जमिनीत पाणी मुरवा...
श्रावणात बहरलेला निसर्ग सर्वांनाच आवडतो. याच काळात महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रीची मोठी मागणी असते. अनेक ठिकाणी बेलाची झाडे ओरबाडली जातात. एक हजार किंवा पाच हजार बेलाची पाने वाहण्याऐवजी एखादे पान प्रातिनिधिक स्वरूपात देवाला अपर्ण करावे. यामुळे बेलाच्या वृक्षांचे संवर्धन होईल. वाढलेले तापमान पाहता आपल्या सर्वांना आणखीन वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पाणी साचणाऱ्या भागात बोअरवेलसारखे खड्डे घेऊन पाणी जमिनीत सोडता येईल. यामुळे सोलापूर परिसरातल्या जमिनीतील पाणीसाठा वाढवता येईल.
- सिद्राम पुराणिक, पर्यावरण अभ्यासक
स्वत:सह प्राण्यांचीही काळजी घ्या...
श्रावण हा धार्मिक, पवित्र महिना म्हणून साजरा होतो. याच काळात दमट आणि ओलसर वातावरण असते. मांसावर बॅक्टेरिया वेगाने वाढतात. रोगराईही वाढलेली असते. म्हणूनच मांसाहरी पदार्थ खाणे टाळले जातात. खाण्यातून विषबाधेचे प्रकारही होऊ शकतात. श्रावणात अनेक प्राण्यांचा प्रजननाचा कालावधी असतो. म्हणून मांसाहार टाळल्यास प्राण्यांची संख्या वाढीस मदत होते. ज्याप्रमाणे या कालावधीत माणसांची पचनक्रिया बिघडते, तशीच प्राण्यांचीही बिघडते. या काळात पाळीव प्राण्यांना लसीकरण करण्यात यावे. वातावरणानुसार त्यांना खाद्य देण्यात यावेत. स्वत:प्रमाणे प्राण्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. शुभांगी ताजणे, पशुवैद्यकीय अधिकारी
कार्बोहायड्रेट पदार्थ टाळा...
धार्मिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे श्रावण महिन्याला महत्त्व आहे. या कालावधीत उत्साही वातावरण असते. श्रावणात योग्य आहार घेणे आवश्यक आहे. पचन संस्था मंदावलेली असते. म्हणूनच श्रावणात अनेकजण उपवास करतात. हिरव्या भाजीपाल्या जास्त खाल्याने बॅक्टेरियामुळे आजारपण येऊ शकतो. काहीजण उपवासाला बटाटे, साबुदाणा यासह इतर कार्बोहायड्रेट पदार्थ जास्त खातात. हे चुकीचे आहे. मांसाहार टाळून हलका आणि पचणारा आहार घेणे आवश्यक आहे. उपवासाच्या नावाखाली रोजचे जेवण कमी करून दुसरे पदार्थ अधिक खाणे टाळावे. फळांचा रस घ्यावा, कोल्ड्रिंक पूर्णपणे बंद करावे.
- नीलिमा हरिसंगम, आहारतज्ज्ञ
निसर्ग संवर्धन हीच पूजा...
यंदाचा उन्हाळा सर्वांसाठीच त्रासदायक होता. उकाड्याने हैराण केले होते. आता श्रावणाला सुरवात होतेय. या कालावधी धार्मिक गोष्टींसोबतच सर्वांनी वृक्षारोपणासाठी पुढे यावे. आम्ही घराच्या परिसरात वृक्षारोपणाला सुरवात केली आहे. श्रावणात एकवेळ देवाची पूजा नाही केली तरी चालेल पण निसर्गाचे संवर्धन करा. यामुळे देवालाही छान वाटेल. आपल्या घराजवळ अनेक ठिकाणी मोकळी जागा असते. त्याठिकाणी भविष्यात होणाऱ्या बांधकामाचा अंदाज घेऊन वृक्षारोपण करावे. अपार्टमेंट आणि कॉलनीमध्ये राहणारी मध्यमवर्गीय मंडळी जास्त कचरा करतात. प्रत्येकाने आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याला रिसायकल करावे.
- दीपक दरगड, पर्यावरणप्रेमी
नागपंचमीला अंधश्रद्धा नको...
श्रावणात नागपंचमीसह विविध सण उत्साहाने साजरे केले जातात. हे सण साजरे करताना कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा ठेवू नये. काही ठिकाणी नागपंचमीला एक महिना आधी साप पकडून त्याचे दात काढले जातात. सुईच्या सहायाने विषग्रंथी काढल्या जातात. नागपंचमीला सापांचे प्रदर्शन केले जाते. त्याला पिण्यासाठी दूध दिले जाते. हे चुकीचे आहे. असे प्रकार करणे कायद्याने गुन्हाही ठरतो. पूर्वी सोलापुरात असे प्रकार घडत होते. आम्ही वन विभागाच्या मदतीने कारवाई केल्याने हे प्रकार थांबले आहेत. पावसाळ्यात बिळात पाणी गेल्याने साप बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असते. साप बाहेर निघाल्यावर त्याला मारू नये. घराजवळ स्वच्छता ठेवावी. शेतकऱ्यांनी सर्पदंश होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
- सुरेश क्षीरसागर, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल
श्रावणात करावे वृक्षारोपण...
निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी श्रावण हा आवडीचा महिना असतो. या कालावधीत वातावरणात गारवा, ओलावा असतो, याच संधीचा उपयोग करून आपण सर्वांनी वृक्षारोपण करावे. मी स्वत: टाकाऊ वस्तूंपासून घराच्या परिसरात बॉटल गार्डन उभारले आहे. शहरातील विविध शाळा, कॉलनीमध्ये जाऊन टाकाऊ वस्तूंपासून गार्डन करायचे हे मी सांगत असतो. यामुळे विद्यार्थ्यांसह मोठ्यांमध्येही सकारात्मक परिणाम होत आहे. चौपाड परिसरात कचराकुंडीच्या ठिकाणीही आम्ही सर्वांनी बाग केली आहे. झाडांना संरक्षण म्हणून स्मशानभूमीत टाकलेल्या बांबूचा वापर करावा.
- सुरेश नकाते, निसर्गप्रेमी ग्रुप