कोवळा श्रावणबाळ

संदीप काळे
Sunday, 21 June 2020

विठ्ठल हुशार होता. आपल्यावर, कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती त्याला दिसत होती. त्याच्याही मनात दुःख होतंच; पण दुःख करत बसलं तर उद्याचं काय, आपलं काय, आपल्या आजी-आजोबांचं काय हे त्याला वयाच्या बाराव्या वर्षी, कोवळ्या वयातही, कळत होतं. अशी वेळ कुणावरही येऊ नये; पण ती या कुटुंबावर आली होती. आई-वडिलांचे चांगले संस्कार आणि व्यवसायाचा दृष्टिकोन मनात बाळगून विठ्ठल आजी-आजोबांची काठी बनून, आपलं बालपण बाजूला ठेवून काम करत होता...

कोकणचं सौंदर्य चारही बाजूंनी सारखंच आहे. नीरव शांतता आणि देखणं रूप. एकदा कोकणात जाऊन आलेला माणूस पुनःपुन्हा कोकणात जाण्याची आस बाळगून असतो. तशी संधी शोधत असतो. माझंही तसंच झालं. अलीकडच्या काळात दोन महिन्यांत तीन वेळा माझं कोकणात जाणं झालं. कोकण समजून घेण्यापेक्षा मनावर कोरून घ्यायचं असतं! त्या दिवशी मी हर्णे बीचवर होतो. हर्णे बिच पार करून पलीकडे हर्णैचा किल्ला बघायला मी आत गेलो. या किल्ल्याचं एक वेगळंच सौंदर्य आहे. पडझड झालेल्या या किल्ल्याला इतिहासाच्या सगळ्या पाऊलखुणा चिकटलेल्या आहेत. सगळा किल्ला पाहायला किमान तासभर लागला. या किल्ल्यानं एकेकाळी तलवारींचा खणखणाट पाहिला असेल; पण आज त्या किल्ल्यात वटवाघळांचं बस्तान आहे. ज्यांची इतिहासावर श्रद्धा आहे आणि ज्यांना दगडांची भाषा कळते, आवडते अशीच माणसं या किल्ल्याला भेट देत असावीत. बाकी, स्थानिक आणि सरकारी पातळीवर हे सौंदर्य छान सजून दिसावं यासाठी काहीही केलं जात नाही हे सत्य आहेच. किल्ल्याच्या दगडांवर कोरलेले शिलालेख या किल्ल्याची महानता सांगत होते. शत्रूपासून संरक्षण आणि बाराही महिने किल्ल्यातला माणूस कायम सुरक्षित राहावा या दृष्टीनं या किल्ल्याची निर्मिती झाली. अशा पद्धतीचे किल्ले निर्माण करायचे, तेही दगडात, हे शास्त्र आजच्या आधुनिक काळातही विकसित नाही. तरीही इतक्‍या चांगल्या वास्तुनिर्मितीविषयी आम्हाला कुणालाही आत्मीयता वाटत नाही याविषयी दुःख व्यक्त करण्यापलीकडे आपण करू तरी काय शकतो? मी पुन्हा बोटीत बसलो आणि पलीकडे जायला निघालो.
‘‘पलीकडच्या बाजूला खूप नावा दिसत आहेत, लोकांची मोठ्या प्रमाणावर तिकडे ये-जा सुरू आहे, काय आहे नेमकं तिकडे?’’ मी नावाड्याला विचारलं.
तो म्हणाला : ‘‘मच्छी मार्केट!’’

