विद्यार्थ्यांना आयुष्य शिकवणारे, मास्तर आणि मास्तरीण बाई...

संदीप काळे
Sunday, 4 August 2019

गोपाल आणि नीता खाडे या शिक्षकजोडप्याचे उपक्रम मी जाणून घेतले. प्रत्येक शिक्षकानं या जोडप्यासारखं वेगळेपण टिकवून ठेवलं तर आणि ते मुलांमध्ये उतरवलं तर गरिबीतून वर येणारा इथला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासानं उभा राहील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेला गाफीलपणाचा डागही पुसला जाईल.
संदीप काळे sandip98868@gmail.com

गोपाल आणि नीता खाडे या शिक्षकजोडप्याचे उपक्रम मी जाणून घेतले. प्रत्येक शिक्षकानं या जोडप्यासारखं वेगळेपण टिकवून ठेवलं तर आणि ते मुलांमध्ये उतरवलं तर गरिबीतून वर येणारा इथला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासानं उभा राहील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेला गाफीलपणाचा डागही पुसला जाईल.

गोपाल आणि नीता खाडे या शिक्षकजोडप्याचे उपक्रम मी जाणून घेतले. प्रत्येक शिक्षकानं या जोडप्यासारखं वेगळेपण टिकवून ठेवलं तर आणि ते मुलांमध्ये उतरवलं तर गरिबीतून वर येणारा इथला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासानं उभा राहील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेला गाफीलपणाचा डागही पुसला जाईल.

पावसाअभावी अमरावतीमधला उकाडा त्या दिवशीही कायम होता. इथं पाऊस म्हणावा तसा अजूनही पडलेला नाही. ऑफिसची कामं आटोपल्यावर मी वाशीमला निघालो होतो. शिक्षणाच्या बाबतीत समृद्ध असलेलं अमरावती आज निसर्गाच्या कोपामुळे अडचणीत सापडल्याचं चित्र अनेकांच्या बोलण्यातून मला जाणवत होतं. रस्त्यानं जात असताना नितीन गडकरी यांचं ‘दूरदृष्टी व्हिजन’ दर दोन किलोमीटरवर जाणवत होतं. महाराष्ट्रात मी खूप ठिकाणी फिरलो; मात्र इथले रस्ते अत्यंत ‘स्मूथ’पणे साथ देत होते अन् हा अनुभव पहिल्यांदाच येत होता. नाहीतर मराठवाडा आणि विदर्भ रस्त्यांच्या बाबतीत पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत २५ वर्षांनी तरी मागं आहेत, हे काही नव्यानं सांगायला नको! अमरावती ते वाशीम हा रस्ता कापत असताना मला आजूबाजूचं - निसर्गानं शाप दिलेलं - चित्र पाहून खूप वाईट वाटत होतं. डोक्‍याला हात लावून बसलेला शेतकरी स्वत:ला फासावर का लटकवून घेतो याचं कारण, मान टाकलेल्या पिकाकडं पाहिलं तर, सहज लक्षात येतं होतं. कारंजाजवळून गाडी धीम्या गतीनं घ्यायला ड्रायव्हरला सांगितलं. निसर्गाचं अनोखं रूप या भागात दिसत होतं. रस्त्याच्या आजूबाजूला नेत्रसुखद हिरवळ आणि त्या हिरवळीवरून लहान मुलं अनवाणी पायांनी शाळेकडं निघाली होती...

थोडंसं पुढं गेल्यावर एका झाडाखाली मुलींचा घोळका बसलेला दिसला. त्यातली एक मुलगी उभं राहून गाणं म्हणत होती आणि तिच्या सर्व मैत्रिणी ते गाणं ऐकत होत्या. तिला दादही मिळत होती...त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून चालला होता. माझी गाडी थांबली आणि मी चालत चालत त्या मुलींकडं निघालो. मी आल्याचं पाहताच त्या मुलीनं तिचं गाणं थांबवलं आणि ती काहीशी लाजून-बुजून खाली बसली. मी म्हणालो : ‘‘बाळ, तुझं गाणं ऐकायला मी इथपर्यंत आलोय आणि मी येताच तू तुझं गाणं थांबवलंस...हे काही बरोबर नाही.’’ तिच्यासोबत असणाऱ्या बाकीच्या मैत्रिणीही काहीशा बिचकल्या.

