चला... पृथ्वीबाहेर फिरायला जाऊ!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ २०२० पासून स्पेस टुरिझम अर्थात अंतराळ पर्यटनाचे नवे द्वार करणार खुले
  • अंतराळातील एक रात्र ३५ हजार डॉलरची

न्यूयॉर्क : पर्यटन म्हटले की सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ती जंगल सफारी, समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तूंची टिपिकल लोकेशन्स, पण भविष्यामध्ये मात्र हे चित्र बदलणार आहे. कारण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ २०२० पासून स्पेस टुरिझम अर्थात अंतराळ पर्यटनाचे नवे द्वार खुले करणार आहे.

‘नासा’ने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा अधिक व्यावसायिक दृष्टीने वापर करण्याचा निर्धार केला असून भविष्यामध्ये हे स्थानक खासगी पर्यटन मोहिमांचे एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. हौशी पर्यटकांना अंतराळ स्थानकावर एका रात्रीसाठी  ३५ हजार अमेरिकी डॉलर मोजावे लागतील. आता नासा प्रथमच अंतराळ स्थानकाचा व्यावसायिक दृष्टीने अधिक प्रभावीपणे वापर करण्याच्या विचारात असून त्याचे मार्केटिंगही तितक्‍याच ताकदीने केले जाणार असल्याचे ‘नासा’चे मुख्य वित्तीय अधिकारी जेफ डेवीट यांनी सांगितले.

नव्या अंतराळ पर्यटन मोहिमेमध्ये अंतराळ स्थानकावरील तीस दिवसांच्या वास्तव्याचा समावेश असून दरवर्षी डझनावारी अंतराळवीर या स्थानकाला भेट देऊ शकतील, असे ‘नासा’कडून सांगण्यात आले. खास या मोहिमेसाठी पृथ्वीच्या कक्षेमध्ये मानवाला घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाची निर्मिती केली जात असून, यामध्ये ‘स्पेस एक्‍स’ कंपनीच्या ‘क्रु ड्रॅगन कॅप्सूल’ आणि ‘बोईंग’च्या ‘स्टारलाइनर’चा समावेश आहे.

महागडी ट्रीप
पर्यटकांना मात्र अंतराळ स्थानकावरील वास्तव्याबरोबरच पाणी, भोजन आणि जीवरक्षक प्रणालीच्या वापरासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतील. यामुळे प्रति रात्र एका अंतराळवीराला ३५ हजार डॉलर एवढा खर्च येईल, असे डेविट यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ज्या अंतराळ स्थानकाचा यासाठी वापर केला जाणार आहे ते ‘नासा’च्या मालकीचे नाही.

अमेरिका आणि रशियाच्या सहकार्याने १९९८ मध्ये ते उभारण्यात आले होते. अन्य देशांनी या संदर्भातील मोहिमांमध्ये सहभाग घेत अंतराळवीरांना अवकाशात पाठविले होते. अमेरिकेतील उद्योजक डेनिस टिटो हे २००१ मध्ये जगातील पहिले अंतराळ पर्यटक ठरले होते. त्यांनी त्यांच्या स्पेस ट्रीपवर दोन कोटी डॉलर खर्च केले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News