लखनवी रुबाब काही औरच...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

लखनवी किंवा चिकनकारी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती, मलमल, सुती कपड्यावर केलेला सुंदर कशिदा किंवा जाल. फिक्कट रंगांमध्ये असलेल्या लखनवीचा रुबाब काही औरच...

लखनवी किंवा चिकनकारी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती, मलमल, सुती कपड्यावर केलेला सुंदर कशिदा किंवा जाल. फिक्कट रंगांमध्ये असलेल्या लखनवीचा रुबाब काही औरच... तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच लखनवी आवडते ती तिच्या नजाकतीमुळे. मोगलाई पद्धतीच्या सुंदर नक्षीकामामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या लखनवीचे आता ‘फ्युजन‘ स्वरूपही बाजारात उपलब्ध होत आहे. 

लखनवीमध्ये पूर्वी केवळ साडी, सलवार सूट आणि पुरुषांसाठी कुर्ता-पजामा उपलब्ध होता. आता मात्र लखनवीचा प्रवास कलीदारकडून ए लाईन कुर्ती, अनारकली, क्रॉप टॉपच्या दिशेने होताना दिसतो. त्याशिवाय पलाझो, सिगरेट पॅन्ट, लेगिंगज, शरारा, गरारा, स्ट्रेचेबल पॅन्ट यावरही कशिदा पहायला मिळतो. कॉटन किंवा सुती कपड्याबरोबरच जॉर्जेट, विसकोस जॉर्जेट, चंदेरी, टसर व प्रिंटेड फॅब्रिकमध्येही लखनवी उपलब्ध होत आहेत. 

सध्या चलतीत असलेल्या गोटा पट्टी वर्कबरोबर लखनवीचे फ्युजन उठून दिसते. लग्नसराई किंवा इतर पार्टीवेअर ड्रेसमध्ये हे कॉम्बिनेशन बऱ्याचदा दिसून येते. डिसेंट लुकमुळे ऑफिस वेअरसाठीही बऱ्याचदा लखनवीची निवड होते. शिवाय बॉलीवूडमधल्या जान्हवी कपूर, सारा खान यांसारख्या नव्या पिढीतल्या अभिनेत्रीचे लखनवी प्रेम पाहता सध्या मुलींमध्येही लखनवीची क्रेझ वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात २० टक्‍क्‍यांनी लखनवीची मागणी वाढली असल्याचे सांगितले जाते. ‘जुने ते सोने’ असे म्हटले जाते; ते खरेच आहे.
 
परदेशातही मागणी
लखनवीला भारतात जशी मोठी मागणी आहे तशीच परदेशातही आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथे एकूण उत्पादनातील जवळपास १५ टक्के लखनवी निर्यात केले जातात. आपल्याकडे जसे कॉटनबरोबर जॉर्जेटमधील लखनवी अधिक वापरले जातात. तसे परदेशात होत नाही. परदेशात केवळ मलमलमधल्याच लखनवीला मागणी आहे. मात्र आपल्याकडच्या आणि निर्यात होणाऱ्या लखनवीच्या नक्षीकामात खूप फरक असतो. निर्यात होणाऱ्या लखनवीतील नक्षीकाम खूपच कोरीव, नाजूक असते. नक्षीकामात कुठलेच फ्युजन तेथे चालत नाही. फक्त मुगलाई नक्षीकामाला पसंती दिली जाते. 

नक्षीकामाचे मोल अधिक
लखनवीत बिजली, घास पत्ती, चना पत्ती, किल अशा प्रकारचे टाके आहेत. एक कपड्यावर नक्षीकाम पूर्ण करण्यासाठी जवळपास ६ ते ७ महिने लागतात. कमी डिझाईन असेल तर ती महिनाभरातही पूर्ण होते. हे नक्षीकाम हातानेच केले जात असल्याने लखनवीच्या किमतीही अधिक आहेत. मुगलाई बारीक नक्षीकाम असलेल्या साड्या, ड्रेस मटेरिअल अगदी तीस हजारापासून ७० ते ८० हजारापर्यंत उपलब्ध आहेत. जॉर्जेटमधील लखनवी जास्त महाग असतात. साध्या कुर्ती वा मशीनने काम केलेल्या कुर्ती तीनशेपासून हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News