जीवन व्यवस्थापन

सुहास रोमणे
Wednesday, 23 September 2020

जीवन...! आपलं जीवन सुद्धा एक समारंभ आहे. मग एखाद्या समारंभ व्यवस्थापनाप्रमाणे आपण जीवनाचे व्यवस्थापन करू शकलो तर? 

जीवन व्यवस्थापन

जीवन...! आपलं जीवन सुद्धा एक समारंभ आहे. मग एखाद्या समारंभ व्यवस्थापनाप्रमाणे आपण जीवनाचे व्यवस्थापन करू शकलो तर? म्हणजे असं. "समारंभाचे" आयोजन, नियोजन व संयोजन जेवढे व्यवस्थित होईल तेवढा "समारंभ" यशस्वी होतो. खरंतर "समारंभ" व्यवस्थापन ही एक कला आहे. आपण "समारंभ" व्यवस्थापनात "समारंभाचे" नियोजन, संघटन, समन्वय व नियंत्रण करू शकतो. ज्यामुळे आपला "समारंभ" अधिक उत्कृष्ट, दर्जेदार, इतरांसाठी व स्वतः साठीही उत्साहवर्धक व प्रेरणादायी ठरेल.

"समारंभाचा" पहिला टप्पा आहे नियोजन. आपल्याला नियोजनाला "समारंभ" व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू म्हणता येईल. नियोजनामुळे आपल्या "समारंभाला" एक अचूक मार्गदर्शक दिशा मिळते. म्हणजे आपल्या "समारंभाची" एक वाट योजनाच तयार होईल ज्यामुळे आपण आपला "समारंभ" पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडू शकू. या नियोजनात आपल्याला "समारंभाची" उद्दिष्टे आणि उद्दिष्टांनुरूप साधन बघून ठरवूनच नियोजन करावे लागेल. ज्यामुळे ही उदिष्ट साध्य होण्यासाठी हे नियोजन कार्यपद्धतीत ठरू शकेल.

आपण कोणताही "समारंभ" हा लोकांच्या बरोबरच करत असतो.लोकांशिवाय "समारंभ" ही कल्पनाच करता येणार नाही. त्यामुळे "समारंभही" एक संघटित क्रिया ठरते. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामूहिक रित्या अनेकांच्या सहाय्याने ती पूर्णत्वास जात असते. म्हणून उत्कृष्ट संघटन हा कार्यक्षम "समारंभ" व्यवस्थापनाचा पाया ठरतो. आणि असे संघटन हे आपल्या "समारंभाच्या" कार्यपूर्तीसाठी निर्माण केलेली यंत्रणा ठरते. ही यंत्रणा जितकी घट्ट सामंजस्य पूर्ण असेल तितकी कार्यपूर्ती उत्तम साधली जाते.

"समारंभाची" यशस्विता केवळ नियोजन व संघटनेवर अवलंबून नसते. तर "समारंभातील" कार्यातील नियोजन आणि संघटनेतील योग्य समन्वय यावर असते. समन्वय हे "समारंभ" व्यवस्थापनाचे महत्त्वाचे व आव्हानात्मक कार्य आहे. यासाठी आपल्याकडे नेतृत्व कौशल्य असणे आवश्यक आहे. परस्परविरोधी तसेच परस्पर पूरक असणाऱ्या विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्याकडून हवे ते उद्दिष्ट साध्य करणे हे अत्यंत कौशल्याचे कार्य "समारंभ" व्यवस्थापकाला पार पडावे लागते.

नियंत्रण हा व्यवस्थापकीय कार्याचा कणा आहे. चांगला व्यवस्थापक चांगला नियंत्रक असतो. म्हणजे व्यवस्थापकाला योग्य परिस्थिती, योग्य वेळ, योग्य व्यक्ती, योग्य शब्द, योग्य भावना या सगळ्याचं नियंत्रण हे "समारंभ" व्यवस्थापनासाठी खूप गरजेचे असते. जे त्याला करता आलं पाहिजे. तेव्हाच "समारंभ" आपल्या विचारांप्रमाणे तडीस जाऊ शकेल. सिद्ध होऊ शकेल.

आता तुम्ही म्हणाल यात जीवनाचे व्यवस्थापन कुठे आहे? मित्रांनो, "समारंभ" या शब्दाच्या ठिकाणी "जीवन" असा बदल करून वाचाल तर तुम्हाला समजेल की जीवनाचे व्यवस्थापन हे नियोजन, संघटन, समन्वय व नियंत्रण या चतुसूत्री वर कसे स्थिरावला आहे.

थोडक्यात सर्वांगीण विवेकपूर्ण विचारपूर्वक कृती हेच जीवनाच्या व्यवस्थापनाचं मूलभूत सूत्र आहे.

- सुहास विष्णू रोमणे

एमए समाजशास्त्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News