने नानाविध प्रयोग केले आहेत.
'श्यामची आई' ह्या पुस्तकापलीकडे अनेकांना साने गुरुजींच्या इतर पुस्तकांची नावेसुद्धा माहीत नसतात. साने गुरुजींनी 113 पुस्तके लिहिली आहेत, हे फारच कमी लोकांना माहीत असते. अनेक शाळांतून विद्यार्थ्यांना साने गुरुजींची पुस्तके वाचायला सांगितले जाते, पण ती पुस्तके कुणी सहजासहजी उपलब्ध करून देत नाही. संजय साबळे यांनी एका हितचिंतकाकडून साने गुरुजींच्या सर्व पुस्तकांचा संच शाळेसाठी मागवून घेतला.

ग्रामीण भागात एप्रिलमध्ये द्वितीय सत्र परीक्षा संपली, की विद्यार्थी मोकळे होतात. त्यांना शहरातल्यासारख्या जीव रमवायला जागा नसतात. त्यामुळे विद्यार्थी उन्हाळाभर बंधमुक्त भटकत राहतात. शेताशिवारात जातात. विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याचा कार्यक्रम शिक्षकांकडेही नसतो आणि पालकांकडेही. एकदा परीक्षा घेतली, की शाळेची जबाबदारी संपली! सामान्यत: विद्यार्थ्यांचे हे दोन महिने निरर्थक जातात. ऐपतदार पालक आपल्या पाल्यांना शहरात नेऊन 'क्लास' नावाच्या कोंडवाड्यात अडकवून टाकतात, पण उमलत्या वयातील मुलामुलींसाठी विचारप्रवर्तक आणि आनंददायी कार्यक्रम कोणाकडेच नसतो.
संजय साबळे यांनी 2013च्या उन्हाळी सुट्टीत 100 विद्यार्थ्यांना साने गुरुजींचे एकेक पुस्तक वाचायला दिले. मुले ही पुस्तके हरवतील का? फाडून टाकतील का? असा प्रश्न साबळे सरांना पडला नाही. मुलांच्या सुट्टीचा सदुपयोग करून घेण्याची ही कल्पना भारीच म्हटली पाहिजे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना साने गुरुजींची पुस्तके दिली. उपक्रम समजावून सांगितला. प्रत्येकाने दिलेले पुस्तक वाचून त्यातील सुविचारांसारखी वाक्ये (अवतरणे) वहीत लिहून काढायची. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांनी आवडीने पुस्तके वाचली. पहिल्या दिवशी वाचलेले पुस्तक आणि सुविचार लिहिलेली वही सरांकडे जमा करायची. अर्थातच मुलामुलींना ही कल्पना खूपच आवडली. सुट्टीनंतर अपेक्षेप्रमाणे वह्या आणि पुस्तके गोळा झाली. 100 विद्यार्थ्यांनी साने गुरुजींची 100 पुस्तके वाचून जवळजवळ 1200 सुवचने लिहून काढली. डेराभर ताक घुसळून सुविचारांचे नवनीत काढण्याचाच हा प्रकार !

'एकटे खाणे पाप आहे' किंवा 'निर्भयता म्हणजे मोक्ष' यांसारखी साने गुरुजींच्या ग्रंथसागरातील सुवचने वाचताना आणि लिहिताना बालकुमारांचे डोळे निश्चितच चमकले असतील. वाचण्याची किंवा लिहिण्याची क्रिया अगदीच यंत्रवत घडत नसते. 'सुख विवेकाने प्राप्त होते' यासारखे साने गुरुजींचे विचार संवेदनशील बाळगोपाळांच्या मनांना नक्कीच स्पर्शून गेले असतील. हळूहळू झिरपत झिरपत ते त्यांच्या जीवनातही उतरतील. अशा प्रकारे साने गुरुजींच्या प्रभावी शब्दांचा परीसस्पर्श 100 विद्यार्थ्यांच्या अंत:करणांना झाला आहे. यातील काही विधाने काहींना जीवनभर साथ देतील, कारण ती त्यांनी 'शोधून' काढली आहेत. छोट्या पुस्तकांत दोनच सुवचने सापडली आहेत, तर मोठ्या पुस्तकांत 20-25 सुवचने सापडली आहेत. जशी ती वहीत उतरली आहेत, तशी ती काळजात उतरली आहेत.
अशा 1200 सुवचनांचे, संजय साबळे यंानी साने गुरुजींच्या निवडक सुविचारांचे 'साने गुरुजी : एक विचार' हे पुस्तक संपादित केले आहे. पुस्तकाचे शीर्षक फारच समर्पक आहे, कारण साने गुरुजी ही केवळ एक व्यक्ती नव्हती. परिपूर्ण माणूस घडविणारे आंदोलन होते. 72 पृष्ठांचे हे वैभवशाली पुस्तक फेब्रुवारी 2014 मध्ये कोल्हापूरच्या अभिनंदन प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकाच्या मुळाशी प्रा.डॉ. श्रीकांत नाईक यांची प्रेरणा आहे. शिवाजी विद्यापीठातील मराठीचे प्रा.डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रस्तावना लिहून ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

