एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्रं; "हा" प्रश्न विचारून केले निशब्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020
  • कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे.
  • या महामारीमुळे उद्योगधंदे, व्यवसायांचे चक्र बिघडल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असून अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. असेच काहीसे हाल हे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे देखील झाले आहेत.

औरंगाबाद :- कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. या महामारीमुळे उद्योगधंदे, व्यवसायांचे चक्र बिघडल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असून अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. असेच काहीसे हाल हे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे देखील झाले आहेत. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी के. एन सुरवसे यांची मुलगी नंदिनी सुरवसे हिने एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबाला अडचणींना सामोरे जावं लागत आहे या विषयीचे पत्रं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री यांना लिहिले आहे. नंदिनी ही सध्या  बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. कोरोनाच्या काळात एसटी महामंडळाच्या सेवेवर परिमाण झाला असून एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नाही त्यांच्या घरची परिस्थिती खूप बिकट होत आहे. एसटी महामंडळ हे अत्यावश्यक सेवेत मोडत असले तरीही शासन एसटीला शासनात विलीन करीत नाही.  शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत असल्याने परिणामी आम्हाला आमचे शिक्षण अर्ध्यात सोडावे लागेल का? असा सवाल एसटी कर्मचाऱ्याची मुलगी नंदिनीने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.  

नंदिनीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या अनेक अडचणींचा उल्लेख केला. नंदिनीने पत्रात म्हंटले की,  मी रा.प कर्मचाऱ्याची मुलगी असून माझ्या वडिलांना कोरोना काळात नियमित वेतन मिळालेले नाही आणि त्यामुळे कुटुंबाचा गाढा हाकणं हे रा.प कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. तसेच आमचे गावाकडे शेतही नाही त्यामुळे आमच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अनेक रा.प कर्मचाऱ्यांनी वेतन नाही म्हणून आत्महत्या केली तर अनेक जण भाजी विकणे, गवंडी काम करणे, मजुरी करणे यासारखी कामे करीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी महिना कमीत कमी १० ते २५ हजारांची गरज असते. परंतु कुटुंबाचा खर्च भागवू शकतील एवढे देखील वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळत नाही. तरी सदर वेतन मिळण्याकरीता शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वळते करून घेतल्यास काहीसा हातभार रा.प कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला लागू शकतो. तेव्हा मरणाच्या दारात उभे असलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आता मायबाप सरकारचं वाचवू शकतो अशी विनंती नंदिनीने पत्राद्वारे केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News