गावाला येऊन कॅलेंजरनुसार एक महिना झाला, मुंबईत असताना कोरोनाचा वाढता आलेख पाहिला आणि गावाला जायचा निर्णय घेतला. गावाला जाऊन घरातून ऑनलाईन काम करायचं असं ठरवलं. पण ते शक्य होईल का ? अशी शंका मनात होती. पण एअरटेल कंपनीचं गावाला ४ जी नेट सुरू असल्याने अद्याप अडचण आलेली नाही. विशेष म्हणजे मुंबईत असताना कधीही नेट पॅक संपला नव्हता. पण गावाला एकदाचा संपला.
सगळचं बंद आहे...आपल्याला घरातून काम करायचं आहे...म्हणून सकाळी लवकर जाऊन माळावर फेरफटका मारायला सुरूवात केली. सुरूवातीला मी एकटाचं होतो. माझ्या आगोदर जाणारे सुध्दा काहीजण होते. पण ते बहुतेक एखाद्या भरतीसाठी ट्राय करत असतील असं माझ्या लक्षात आलं...
त्यानंतर मी ही गोष्ट दोघांना बोललो. त्यांनी लगेच होकार दिला...आम्ही तिघंही चार दिवस कायम माळावर फिरायला जाऊ लागलो. रोज जायचो आणि समोरच्या डोंगराकडे बघत बसायचो. विचार असा असायचा की आपल्याला इतकं वजन घेऊन वरती चढता येईल का ? मीही खंत संतोषला बोलावून दाखविली. तो म्हणाला जाऊ शकतो. बरं ठीक आहे.
संतोषचा एक दिवस सकाळी सव्वापाचच्या सुमारास फोन आला. जाऊ या का ? आलो तयारी करून एवढचं उत्तर दिलं...त्यानंतर संतोषने चंदरला फोन केला. दोघेही घराच्या बाहेर वाट बघत उभे होते. चालत असताना आज आपण डोंगरावरती जाऊ असं ठरलं. ५.३५ ला आम्ही डोंगर चढायला सुरूवात केली. तिघेही न थांबता डोंगरावरती चढलो...वरती गेल्यानंतर टी-शर्ट भिजला इतका घाम आला होता. तिघांनाही दम लागला होता. काहीवेळाने सोंडोली, मालेवाडी, विरळे, कांडवण, कारखाना आणि धनगरवाड्याच्या आठवणी सांगायला सुरूवात झाली.
डोंगराच्यावरती मुस्लिम समाजाचं दैवत आहे, त्याच्या खालच्या बाजूनी मोह-याच्या दिशेने चालायला सुरूवात केली. चालत असताना सस्याची विष्ठा आम्हाला ब-याच ठिकाणी आढळून आली, पुढे गेल्यानंतर दोन ठिकाणी आम्हाला पाण्याचं ठिकाण दिसलं. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. संतोष आम्हाला सांगत होता, की पुर्वी लोक इथं सुध्दा पीकं घेत होती. आम्ही लहान असताना तिथं खेकडी पकडायला जायचो.
चालत असताना चंदरचा आवाज आला...आरआरआर....हे बघ...आम्ही दोघेही दमकलो...पुढे हरणाचं पिल्लू पळत होतं. त्यांच्या मागे दोन गावठी कुत्रे लागले होते. हरण इतक्या फास्ट पळत होतं की, कुत्र्यांना सापडणं किती अवघड आहे, हे आम्ही समजून गेलो. काही क्षणामध्ये हरण दिसायचं बंद झालं. कारण मोह-याकडे असणा-या जंगलामध्ये घुसलं...
पुढे आम्हाला करवंदाच्या दोन जाळ्या दिसल्या...काही करवंद खाली...इथपर्यंत आलो आहोत...तर पवनचक्कीपर्यंत जाऊन येऊ असं तिघांचंही मत तयार झालं. तिघंही पुढे चालत होतो. संतोष आम्हाला जुन्या आठवणी सांगत होता. कुठून कोणाची हद्द आहे हेही सांगत होता. जसं पुढे जाईल तश्या नव्या आठवणी ऐकायला मिळत होत्या. पुढेही दोन पाण्याची ठिकाण दिसली तिथ काहीवेळ थांबून फोटोही काढले.
ऐकून असलेला वाघदरा इथेच आहे असं संतोष म्हणाला...बरं ठीक...गावातली लोकं डोंगरापर्यंत उसाची शेती करतात हे तेव्हा मी पाहिले. काही अंतर चालल्यानंतर वाटेत आम्हाला एक विष्ठा दिसली. ती आत्ताची असल्याची तिघांचीही खात्री झाली. ही विष्ठा वाघाची आहे...यावर दोघांची खात्री झाली होती. तिथून आम्ही आजूबाजूला बघितलं काहीचं नव्हतं. सकाळी ६.१५ झाले होते. आलोय तर पुढे जाऊ यावर तिघंही ठाम होतं. जाताना दोन पाण्याची ठिकाण बघायची राहून गेली होती. येताना बघू असं आमचं ठरलं...
पवन चक्कीच्या जवळ गेल्यानंतर खालच्या बाजूला असलेली चव्हाणवाडी दिसली...तिथं आम्हाला शिकारीला गेलेल्या लोकांच्या काही काठ्या आढळल्या...ते रानडुकराला पकडण्यासाठी किंवा सस्याला पकडण्यासाठी लावलं असावं...त्यातलं एक दांडूक मी हातात घेतलं...पवनचक्कीच्या बाजूला झाडं असल्यानं तिथं छोटे मोठे प्राणी असायला हवेत असं आम्हाला वाटतं होतं.
उन्हाची किरणं डोक्यावर यायच्या आगोदर खाली जाऊ...यामुळे आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. येताना पाण्याची ठिकाण बघू असं ठरल्यानं...आम्ही तिघंही पाण्याच्या ठिकाणी गेलो. तिथं एका बाजूला एक प्राणी लोळून गेल्याचं दिसत होतं. त्याच्या पायाचं ठस्स दिसतात का, हे आम्ही बारकाईने पाहत होतो. तेवढ्यात संतोषनं मला आवाज दिला आरं हे बघ कशाचं पाय आहेत. ते बघितल्यानंतर मी डायरेक्ट आजूबाजूला बघितलं. कारण ते वाघाच्या पायाचे ठस्से होते. आम्ही तिघंही आजूबाजूला बघायला लागलो. कारण १०० मीटरवर आम्हाला विष्ठा आढळली होती. वरच्या बाजूला मोठं जंगलं होतं...त्यात चंदर म्हणाला आता समोर आलं तर काय करायचं...यावर आम्ही तिघांनीही गंभीर हास्य केलं...तिथून पळ काढला...
महेश घोलप
९७०२०६४९५१
gholapmahesh24@gmail.com