मला काही कळलं नाही; पण कोकणातली ही माणसं मुंबईतल्यासारखी पळापळ करत आहेत, गडबडीत आहेत, हे माझ्यासाठी या दौऱ्यात तसं नवीन होतं.
नावाड्याला मी व्यवस्थित मार्ग विचारून घेतला. नावेतून खाली उतरल्यावर मी त्या ‘मच्छी मार्केट’च्या अर्थात मासळीबाजाराच्या दिशेनं चालू लागलो. जसजसा जवळ जात होतो, तसतसा माशांचा वास वाढत चालला होता. मी नाकाला रुमाल बांधला. रुमाल बांधून मासळीबाजारात गेल्यामुळे सगळेजण माझ्याकडे बघू लागले. आपण काही तरी विचित्र दिसतोय हे लक्षात आल्यावर मी रुमाल काढला. थोडा वेळ वासाचा त्रास झाला; पण दहा मिनिटांनी त्या वासाची सवयही झाली. हा मासळीबाजार बघण्यासारखा आहे.
तुम्ही मासे खाता की नाही हा भाग वेगळा, तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी हाही प्रश्न नाही. इथला छोटा-मोठा व्यवहार समजून घेण्यात, तो मनात साठवून ठेवण्यात खरी मजा आहे. म्हणजे, किलोनं विकणारा व्यावसायिक आणि ट्रकनं विकणारा व्यावसायिक हे दोघंही इथं आढळतात.
माशांचे किती तरी प्रकार या बाजारात पाहायला मिळतात. मासा किती मोठा असतो हे चित्रपटात वगैरे पाहिलेलं असतं; पण प्रत्यक्षात खूप मोठा मासा मी पहिल्यांदाच पाहत होतो.
मोठमोठ्या जहाजांमधून समुद्रातली मासळी आणण्याचं काम इथं केलं जात होतं. मग ती मोजणं, ती स्वच्छ करणं, माल ट्रकमध्ये भरणं आणि तो माल बाहेरगावी पाठवणं या सगळ्या गडबडीत हा बाजार मग्न होता. रविवारचा दिवस असल्यानं ताजी मासळी खरेदी करण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांकडं ग्राहकांची गर्दी होती.

उन्हाचे चटके लागू नयेत म्हणून छोटीशी छत्री घेऊन दहा-बारा वर्षांचा मुलगा एका कोपऱ्यात मासोळी विकत होता. कपाळाला अष्टगंध, बुक्का, पाणीदार डोळे असं त्याचं रूप होतं.
‘‘घ्या मावशी, ताजी मासोळी आहे...घ्या काका, ताजी मासोळी आहे,’ असं म्हणत तो लोकांना आकर्षित करत होता. सगळ्या गर्दीत मला तोच एकटा निवांत वाटत होता. बाकी, मुंबईच्या लोकलमध्ये निवांत जागा मिळावी यासाठी जशी गर्दी होते तशीच गर्दी मासोळी विकण्यासाठी आणि ती घेण्यासाठी इथं झाली होती. वारा खूप जोरात सुटला होता, त्यामुळे मासळीचा वास वातावरणात आता तसा फारसा रेंगाळत नव्हता. मी त्या मुलाजवळ गेलो आणि त्याला हसत विचारलं : ‘‘काय? आज सुटी वाटतं?’’
त्यानं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं व ‘घ्यायची का मासोळी?’ असं विचारत त्याच्या टोपलीतल्या मासोळीकडे माझं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बाजूला मोठ्या दगडांचा थर होता. त्यावर मी माझी बॅग ठेवली आणि त्याला विचारलं : ‘‘किती वाजेपर्यंत अशी गर्दी असते? अशी गर्दी रोज असते का? तू रोज येतोस का?’’
प्रश्‍नांचा भडिमार झाल्यानं काय बोलावं हे त्याला सुचेना.
मी त्याला एकेक प्रश्न पुन्हा विचारला. आता त्यानं सगळ्या प्रश्‍नांची शांतपणे उत्तरं दिली.
‘कपाळावर लावलेला टिळा छान दिसतोय...चप्पल नवी आहे वाटतं...’ असं त्याला खुलवण्यासाठी मी मधून मधून विचारत होतो; पण तो काही खुलत नव्हता. तिथून निघून इतर काही लोकांशी
बोलून परत निघावं अशा विचारात मी होतो. तितक्‍यात, मासोळी विकून घरी निघालेली एक महिला त्या मुलाजवळ आली आणि तिनं त्याला विचारलं : ‘‘काय झालं होतं रे आईला?’’
तो म्हणाला : ‘‘आजारी होती.’’
‘‘बरं, काही लागलंच तर सांग, मी येते संध्याकाळी घरी,’’ असं सांगून ती महिला निघून गेली.
‘‘ही बाई कोण होती?’’ मी त्या मुलाला विचारलं.
तो म्हणाला : ‘‘माझ्याच गावातली काकू आहे.’’
‘‘काय विचारत होती ती?’’
‘‘माझ्या आईबद्दल.’’
‘‘काय झालं तुझ्या आईला?’’
क्षणभर थांबून तो म्हणाला : ‘‘माझी आई मेली ना.’’
त्याच्या या थेट शब्दांतल्या उत्तरावर काय बोलावं ते मला सुचेना.
दगडांवर ठेवलेली माझी बॅग मी मांडीवर घेतली आणि मी तिथं बसलो. एकेक गिऱ्हाईक येत होतं आणि तो मुलगा मासोळी विकत होता. त्याच्या टोपलीतली मासोळी आता जवळजवळ संपत आली होती. काय बोलावं, कुठून सुरुवात करावी मला काही कळत नव्हतं; पण तरीही मला त्याच्याशी बोलायचं होतं, त्याच्याकडून मासोळीचं ‘मार्केट’ समजून घ्यायचं होतं.
‘‘आता या मासोळ्या संपल्यावर घरी जाणार का...या मासोळ्या तूच जाऊन आणल्यास का...’असं काहीबाही विचारून मी त्याला बोलतं करू पाहत होतो. त्याचा शीण दूर करू पाहत होतो.
‘‘आईला काय झालं होतं...वडील कुठं आहेत...घरी कोण कोण असतं...वडील काय करतात...तू खूप चांगलं काम करतोस...माझा मुलगा नुसता आळशी आहे...’’ असे अनेक प्रश्न विचारत विचारत मी त्याला बऱ्यापैकी खुलवत नेलं. तो बोलायला लागला आणि एकेक पैलू माझ्यासमोर उलगडला जाऊ लागला.
एखाद्याच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवलेलं असतं आणि त्याची त्याला कल्पनाही नसते.