गाडीतून उतरून कुणी आपल्याशी चांगल्या पद्धतीनं बोलायला येईल, ही अपेक्षा, पायात चप्पल नसलेल्या, अंगात फाटके-तुटके कपडे असलेल्या त्या मुलींना कदाचित नसेल; म्हणून मी त्यांच्याजवळ जाताच त्या शांत झाल्या. मी त्यांच्या जवळ बसलो आणि म्हणालो :‘‘बाळांनो, घाबरू नका. मला खरंच तुमचं गाणं आवडलं म्हणून ते ऐकायला आलोय. तुम्हाला ऐकवायचं नसेल तर ऐकवू नका; पण मला घाबरून तुमचा हसता-खेळता चेहरा असा पडलेला मला नाही आवडणार.’’
मीही थोडा वेळ शांत झालो आणि त्याही शांत होऊन माझ्याकडं पाहत राहिल्या. मी म्हणालो : ‘‘ठीक आहे. मी निघतो आता.’’

मी उठतोय हे पाहून घोळक्‍यातली एक मुलगी म्हणाली : ‘‘अगं, ते दादा एवढं म्हणताहेत तर म्हण ना गाणं, त्यात काय एवढं...’’ तरीही ती मुलगी काही गाणं म्हणेना.
मी म्हणालो :‘‘माझं एक गाणं मी तुम्हाला ऐकवतो.’’
सब के लिए खुला है मंदिर ये हमारा
आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी
या गाण्याचं एक कडवं मी म्हटलं आणि त्यांचा निरोप घेऊन निघणार इतक्‍यात सर्वात अगोदर जी मुलगी गाणं म्हणत होती ती उठून गाणं म्हणायला लागली.
एक मोठा डोंगर
डोंगरावर झाड
हिरवळ बाजूलाच होती
हिरवळ बाजूला

असं ते गाणं! पाचवीला असणारी ती मुलगी कमालीचं गात होती. आपलं खरं टॅलेंट इथं आहे, या विचाराची घंटा माझ्या मनात सतत वाजत होती. मी त्या मुलीला म्हणालो :‘‘तुमच्या वयाचा असताना मीसुद्धा खूप गाणी म्हणायचो. शाळेत माझा नंबर पहिला होता.’’ अशा तऱ्हेनं आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांची आस्थेनं विचारपूस करत होतो. मी कुणीतरी भला माणूस असावो, अशी त्या मुलींची आता खात्री पटली होती.

नीता आणि गोपाल या दोन शिक्षकांची नावं त्या मुली सतत घेत आहेत, हे मला त्या मुलींशी बोलताना जाणवलं.
‘‘त्यांनी आम्हाला शिकवलं...त्यांनी आमच्याकडून करून घेतलं,’’ असं त्या सतत बोलत होत्या. टाकळीची प्रतीक्षा उगले, बेंबळ्याची भावना धुमाळ, खुशाली जोगी, ईश्वरी शेकोकर या सगळ्यांच्या वह्या मी पाहू लागलो. त्यांचं हस्ताक्षर, त्यांच्या कविता, त्यांची गाणी, त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथा वाचून आणि त्या मुलींचं आत्मविश्वासानं बोलणं ऐकून मी अवाक्‌ झालो. त्यांच्या त्या सगळ्या कलेला दाद द्यायला माझ्याकडं शब्द नव्हते. त्यांच्याकडं काहीच नसणं आणि काहीतरी करण्याची प्रचंड ऊर्मी असणं या दोनच गोष्टींमुळे त्यांच्यातली कला ओतप्रोत वाहत होती असं मला वाटलं.

