भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ. गणेश देवी

रसिका जाधव
Saturday, 27 June 2020

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे कै. डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेच्या २४ व्या व्याख्यानाचे पुष्प जेष्ठ भाषातज्ञ आणि विद्वान साहित्यिक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी गुंफले.

ठाणे :- ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे कै. डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेच्या २४ व्या व्याख्यानाचे पुष्प जेष्ठ भाषातज्ञ आणि विद्वान साहित्यिक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी गुंफले. "भारतातील भाषांची विविधता व लोकशाही" या विषयावर हे व्याख्यान झाले. कै. डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या जन्मशताब्दी प्रित्यर्थ सुरू झालेली ही व्याख्यानमाला म्हणजे ठाण्यातील संस्कृतीक अवकाशाची ओळख आहे. 

भाषा रिसर्च फाउंडेशन, आदिवासी अकॅडमी तसेच पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थात्मक कामातून सर्वांना परिचित असलेले डॉ. गणेश देवी हे भाषांच्या संवर्धनाचे काम करतात.  त्यांना त्यांच्या "आफ्टर  आम्नजिया" या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच सार्क रायटर्स फाउंडेशन अवॉर्ड,  प्रिन्स क्लास अवॉर्ड आणि दुर्गा भागवत स्मृती पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. 

व्याख्यानाच्या सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक म्हणाल्या की, प्रत्येक जण आपल्या परीने विश्वामित्र सारखी प्रतिसृष्टी निर्माण करत असतो. भाषेकडे पाहण्याची डोळस दृष्टी वृद्धिंगत होण्याची गरज डॉ. नाईक यांनी अधोरेखित केली. त्यांनी डॉ. गणेश देवी यांच्या कामाचा उल्लेख करत जमिनीवर राहून काम करण्याचे महत्त्व सांगितले. क्रियाशील राहून विद्वत्तेच्या आणि ज्ञानदानाच्या कामात हिरीरीने भाग शिक्षण क्षेत्रातील लोकांनी घ्यावा असा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी डॉ. गणेश देवी यांच्या कार्याची सविस्तर ओळख करून दिली. 

डॉ. गणेश देवी आपल्या व्याख्यानात म्हणाले की, समाजाला पर्यावरणाच्या ऱ्हासाची आता जाणीव झाली आहे. मात्र तशीच जाणीव भाषेच्या बाबतीतही करून द्यावी लागेल. येत्या दोनशे वर्षात सर्व भाषा नष्ट होतील असे ते म्हणाले. पुढील तीस ते चाळीस वर्षात जगातील सहा हजार पैकी चार हजार भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असून भारतातील सहाशे भाषांचा त्यात समावेश आहे. भाषा नष्ट झाल्यावर एक अत्यंत महत्त्वाचा वैचारिक संचिताचा ऐवज नष्ट होतो. विशेष करून सध्याच्या पिढीला बोली भाषा आणि मातृभाषांचे संवर्धन करण्याची गरज आहे. एखाद्या देशाची संस्कृती आणि चिंतन याचा एकत्रित अविष्कार म्हणजे ती भाषा असते. मात्र  इंग्रजी सारख्या भाषांचे आक्रमण भारतीय भाषांवर होऊन त्या आक्रसत चालले आहेत. त्यासोबतच भारतात असलेल्या अनेक बोलीभाषा आणि त्या भाषांमधून प्रकट होणारे सांस्कृतिक संचित आपण जपले पाहिजे असे डॉ. गणेश देवी म्हणाले. पूर्वी एखाद्या पिढीचे सांस्कृतिक संचित हे ग्रंथालय व संस्थात्मक पायाभरणी यातून पुढच्या पिढीत हस्तांतरित होत होते. मात्र स्मृती साठवण्याचे महत्त्वाचे कार्य आपण कंप्यूटर आणि मशीन ला दिले आहे. त्यामुळे भाषा विरहित समाजाची निर्मिती होईल की काय असा धोका त्यांनी व्यक्त केला. 

भारतीय सिद्धांत व पाश्चात्य विचार परंपरा यांचा साकल्याने अभ्यास करून तौलनिक अभ्यास करण्याची गरज डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली. भाषा साहित्य व मानव्यविद्या शाखांमध्ये होणारे संशोधन हे या दर्जाचे असावे असे ते म्हणाले. व्यक्तीने कुठल्या एका भाषेचा अभिनिवेश न ठेवता अधिकाधिक भाषा अवगत करण्यासाठी धडपड केली पाहिजे. कारण प्रत्येक नवी भाषा हा एक नवी सांस्कृतिक अवकाश दाखवणारा महत्त्वाचा बिंदू असतो. आपले चित्त व सभोवताली असलेल्या विश्वाला जोडणारा एकमेव सेतु म्हणजे भाषा आहे असे महत्त्वाचे विधान डॉ. गणेश देवी यांनी केले. सभोवतालच्या परिस्थिती ची उकल आपणास भाषेच्या माध्यमातून होते त्यामुळे भाषेचे संवर्धन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मातृभाषेत दिलेले शिक्षण हे अधिक परिणामकारक असते व त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे डॉ देवी म्हणाले.

या व्याख्यानमालेचे संयोजन वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागाचे समन्वयक डॉ. महेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पुरूषोत्तम धर्माधिकारी यांनी केले. तसेच तांत्रिक सहाय्य प्रा. प्राची नितनवरे आणि प्रा मानसी जंगम यांनी केले. हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला. तसेच याचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करण्यात आले.  या व्याख्यानास विद्यार्थी संशोधक आणि प्राध्यापकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News