मी ज्या मुलाविषयी सांगत आहे त्याचं नाव विठ्ठल. तो शेजारच्याच हर्णे या गावचा. महिन्याभरापूर्वी एका अपघातात विठ्ठलचे वडील तुकाराम यांचं निधन झालं आणि सात दिवसांपूर्वी त्याची आईही मरण पावली. विठ्ठलचे आई-वडील मोठ्या व्यापाऱ्याकडून मासोळी खरेदी करायचे आणि तिची किरकोळ विक्री करायचे. विठ्ठलच्या वडिलांच्या निधनानंतर आई एकटीच मासोळी विकायची. तिच्याच जिवावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. तिला कर्करोग होता. त्यातच ती गेली. विठ्ठल हा एरवी तसा बोलका मुलगा; पण त्याचं बोलकं आयुष्य या दोन आघातांमुळे उदास होऊन गेलं होतं.
विठ्ठलच्या टोपलीतल्या मासोळ्या संपल्या होत्या. आता तो घरी जाण्याच्या तयारीत होता.
मी त्याला विचारलं : ‘‘तू ज्या भागात राहतोस तिथं कुठं राहायची व्यवस्था आहे का?’’
तो म्हणाला : ‘‘पलीकडच्या बाजूला छोटी छोटी दोन हॉटेलं आहेत. तिथं तुम्हाला राहता येईल.’’
खरं तर माझी राहण्याची व्यवस्था आधीच झालेली होती; पण त्याच्याबरोबर आणखी काही काळ घालवता यावा, त्याच्याशी संवाद सुरू राहावा या उद्देशानं मी त्याला काहीतरी विचारलं आणि त्याच्याशी गप्पा मारत निघालो.
वाटेत भेटणारे ओळखीचे अनेक लोक त्याच्या आई-वडिलांची सहानुभूतिपूर्वक विचारपूस करत होते.
मी विठ्ठलला विचारलं : ‘‘मग आता घरी कोण कोण असतं? नातेवाईक, भाऊ-बहीण?’’
तो म्हणाला : ‘‘आजी आणि आजोबा असतात. मला भाऊ-बहीण कुणी नाही.’’
चालता चालता आम्ही विठ्ठलच्या घराजवळ आलो. त्यानं मला दुरून ती दोन हॉटेलं दाखवली.
मी त्याला विचारलं : ‘‘आजी-आजोबा आहेत का घरी?’’
तो म्हणाला : ‘‘घरीच असतात ते.’’
त्यांना भेटून त्यांच्याशी बोलावं असा विचार माझ्या आला.
विठ्ठल पुन्हा माझ्याकडे शंकेनं पाहू लागला. यांना माझ्या आजी-आजोबांना का भेटायचं असावं अशी शंका त्याला कदाचित आली असावी.
‘‘प्यायला कुठं पाणी मिळेल का आसपास?’’ मी त्याला विचारलं. त्यानं त्या हॉटेलांकडे बोट दाखवलं! मात्र मी तसाच उभा राहिलो. अखेर, पाणी पिण्याच्या निमित्तानं त्यानं मला त्याच्या घरात बोलावलं. दृष्टी नसलेले आजी-आजोबा विठ्ठलचीच वाट बघत होते. मोडक्या-तोडक्‍या घरात विठ्ठलच्या आई-वडिलांच्या फोटोंवर लोंबलेल्या हारानं माझं लक्ष वेधून घेतलं.
मी आजींना विचारलं : ‘‘काय आजी? कशा आहात? तब्येत कशी आहे?’’
आजी बोलण्यापूर्वीच आजोबा म्हणाले : ‘‘कोण?’’
विठ्ठल त्यांना म्हणाला : ‘‘ते मामा आहेत. मुंबईहून आलेत.’’
मी पाणी घेतलं आणि आजींना म्हणालो : ‘‘तुमचा नातू खूपच बोलका आहे.’’
आजी म्हणाल्या : ‘‘काय सांगू बाबा, दिवस दिवस एक मिनिट बी हाताला गावायचा नाही हा पोरगा आणि आता दिवसभर मासोळी विकत बसलेला असतो. बिचाऱ्याचं बालपण कर्मानं हिरावून घेतलंय.’’