शाळी काही अंतरावरच आहे हे मला या मुलींकडून समजलं. मी त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत शाळेकडं निघालो.
‘आमची शाळा जवळच आहे,’ असं जरी त्या मुलींना सांगितलं असलं तरी तसं काही नव्हतं. शाळा तशी बरीच दूर होती. शाळा गाठेपर्यंत फक्त पायच बोलत होते. शाळेच्या बाहेर एक मोठा बोर्ड दिसला : ‘जि. प. विद्यालय; कामरगाव.’ जिल्हा परिषदेची ही शाळा अत्यंत देखणी होती. अलीकडं जिल्हा परिषदेच्या शाळांची किती वाताहत झाली आहे आणि तिथं प्रवेशाची कशी बोंब असते हे काही नव्यानं सांगायला नको; पण इथं मात्र प्रत्येक वर्गात भरपूर विद्यार्थिसंख्या होती. मुलींच्या बोलण्यात सातत्यानं ज्यांचा उल्लेख आला होता त्या नीता आणि गोपाल या शिक्षकांना भेटायची मला खूप इच्छा होती. मला शाळेपर्यंत घेऊन आलेल्या मुलींनी दुरूनच गोपालसरांचा वर्ग मला दाखवला.

‘ज्या वर्गातून मोठ्यानं आवाज येतोय, तो गोपाल सरांचा वर्ग आहे आणि पलीकडच्या वर्गामध्ये नीता टीचर शिकवतात,’ असं त्या मुलींनी मला सांगितलं आणि त्या आपापल्या वर्गात गायब झाल्या. जिथं गोपालसर शिकवत होते तिथं कवितांचा तास चालला होता. आईचं आणि मुलीचं नातं किती प्रेमळपणाचं असतं आणि त्या नात्याला शास्त्रात आणि पुराणात किती महत्त्व आहे आणि त्याची कारणं कोणती...असे अनेक दाखले गोपालसर विद्यार्थ्यांना देत होते. मी वर्गात जाताच मुलांनी ‘नमस्कार, सर’ म्हणून मोठ्या आवाजात माझं स्वागत केलं. गोपाल सरांना मी माझी ओळख सांगितली. त्यांनी माझं हसून स्वागत केलं. मी जेव्हा जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गेलो आहे तेव्हा तेव्हाचं एक निरीक्षण आहे...‘पत्रकार आले’ असं कळलं की तिथल्या मंडळींची - मग ते शिक्षक असोत की मुख्याध्यापक - धांदल उडून जाते. पत्रकार आले तर आपल्या विरोधात काय लिहितील आणि शासकीय अधिकारी आले की शाळेवर काय कारवाई करतील हीच धास्ती जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना नेहमी असते.

गोपाल खाडे (संपर्कनंबर : ७७९८६९७३६९) हे कामरगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवी ते आठवी या वर्गांना शिकवतात. चौदा वर्षांपासून ते या भागातले विद्यार्थिप्रिय आणि कामरगावच्या शाळेची वेगळी ओळख निर्माण करणारे शिक्षक. नीता तोडकर-खाडे (संपर्कनंबर : ९६०४५८९८९१) या गोपालसरांची पत्नी असून त्याही गोपालसरांइतक्याच विद्यार्थिप्रिय आहेत, हे मला माहिती घेतल्यावर कळलं.

