महिलांनो, तुम्हालाही 'हा' त्रास होतोय का?

नेत्वा धुरी
Friday, 22 March 2019

अभिनेत्री सारा अली खान हिने नुकतंच पीसीओडीच्या त्रासाने ती पीडित असल्याचं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. हा आजार नेमका काय आहे, असा प्रश्न तेव्हा कित्येकांच्या मनात आला असेल. महिला, वयात आलेल्या मुलींच्या तोंडात पीसीओडी हा शब्द हल्ली बऱ्याचदा ऐकायला मिळतो. रात्री उशिरापर्यंत केलेली जागरणं, आहाराच्या चुकीच्या पद्धती अशा अनेक चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब केल्यामुळेदेखील हा आजार उद्‌भवू शकतो.

आजकाल कित्येक महिला किंवा मुली या पीसीओडी या आजाराने त्रस्त आहेत. मासिक पाळीत त्रास होत असेल, नियमितता नसेल, तर वयस्कर महिला पीसीओडीचा त्रास असल्याचा अंदाज व्यक्त करतात. हा त्रास म्हणजे नेमकं काय, हे आज आपण पाहूया. वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसीज (polycystic ovarian disease )

‘पीसीओडी’ म्हणजे नेमके काय?
महिलांच्या अंडाशयात पाणी भरलेल्या गाठी तयार होतात. या प्रक्रियेमुळे महिलांच्या अंडाशयात (ओव्हरीजमध्ये) स्त्रीबीज तयार होत नाही. ही प्रक्रिया मासिक पाळीतही अडथळा निर्माण करते.

लक्षणे

  •  मासिक पाळीतील अनियमितता
  •  स्थूलता
  •  अंगावर, चेहऱ्यावर, हनुवटीवर केस येतात.

ही लक्षणे आढळली की त्वरित पीसीओडीची तपासणी करण्याचा सल्ला याबाबत माहिती देताना पालिका रुग्णालयातील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. कांचन मुथा देतात. यात अनेक गैरसमजुती आहेत. मासिक पाळी नियमित न झाल्याने स्थूलता येते, असा समज चुकीचा असल्याचे डॉ. कांचन सांगतात. हार्मोन्स नियंत्रणात नसल्याने मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम होतो. स्थूलता हे पीसीओडीसाठी कारण ठरते. 

‘पीसीओडी’मुळे कर्करोग होत नाही
पीसीओडीचे निदान झाल्यानंतर कित्येकांना संबंधित महिला व मुलींना कर्करोग होण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र याचा वैज्ञानिक संदर्भ नाही. तसेच पीसीओडीमुळे कर्करोग झाल्याचे अजूनपर्यंत आढळूनही आले नसल्याचे डॉ. कांचन स्पष्ट करतात.

‘पीसीओडी’मुळे काय  परिणाम होतो
पीसीओडी झाल्यावर अंडाशयातील गाठी नैसर्गिक गर्भधारणेस अडथळा निर्माण करतात. मात्र स्त्री नैसर्गिकरीत्या गर्भधारण करूच शकत नाही असे नाही. आता आधुनिक संशोधनाच्या बळावर पीसीओडीवर उपचारही उपलब्ध झाले आहेत.

उपाय

  •  वजन नियंत्रणात ठेवणे
  •  नियमित व्यायाम करावा
  • चुकीच्या जीवनशैलीमुळे आजाराला आमंत्रण

मासिक पाळी सुरू झाल्यानंतर त्वरित चौदा-पंधरा वर्षांच्या मुलींमध्ये हा आजार आढळून येत आहे. परीक्षेचा वाढता ताण, मुलींमधील वाढते जंकफूडचे प्रमाण, व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे लहान वयातच पीसीओडीचे निदान होत आहे. दिवसा झोपायचं आणि रात्रीचा वेळ अभ्यासासाठी  किंवा भटकण्यासाठी वापरल्यामुळे झोपेचं वेळापत्रक बिघडतं. त्यात आजकाल चुकीचा अाहार आणि व्यायामाचा अभाव दिसून येतो.  त्यामुळे पीसीओडीला ‘चुकीच्या जीवनशैलीचा आजार’ असेही संबोधले जात आहे.

कसे होतात परिणाम
पटकन तयार होणाऱ्या चविष्ट जंक फूडमुळे शरीरात अतिरिक्त कर्बोदके तयार होतात. ही कर्बोदके स्थूलतेला आमंत्रण देतात. चुकीच्या आहारामुळे कॅल्शियमही शरीरात पुरेसे तयार होत नाहीत.

निदान कसे होते?
पीसीओडीची लक्षणे आढळली की तातडीने अनुभवी स्त्री-रोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करून घ्यावी. निदान झाल्यानंतर औषधोपचारानंतर कालांतराने हा आजार बरा होतो. सकस आहार, वजनावर कायमस्वरूपी नियंत्रण, पुरेशी झोप घेणे आवश्‍यक असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News