बाष्पके व पाईपिंगच्या आरेखन मान्यतेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

महाराष्ट्र हे बाष्पके व इतर संलग्न यंत्रणेच्या निर्मितीत अग्रेसर आहे. बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती/उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करणे गरजेचे असते.

मुंबई:  महाराष्ट्र हे बाष्पके व इतर संलग्न यंत्रणेच्या निर्मितीत अग्रेसर आहे. बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती/उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करणे गरजेचे असते. देशभरासह राज्यात कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे बाष्पके संचालनालयाला सेवा प्रदान करण्यात अडचणी येत होत्या. याच पार्श्‍वभूमीवर बाष्पके संचालनालयद्वारे बाष्पके व पाईपिंगच्या आरेखन मान्यतेसाठी www.mahaboiler.com या पोर्टलवर ऑनलाईन सुविधा सुरू केली. आज या सेवेचा शुभारंभ कामगार तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कामगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार बाष्पके संचालक धवल अंतापूरकर यांनी पुढाकार घेऊन बाष्पक संचालनालयाद्वारे बाष्पके व पाईपिंगच्या आरेखन मान्यतेसाठी "www.mahaboiler.com" या पोर्टलवर ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे.

या पोर्टलचा मुख्य उद्देश हा कोविड -19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमध्ये उद्योगस्नेही भूमिका ठेवत राज्याच्या व्यवसाय सुलभता धोरणाच्या अनुषंगाने राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावावा, असा आहे. या ऑनलाईन सेवेमुळे उद्योजकांचा वेळ, पैसा, शारीरिक व मानसिक त्रास कमी होणार असल्याने अधिकाधिक उद्योजकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.

वांद्रे येथील कामगार भवन येथील आयोजित कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कामगार विभागाचे सह सचिव शशांक साठे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरंगम हे सुद्धा उपस्थित होते.

कोविड -19 संकटामुळे उदभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राने पुढाकार घेऊन भारतात पहिल्यांदाच सर्व बाष्पकांना 15 जूनपर्यंत अविरतपणे सुरू ठेवण्यासंबंधी निर्णय घेतला होता व प्रमाणीकरणातून सूट देण्यात आली होती. या निर्णयामुळे सदर सर्व उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही दिले योगदान
बाष्पके संचालनालयामार्फत नुकताच "बॉयलर इंडिया 2020' हा चर्चासत्रे व प्रदर्शनी असा कार्यक्रम वाशी येथील सिडको येथे आयोजित करण्यात आला होता. या चर्चासत्रामध्ये बाष्पक क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी बाष्पक संबंधित विविध विषयांवर व्याख्याने दिली होती. महाराष्ट्रात व देशातील कोव्हिड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर समाजासाठी आपले सुद्धा काही देणे लागते या हेतूने देश-विदेशातील बाष्पक क्षेत्रातील या तज्ज्ञांनी 2 लाख 10 हजार असे संपूर्ण मानधन, तसेच बाष्पके संचालनालयाच्या 21 अधिकारी यांनी 3 लाख रुपये असे एकूण 5 लाख 10 हजार रुपये "मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19' ला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News