असं करा कुर्मासन...
बैठकस्थितीतील हे पुढील आसन आहे. कूर्म म्हणजे कासव. या आसनाची स्थिती कासवाप्रमाणे दिसत असल्यामुळे त्याला कुर्मासन म्हणतात. हे सोपे आसन आहे. प्रथम भद्रासनाचा सराव करावा.
बैठकस्थितीतील हे पुढील आसन आहे. कूर्म म्हणजे कासव. या आसनाची स्थिती कासवाप्रमाणे दिसत असल्यामुळे त्याला कुर्मासन म्हणतात. हे सोपे आसन आहे. प्रथम भद्रासनाचा सराव करावा. भद्रासन व्यवस्थित जमू लागल्यावर कुर्मासनाचा सराव करावा. त्यासाठी, प्रथम भद्रासनमध्ये बसावे. त्यानंतर डावा हात डाव्या पायाखालून घेऊन डावे पाऊल पकडावे, तसेच उजवा हात डाव्याप्रमाणेच उजव्या पायाखालून घेऊन उजवे पाऊल धरावे.
हळूहळू श्वास सोडत कंबरेतून पुढे वाकावे. पाऊल किंवा पावलापुढे जमिनीला कपाळ टेकविण्याचा प्रयत्न करावा. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसनस्थिती करण्याचा प्रयत्न करावा. श्वसन संथ सुरू असावे. शक्य असले तितका वेळ आसनामध्ये स्थिर राहावे. त्यानंतर, आसन सोडताना सावकाश उलटक्रमाने सोडावे. या आसनाच्या सरावाने पाठ व कंबरेच्या स्नायूंची त्याचप्रमाणे मांडीच्या स्नायूंचीही लवचिकता वाढते.
पाठीला ताण बसतो. पोटावर दाब येतो. खांदे व दंडाच्या स्नायूंनाही ताण येऊन तेथील कार्यक्षमता वाढते. खूप वेळ बसून किंवा एकाच जागी खूप वेळ उभ्याने काम करून पाठीला रग लागते किंवा पायांना ताण येतो. तो ताण या आसनाच्या सरावाने कमी होतो. परंतु, स्पाँडिलायसिस, शल्यकर्म, गुडघ्याचे दुखणे आदी प्रकारचे त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये. ते करायचेच असल्यास योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.