औरंगाबाद - बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक व्याधीबरोबरच ताणतणाव वाढले आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होत आहे; मात्र त्यावर योग हा एक उत्तम उपाय आहे. योग ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्लीच आहे. योग ही नियमित करण्याची प्रक्रिया असून, योगाला आपली जीवनशैली बनविल्यास आपण अगदी चोवीस तास शारीरिक, मानसिक, बौद्धिक वैचारिक आणि भावनिक अशा विविध पातळीवर संतुलित राहू शकतो.
सर्वांसाठी योगा
वय वर्षे सहा ते १३ या वयोगटातील योगसाधना साधारणतः १५ ते २० मिनिटे केली जाते. वय वर्षे तेरा ते अठरादरम्यान ३० मिनिटे केली जाते आणि २० वर्षांनंतर कमीत कमी ४५ मिनिटे ते एक तास योगसाधनेचा कालावधी मानला गेला आहे.
तणावापासून मुक्ती
नियमित योगा केल्याने मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून तुम्ही जर प्राणायाम आणि मेडिटेशन करीत असाल, तर पूर्ण दिवस तुम्हाला नक्कीच आनंद आणि उत्साही वाटेल.
वृद्धापकाळाच्या समस्यांसाठी
मनुष्याला तारुण्यात प्रकृतीही साथ देत असते; मात्र जसजसे वय वाढू लागते तसतसे शरीरावर मर्यादा येतात; पण तुम्ही सुरवातीपासूनच योगा करीत असाल तर, वृद्धापकाळात आरोग्याच्या तक्रारी कमी होतात.
शरीरातील साखर नियंत्रण
आजकाल कमी वयातही मधुमेहाची लागण झालेले अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. शरीरातील इन्शुलीनची निर्मिती होण्याचे प्रमाण घटले, की शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा वेळी हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
वजन नियंत्रणासाठी
वाढता स्थूलपणा हा कार्यक्षमतेवर मर्यादा घालतो आणि अनेक आजारांनाही निमंत्रण देतो. म्हणून नियमित योगा करणाऱ्यांच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी, वाढत्या शारीरिक वजनाला मर्यादा येतात.
रक्ताभिसरण होते चांगले
योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांना चांगला व्यायाम मिळतो. परिणामी, शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. योगामुळे श्वासोच्छ्वास योग्य पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण गतिमान होते.
योगसाधना ही प्राचीन ऋषी-मुनींनी दिलेली अनमोल देणगी आहे. योग या शब्दाचा अर्थ जोडणे आहे. मानवाला निसर्गाशी जोडण्याची कला म्हणजे योग होय. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात योगाचा समावेश करून जीवन समृद्ध केले पाहिजे. - संदेशकुमार शिंदे, योग प्रशिक्षक व आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक
बदलत्या जीवनशैलीत योगाला अधिक महत्त्व आले आहे. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. नियमित योग केल्याने शारीरिक व मानसिक त्रासांपासून दूर राहता येते. अत्यंत सोपा आणि फायदेशीर खात्रीलायक उपाय म्हणजे योग होय. - गंगाप्रसाद खरात, योग प्रशिक्षक