हे दोन्ही शिक्षक वेगळे कलाकार म्हणून विद्यार्थ्यांचा आवडते. दोघंही कवी, लेखक आहेत आणि बाबा आमटे यांच्या सामाजिक तालमीत तयार झालेले आहेत. गोपालसर ज्या वर्गांवर शिकवत होते तिथल्या मुलांना मी खूप प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची मला मिळालेली उत्तरं ऐकून मी थक्क झालो. त्या वर्गातही अनेक कलाकार होते. कुणी पथनाट्यातलं कलाकार होतं, कुणी कवितांमध्ये कलाकार होतं, कुणी जनरल नॉलेजमध्ये कलाकार...! मोत्यासारखं अक्षर आणि सुरेल गळा असणारी ही मुलं. या शाळेत जेवढी मुलं गरिबांची होती तेवढीच श्रीमंतांचीही होती. कामरगाव परिसरात बेंबळा, खिरडा, बांबरडा, ब्राह्मणवाडा, धनज, शिरसोली, पिंपरी अशी २० पेक्षा जास्त खेडी आहेत. या खेड्यांमधले गरीब आणि श्रीमंत पालक याच शाळेत पाल्यांना दाखल करण्यास प्राधान्य देतात. ‘आत्मविश्वास आणि शिक्षणाशिवाय ज्ञान देणारी शाळा’ अशी या शाळेची ओळख आहे ती गोपाल आणि नीता या शिक्षकांमुळेच. गोपालसर मला नीता टीचरच्या वर्गावर घेऊन गेले. त्यांनी माझी ओळख करून दिली. नीता यांच्या वर्गात असणारी मुलंही कलाकारच होती. श्रेया सोळंके, करण खंदारे, कुंदन खंदारे ही मुलं त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग मला सांगत होती. तसे हे सगळे प्रयोग शालेय शिक्षणाच्या पलीकडचे होते. सगळे विषय शेती-मातीशी संबंधित असणारे. मुंबईच्या कॉलेजसारखं ‘मराठी भाषा मंडळ’ इथंही होतं. मुंगी, कावळा, ससे यांसारखे वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांना कविता करण्यासाठी दिले जातात आणि ही सगळी मुलं त्या विषयांवर दहा दहा कविता घेऊन येतात. आहे की नाही अफलातून...? म्हणजे एका विषयावर लागलीच कुणी दहा दहा कविता करत असेल तर त्या विद्यार्थ्याच्या मेंदूला किती जबरदस्त चालना देण्याचं काम इथल्या शिक्षकांनी केलं असेल! मी काही मुलींच्या कवितांच्या वह्या पाहिल्या.
काळ्या काळ्या मातीत
आज म्या सोयाबिन पेरलं
पाण्यानं दिली चाट
सोयाबिन मातीत इरलं
भाव नाही सोयाबिनला
कास्तकार ठार मेला
मोदीदादा तुम्ही हो
भाव द्या ना सोयाबिनला
आठवीत शिकणाऱ्या राणी तुमसरे या मुलीची ही कविता आहे.
सहावीत शिकणाऱ्या श्रेया सोळंके हिच्या कवितेच्या ओळी पाहा.
पाणी नाही विहिरीला
मात्र लाईटबिल येतंय वेळेला
किती उशीर करताय
दुष्काळ जाहीर करायला
फडणवीस घेऊन या
मोदींना महाराष्ट्र फिरायला
कठीण आहे यंदा
सोसायटी फिटायला

अशा जबरदस्त कविता लिहिणाऱ्या मुलींची कल्पनाशक्ती स्तिमित करणारी होती. त्यांच्या आत्मविश्वासाला अनुभवाचं बळ मिळत होतं आणि त्यातून त्यांच्या शब्दांना अलंकार प्राप्त होत होते. गोपाल आणि नीता या शिक्षकजोडप्याचे उपक्रम मी जाणून घेतले.

प्रत्येक शिक्षकानं या जोडप्यासारखं वेगळेपण टिकवून ठेवलं तर आणि ते मुलांमध्ये उतरवलं तर गरिबीतून वर येणारा इथला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासानं उभा राहील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेला गाफीलपणाचा डागही पुसला जाईल.

यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत तशी सगळी मोठी माणसं जिल्हा परिषदेच्याच शाळेची. हल्ली इंग्लिशच्या प्रेमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची विनाकारण वाताहत सुरू आहे. एखाद्या शाळेनं काही वेगळं काम केलं तर कामरगावच्या शाळेसारखं नाव अनेक शाळांचं निघेल. कामरगावच्या शाळेच्या परिसरातही अनेक खासगी शाळा आहेत. तरीसुद्धा श्रीमंत आणि गरीब दोन्ही पालक कामरगावच्याच शाळेला प्राधान्य देतात. याचं कारण, या शाळेनं विद्यार्थी घडवण्याची परंपरा खूप दूरपर्यंत नेली आहे.

गोपाल आणि नीता हे पती-पत्नी या शाळेतल्या मुलांना वेगळ्या पद्धतीनं घडवण्याचं काम करत आहेत म्हणून ही शाळा वेगळी आहे. असे शिक्षक त्या त्या शाळांचे खरेखुरे अलंकार असतात!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News