जाणून घ्या कणखर कल्याणगडाचा अखंड प्रवास...

सुनील शेडगे, सातारा
Tuesday, 30 July 2019

कल्याणगड हा कोरेगाव तालुक्यातला गिरीदुर्ग. नांदगिरीचा किल्ला म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. आमचे भटकंतीप्रिय मित्र उद्धव पवार हे पूर्वी गडावर जाऊन आलेले. त्यांच्याकडून गडाची माहिती मिळाली होती. त्यामुळं माझ्या दुर्गभेट उपक्रमाच्या दृष्टीनं कल्याणगड हा शब्द खूप आधीपासून मनात जपून ठेवला होता.

रविवार सुट्टीचा दिवस.
बरसणारा पाऊस. कुंद वातावरण. स्पर्शणारा गारवा. एकूणच कल्याणगड मोहिमेसाठी अगदीच साजेसा असाच मोसम.

कल्याणगड हा कोरेगाव तालुक्यातला गिरीदुर्ग. नांदगिरीचा किल्ला म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. आमचे भटकंतीप्रिय मित्र उद्धव पवार हे पूर्वी गडावर जाऊन आलेले. त्यांच्याकडून गडाची माहिती मिळाली होती. त्यामुळं माझ्या दुर्गभेट उपक्रमाच्या दृष्टीनं कल्याणगड हा शब्द खूप आधीपासून मनात जपून ठेवला होता.

रविवार सुट्टीचा दिवस.
बरसणारा पाऊस. कुंद वातावरण. स्पर्शणारा गारवा. एकूणच कल्याणगड मोहिमेसाठी अगदीच साजेसा असाच मोसम.

साताऱ्यातून वाढे फाट्यावरुन आत. 
सुरवातीलाच वेण्णा नदीवरचा पूल.

मग वडूथनजीक कृष्णा नदीवरचा आणखी एक पूल. हा रस्ता सरळ लोणंदकडे जातो. आपण मात्र सातार रोडचा रस्ता धरायचा. रेल्वे क्रॉसिंग ओलांडलं, की डाव्या हाताला आसगाव दिसतं. 

स्वच्छता अभियानात एकेकाळी आसगावनं मोठा लौकिक संपादन केला होता. त्याच्या खाणाखुणा आजही कायम आहेत. विशेषतः सध्याच्या पावसात इथलं वृक्षसंवर्धनाचं काम उठून दिसणारं. गावालगतचा तलाव पाण्यानं भरलेला. आसगावनजीकची पल्लेदार वळणं, टेकड्या छान वाटतात. तोवर आपण सपाटीवर येतो. 

समोर जरंडेश्वरचा डोंगर. सातारारोड हे गाव. सत्यशोधक चळवळीशी हे गाव जोडलेलं. स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्ह्यातला पहिला औद्योगिक प्रकल्प म्हणून कूपर कारखान्याची इथं निर्मिती झाली. इथल्या नांगर अन् इंजिनास त्याकाळी राज्यभर मागणी होती.

सातारा रोडपासून कल्याणगड जेमतेम अंतरावर आहे. नांदगिरी गावापासून गडावर जाणारी पायवाट आहे. अर्थात अलीकडं पवनचक्की प्रकल्पामुळे कच्च्या रस्त्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे दुचाकी वा छोटी वाहने गडावर पोहोचण सोपं बनलं आहे. तरीही पावसामुळं आजची वहिवाटीची ही वाट थोडी बिकटच ठरली खरी.

सुमारे 3500 फूट उंचीवरचा हा दुर्ग.
ताम्रलेखानुसार दुसऱ्या शिलाहार भोज राजानं इ.स. 1178 ते 1209 या कालावधीत तो बांधला असावा. इ.स. 1673 मध्ये छत्रपती शिवरायांनी कल्याणगड जिंकला. शिवकालानंतर पुढं तो पेशव्यांकडं आला. मग 1818 मध्ये ब्रिटीश जनरल प्रिझलरनं तो आपल्या ताब्यात घेतला.

किल्ल्यावर दोन सुस्थितीतले वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे आहेत. अध्येमध्ये दगडी पायऱ्या आहेत. हनुमानाचं मंदिर अन् कल्याणस्वामींची समाधी आहे. गणेशाचं भग्न मंदिर, जुन्या वाड्याचे अवशेषही इथं पहायला मिळतात. किल्ला पाहण्यासाठी तासभर पुरेसा ठरतो.

कल्याणगडावर सर्वाधिक प्रेक्षणीय स्थान म्हणजे इथलं भुयार 
हे भुयार सुमारे तीस मीटर लांब आहे. सध्या आत पाणी अन् काळोख आहे. भुयाराच्या शेवटी नवव्या शतकात घडवलेली पार्श्वनाथांची, पद्मावतीदेवीची अन् दत्तात्रेयाची मूर्ती आहे, मात्र भुयारात जाणं एकट्या - दुकट्याचं काम नाही, हेही तितकंच खरं!

इथून जरंडेश्वर, यवतेश्वर, अजिंक्यतारा, चंदन- वंदनगड, वैराटगड, किन्हईचं यमाई मंदिर ही ठिकाणं दिसतात. दूरवर सातारा शहराचं, त्यापलीकडं उरमोडी धरणाचं दर्शन घडतं. अगदी जवळून भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या हेही इथलं आकर्षणस्थान ठरावं.

सध्या हिरवाईनं नटलेला आसमंत अन् सोबतीला कोसळत्या पाऊसधारा यामुळं आजची कल्याणगडाची सफर मन चिंब करणारी ठरली, हे नक्कीच!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News