माँटेसरी शिक्षक होण्यासाठी जाणून घ्या 'या' गोष्टी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • शालेयपूर्व वयाच्या मुलांना नवे शब्द शिकण्याची खूप उत्सुकता असते. त्यांना पुरेशी समजही असते. शास्त्रीय व तांत्रिक गोष्टीही मुले शिकू शकतात.

माँटेसरी शिक्षकांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मॉंटेसरी शिक्षक होण्यासाठी वेदक (सेन्सिटिव्ह) आणि कारक (ऑपरेटिंग) अध्ययनासोबत सर्वसाधारण ज्ञानात्मक आणि सामाजिक कौशल्ये आवश्यक असतात. 

या सर्वांचा परस्परसंबंध असतो. वाचन व लेखनादी बौद्धिक कार्यासाठी बालकांना वेदक व कारक कौशल्ये संपादन करता येणं गरजेचं आहे. मॉंटेसरी शिक्षकांकडे विशिष्ट कामगिरी असते. पुठ्ठ्यांपासून विविध आकारांची अक्षरे तयार करणे, त्या आधाराने चार वर्षाच्या बालकांना शिकवणे. एखादे अक्षर देऊन त्याचे नाव सांगायचे आणि मुलांना तेच नाव पुन्हा उचलावयास सांगायचे. पुठ्ट्यावर वाळूच्या कागदांनी काढलेली अक्षरे चिटकवणे. बालकांनी त्या अक्षरांवर बोट फिरवायचे व तोंडाने त्यांच्या उच्चार करावा. अक्षराचा आकार, उच्चारणी ओळख व लेखन करण्याची हाताची तयारी या गोष्टी सिद्ध झाल्या म्हणजे बालक आपोआप लिहू लागते. यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. 

बालकाने वाचावयाचे व सूचनेप्रमाणे कृती करावयाची. या पद्धतीच्या आधाराने चार वर्षाची लहान मुले दीड महिन्यातच वाचावयास व लिहावयास शिकल्याचे दिसून आले. 

माँटेसरी अध्यापनाचे वैशिष्ट्ये म्हणजे शाळेच्या वर्गातील नियोजनपूर्ण वातावरण. वर्गातील टापटीप, स्वच्छता आणि सुस्थिरता या अतिशय महत्वाच्या बाबी आहेत. वर्गातील फर्निचरच्या आकारापासून ते त्याच्या रचनेपर्यंत प्रत्येक गोष्ट लहान मूल लक्षात घेऊन आखण्यात यावी.

वर्गामध्ये मुलांच्या हालचालींना स्वातंत्र्य असावे. मुलांनी शिस्तीने वागून साहित्याचा योग्य वापर करावा हे साहित्य योग्यरीत्या हाताळून त्याची मोडतोड होऊ नये, म्हणून मुलांना यासंबंधी पाठ देण्यात यावेत इ. गोष्टी माँटेसरी शिक्षण पद्धतीत महत्वाच्या आहेत.

शालेयपूर्व वयाच्या मुलांना नवे शब्द शिकण्याची खूप उत्सुकता असते. त्यांना पुरेशी समजही असते. शास्त्रीय व तांत्रिक गोष्टीही मुले शिकू शकतात. घरचे वातावरण, त्याच्याशी संबंधित असलेले शब्द आणि वस्तू यांच्या विचार केल्यास मुले भाषा लवकर शिकतात. शालेयपूर्व वयातील मुलांचे भिन्न वर्ग करून नयेत. सर्व मुले एकाच वर्गात ठेवावीत.

मोठ्यांचे पाहून लहान मुले अनुकरणाने शिकतात व लहान मुलांना शिकविण्याची मोठ्या मुलांना संधी मिळते व वर्गातील वातावरण मनोरंजक होते. या सर्वाचा माँटेसरीस प्रत्यय आला व तिने लेखन, वाचन व गणन आनंददायक पद्धतीने व त्वरित शिकविण्यात यश मिळविले. त्यामुळेच या पद्धतीचा विशेष प्रचार झाला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News