जाणून घ्या हंसासनाचे महत्त्व
सरावाने छान जमू लागते. यामध्ये डोक्याच्या मागच्या बाजूपासून टाचेपर्यंत शरीर एका रेषेतच असावे. या आसनात पोटावर दाब येतो. त्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, वात इत्यादी व्याधींवर उपयोगी.
आसनाच्या छायाचित्रात दिसणाऱ्या स्थितीमध्ये शरीर हंसासारखे दिसते, असे मानून हंसासन म्हटले जाते. हे हातावर तोलून करण्याचे तोलात्मक आसन आहे. मयूरासन आपल्याला माहीत आहे. ते उत्तम जमवण्यासाठी हंसासनाचा सराव प्रथम करावा. ज्यांना पोटाचा काही विकार, व्याधी आहे किंवा शल्यकर्मे आली आहेत, त्यांनी शक्यतो त्या कालावधीमध्ये करू नये.
अथवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. आसनस्थिती घेण्यासाठी प्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर कंबरेतून थोडे पुढे वाकून हाताचे तळवे गुडघ्याच्या पुढे जमिनीवर टेकवावे. हाताचे कोपरे वाकवून पोटात नाभीजवळ येतील याप्रमाणे ठेवावे. आता पायांमध्ये थोडेसे अंतर घेऊन गुडघ्यावर यावे. दोन्ही कोपरे वाकलेले असून, पोटात रुतवण्याचा प्रयत्न करावा.
हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यांतून ताठ करावे. पाय जुळलेले व एका रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करावा. आसन पूर्ण झाल्यावर शरीराची ताठ तिरपी अवस्था दिसते. शरीराचे वजन बऱ्यापैकी हातावरच तोलले जाते. श्वसन संथ सुरू असावे. आसन सावकाश करावे व उलटक्रमाने सावकाश सोडावे.
सरावाने छान जमू लागते. यामध्ये डोक्याच्या मागच्या बाजूपासून टाचेपर्यंत शरीर एका रेषेतच असावे. या आसनात पोटावर दाब येतो. त्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, वात इत्यादी व्याधींवर उपयोगी. पचन संस्थेशी कार्यक्षमता वाढते. हाताचे स्नायूही सुदृढ होण्यास मदत होते.