हिंदी भाषेत 'आम के आम। गुठलियोंके दाम' अशी एक लोकोक्ती आहे. सरस्वती विद्यालयात संजय साबळे यांनी राबविलेल्या उपक्रमांतून ह्या लोकोक्तीची प्रचीती येते. वाचनसंस्कृतीचा विकास करत असतानाच ओघाओघाने लेखनसंस्कृतीचाही विकास होतो आहे. एकाच प्रयत्नात दुहेरी लाभदायी असा हा उपक्रम आहे. अशावेळी 'केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।' ह्या समर्थांच्या वचनाची प्रचीती येते.

ज्यांना साने गुरुजींची समग्र साहित्यसंपदा वाचायची इच्छा असेल आणि ते शक्य होत नसेल, त्यंानी हे पुस्तक अवश्य वाचावे, कारण वाचनसंस्कृतीची उत्तम परिणती म्हणून आणि लेखनसंस्कृतीचे गोंडस अपत्य म्हणून हे पुस्तक अवतरले आहे. साने गुरुजींच्या विचारांचा सगळा अर्क ह्या पुस्तकात उतरला आहे.
ग्रंथपाल अनिल हिशोबकर यांच्या सहकार्याने संजय साबळे यांनी आणखी एक नावीन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविला. विद्यार्थ्यांनी आठवड्याला एक पुस्तक वाचायचे आणि त्यातील आवडलेली वाक्ये (सुभाषिते, सुवचने, सुविचार, म्हणी, पद्यपंक्ती इ.) वहीत टिपून ठेवायची. एका विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचले, की त्याला एक रुपया रोख बक्षीस! अशाप्रकारे विद्यार्थ्यांना महिनाअखेर प्रोत्साहनपर रोख बक्षिसे मिळू लागली. वाचणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली. शिक्षकाच्या पगारातून हजार पाचशे रुपये खर्च झाले, तरी हजारो रुपयांची ग्रंथसंपदा वाचली गेली. विचार करणाऱ्या शिक्षकाच्या दृष्टीने या गुंतवणुकीपेक्षा शैक्षणिक आणि सामाजिक लाभ अधिक मोठा आहे.

प्रबलनापोटी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद, वि.स. खांडेकर, व.पु. काळे, ना.सी. फडके, मारुती चित्तमपल्ली, पु.ल. देशपांडे, माधवी देसाई, वि.वा. शिरवाडकर, आनंद यादव, चंद्रकुमार नलगे, शिवाजी सावंत, सुनीलकुमार लवटे, मनोज बोरगावकर, नामदेव माळी, सुरेश द्वादशीवार, आप्पासाहेब खोत, गो.ना. मुनघाटे, डॉ. यशवंत पाटणे, प्रवीण दवणे, सुनीता देशपांडे, रणजीत देसाई, वसंत कानेटकर, द.ता. भोसले, मंगेश पाडगावकर, दया पवार, सुरेश भट, विजय चोरमारे इ. ज्येष्ठ-श्रेष्ठ लेखक-कवींची शेकडो पुस्तके वाचली, पचविली आणि त्यातील 'विचारधन' शोधून काढले. ह्या अनमोल अशा विचारधनाचे 'शब्दशिंपल्यातील अक्षरमोती' हे पुस्तक संजय साबळे यांनी संपादित केले आहे. ह्या पुस्तकाला प्रा. पी.सी. पाटील यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी एका ओवीत वेगळ्या अर्थाने 'साहित्य सोनियाचिया खाणी। उघडवी देशियेचिया आक्षोणी' असे म्हटले आहे. खरोखरच साहित्य म्हणजे सोन्याच्या खाणी असतात, याचे प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येते. कालकुंद्रीच्या विद्यार्थ्यांनी साहित्यरूपी सोन्याच्या खाणीतून विचारांचे अनमोल माणिकमोती, जडजवाहीर आणि रत्नमाणके शोधून काढली आहेत.