अंध आजी-आजोबांना जगण्याचा आधार म्हणून एकटा विठ्ठलच होता. कुणाचा तरी आधार घेतल्याशिवाय चालता न येऊ शकणारे असे आजी-आजोबा. त्यांची सगळी भिस्त आता विठ्ठलवर होती. आज आलेले सगळे पैसे एका छोट्या पेटीत ठेवत विठ्ठलनं कांदा चिरायला घेतला. तो स्वयंपाकाच्या तयारीला लागला आणि मी आजी-आजोबांशी गप्पा मारू लागलो.

मुलगा आणि सून यांना काही दिवसांपूर्वीच गमावलेले ते दोघं नातवासमोर त्यांचं दुःख व्यक्त करू इच्छित नसावेत. तो खचून जाईल, तो खचून गेला तर त्याचं आणि आपलं काय होईल याची त्यांना जाणीव होती. हा सावळा विठ्ठलही एवढ्याशा कोवळ्या वयात आपल्या आजी-आजोबांचा श्रावणबाळ झाला होता. माझी मदतीची भाषा त्याला काहीही कळणार नव्हती आणि मला कुठलंही आश्‍वासन त्याला द्यायचं नव्हतं. नकळत ओघळलेले अश्रू आजी पुसत होत्या आणि त्याच वेळी आजोबांनाही धीर देत होत्या.
विठ्ठलही हुशार होता. त्याला ते सगळं दिसत होतं. त्याच्याही मनात दुःख होतंच; पण दुःख करत बसलं तर उद्याचं काय, आपलं काय, आजी-आजोबांचं काय हे त्याला वयाच्या बाराव्या वर्षी, त्या कोवळ्या वयातही, कळत होतं. अशी वेळ कुणावरही येऊ नये; पण ती या कुटुंबावर आली होती. आई-वडिलांचे चांगले संस्कार आणि व्यवसायाचा दृष्टिकोन मनात बाळगून हा मुलगा आजी-आजोबांची काठी झाला होता. आपलं बालपण बाजूला ठेवून काम करत होता.

विठ्ठलच्या घरून मी बाहेर पडलो आणि परत त्या मासळीबाजारात आलो. तिथून मी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार होतो. मनात आलं, परिस्थितीनं लादलेलं हे ओझं विठ्ठलला या वयात पेलेल का...आणि नाही पेललं तर सांगणार कुणाला आणि करणार काय? आपल्या आई-वडिलांप्रमाणेच तो आजी-आजोबांवरही प्रेम करत होता. आजी-आजोबांनाही विठ्ठलशिवाय कुणीच नव्हतं. या प्रेमाचा शेवट चांगलाच होणार होता. फक्त नियतीनं तो मांडला वेगळ्या धाटणीतून. ही धाटणी दुःखाची होती!

(लेखक सकाळ- यिनबझचे संपादक आहेत संपर्क - ९८९००९८८६८)  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News