प्रकाश महेता अडचणीत ; हे प्रकरण चव्हाट्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • विकासकाला झुकते माप दिल्याप्रकरणी लोकायुक्तांचे ताशेरे 
  • प्रकाश महेता अडचणीत​

मुंबई - एम.पी. मिल कंपाउंड प्रकरणात गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी विकासकाला झुकते माप दिल्याप्रकरणी राज्याच्या लोकायुक्‍तांनी त्यांच्यावर ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे. या संदर्भात विरोधकांनी महेता यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना महेता यांनी संबंधित वृत्त फेटाळले आहे. 

‘एसआरए’ प्रकरणात महेता यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत राज्याचे लोकयुक्त एम. एल. तहलियानी यांनी ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात प्रकाश महेतांचा कारभार पारदर्शी नाही, असा लोकायुक्तांचा अहवाल सादर झाल्याची माहिती आहे. तसेच लोकायुक्तांचा हा अहवाल आणि त्यावर राज्य सरकारने केलेली कारवाई हा मुद्दा आगामी पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्‍यता आहे. एम.पी. मिल कंपाउंडच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. 

मात्र या निर्णय प्रक्रियेत आपल्या अधिकारांचा गैरवापर करून विकासकाच्या फायद्यासाठी मंत्रिमहोदयांनी निर्णय घेतल्याचे मतही लोकयुक्तांनी व्यक्त केले आहे. ‘मुख्यमंत्र्यांना याबाबतची कल्पना नव्हती, फाइलवर चुकून तसा शेरा मारण्यात आला,’ अशी कबुली महेता यांनी लोकायुक्तांकडे दिली आहे.

ताडदेवमधील एम.पी. मिल कंपाउंडसह मुंबईतील अन्य ‘एसआरए’ प्रकल्पांना महेता यांनी दिलेली मंजुरी वादग्रस्त ठरली आहे. यात ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण लोकायुक्‍तांकडे सोपविले होते. 

काय आहे प्रकरण? 
मुंबईतील ताडदेवमधल्या एम.पी. मिल कंपाउंड इथल्या ‘एसआरए’ प्रकल्पात एफएसआय गैरव्यवहार केल्याचा आरोप महेता यांच्यावर आहे. ‘एस.डी. कॉर्पोरेशन’ या विकासकाला फायदा देण्यासाठी महेता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी राज्यपालांनी लोकायुक्त चौकशीची परवानगी दिल्यानंतर ‘म्हाडा’, ‘एसआरए’ आणि गृहनिर्माण विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांपुढे हजेरी लावली होती. 

महेतांचे करायचे काय?
एमपी मिलप्रकरणी लोकायुक्तांच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आलेले मंत्री प्रकाश महेता यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी, ‘गृहीतकांच्या आधारावर बातम्या करणे योग्य नव्हे,’ असे सांगितले.

महेताप्रकरणी लोकायुक्त अहवाल व या प्रकरणातील कृती अहवाल (एटीआर) सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात ‘नीटपणे’ मांडेल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी ‘नीट’ शब्दावर दिलेला जोर व त्यांची देहबोली पाहता महेता यांची खुर्ची या वेळी वाचणे कठीण असल्याची चिन्हे दिसत आहेत. आतापावेतो महेता यांचे पद दिल्लीच्या आशीर्वादाने वाचलेले आहे.

 

लोकायुक्‍तांचा अहवाल आल्याची कल्पना नाही. अहवाल आला असेल आणि त्यात माझ्या विरोधात काही लिहिलेले असेल आणि ते खरे असेल तरच यावर मी भाष्य करू शकेन. मात्र, हे वृत्त कुठून आले तेच मला माहिती नाही. 
- प्रकाश महेता, गृहनिर्माणमंत्री 

मुख्यमंत्र्यांनी चौकशीआधीच महेतांना क्‍लीनचिट दिली होती. मात्र चौकशीमुळे आता सत्य समोर आले आहे. ‘एसआरए’ गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी वारंवार विधानसभेत लावून धरली होती. आता मुख्यमंत्र्यांनी महेता यांच्यावर कारवाई करावी. 
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, 
राष्ट्रवादी काँग्रेस

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News