92 पृष्ठांचे हे देखणे पुस्तक कोल्हापूरच्या अभिनंदन प्रकाशनाने जानेवारी 2017 मध्ये प्रकाशित केले आहे. साहित्यसागराच्या मंथनातून निघालेले हे 'अक्षरमोती' खरोखरच अतिशय पाणीदार आणि म्हणूनच अतिशय अनमोल आहेत. काम करणाऱ्या माणसाला कामाशिवाय करमतच नाही. अशी 'वर्कोहोलिक' माणसे सदासर्वदा कामामध्येच आनंद शोधत असतात. आपल्याकडे शाळेमध्ये वर्षभर विविध 'दिनविशेष' साजरे होत असतात. काही उपक्रमांच्या निमित्ताने शाळा प्रभातफेऱ्या काढत असतात. अशा प्रभातफेरीत विद्यार्थी जनजागृतीसाठी त्या दिवसाला अनुसरून घोषणा देतात किंवा घोषवाक्ये उच्चारतात. काही विद्यार्थ्यांच्या हातात घोषवाक्यांचे लक्षवेधक फलकही असतात. काव्यमय, नाट्यमय, अल्पाक्षरी, आलंकारिक, श्रवणसुलभ आणि परिणामकारक घोषवाक्ये ह्या प्रभातफेरीचे आकर्षण ठरतात. चांगली घोषवाक्ये ओठांवर खेळतात, गळ्यात रुळतात. कल्पकतेअभावी काही घोषवाक्ये निरर्थक आणि निरुपयोगी ठरतात. सगळ्या चळवळींसाठी, अभियानासाठी, उपक्रमांसाठी, प्रकल्पांसाठी, जाणीवजागृतीसाठी प्रभावी घोषवाक्यांची नेहमीच वाणवा जाणवते. ही उणीव भरून काढण्यासाठी ह्या शाळेच्या वाङ्‌मय चर्चा मंडळातर्फे 2017 मध्ये जिल्हास्तरीय घोषवाक्य लेखनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त आणि कार्यप्रवृत्त करण्यात आले.

स्पर्धेत भरघोस बक्षिसे असल्यामुळे जिल्हाभरातून उत्कृष्ट घोषवाक्यांचा अक्षरश: पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी संस्कार, आरोग्य, शिक्षण, स्त्रीभ्रूणहत्याबंदी अर्थात मुलगी वाचवा, पर्यावरण संरक्षण, एड्‌स नियंत्रण, देशभक्ती, ग्रामस्वच्छता, लोकसंख्या नियंत्रण, तंटामुक्ती, रस्तेसुरक्षा, पाणीबचत, साक्षरताप्रसार, भ्रष्टाचार निर्मूलन, व्यसनमुक्ती, रक्तदान, ध्वनिप्रदूषण इ. विषयांवर हजारो बोधप्रद घोषवाक्ये लिहिली. विद्यार्थिशक्तीला चालना दिली, तर ती काय योगदान देऊ शकते याची प्रचीती ह्या स्पर्धेतून आली. सगळ्या चळवळींना आणि अभियानांना ऊर्जा पुरविण्याची क्षमता ह्या घोषवाक्यांमध्ये आहे.
ह्या 1258 घोषवाक्यांचे विषयवार विभागणी करून संजय साबळे यांनी 'विचारांची क्रांती' हे दिमाखदार पुस्तक संपादित केले आहे. ह्या पुस्तकाला डॉ. अनिल गवळी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, पर्यावरण, ग्रामीण विकास, परिवहन इ. सर्वच विभागांना आपल्या कवेत घेण्याचे सामर्थ्य ह्या एका पुस्तकात आहे.

128 पृष्ठांचे हे आशयगर्भ पुस्तक कोल्हापूरच्या अभिनंदन प्रकाशनाने जानेवारी 2017 मध्ये प्रकाशित केले आहे. महाराष्ट्राच्या नकाशात कदाचित कालकुंद्री हे गाव शोधूनही सापडणार नाही, पण मराठी विचारविश्वात ह्या 3 पुस्तकांनी कालकुंद्रीचे नाव अधोरेखित केले आहे. संजय साबळे यांनी ही केवळ तीनच पुस्तके नव्हे, तर विद्यार्थ्यांची अशी एकूण 6 पुस्तके संपादित करून प्रकाशित केली आहेत. ह्या सहाही पुस्तकांमध्ये नावीन्य आहे, कल्पकता आहे आणि विषयांची विविधता आहे.
हे उपक्रम महाराष्ट्रातील इतर शाळा आणि शिक्षकांसाठी अनुसरणीय असे आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News