ह्युंदाई क्रेटा या एसयूव्हीला मिळालेला प्रतिसाद अद्भुत म्हणावा इतका आहे. ग्राहकांची मानसिकता व बदललेली प्राधान्यता ह्युंदाई कंपनीने योग्य त्या वेळी ओळखून क्रेटा भारतात २०१५ च्या सुमारास सादर केली आणि कंपनीने नवा सेंगमेंट स्वतःसाठी तयार केलाच. शिवाय अन्य कंपन्यांनाही या सेगमेंटची दखल घ्यावी लागली आहे. मारुती सुझुकीने एस क्रॉस या सेगमेंटमध्ये लाँच केली; पण क्रेटाएवढे यश एस क्रॉसला मिळाले नाही. मात्र या सेगमेंटची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन आपणही या सेगमेंटमध्ये असले पाहिजे, असे अनेक कंपन्यांना वाटले. परिणामी, या सेगमेंटमध्ये रेनॉ कॅप्चर २०१७ मध्ये लाँच झाली. आता निस्सान कंपनीनेही या सेगमेंटमध्ये प्रवेश केला असून किक्स ही एसयूव्ही लाँच केली आहे. मात्र अन्य कंपन्यांच्या मॉडेलपासून अनेक गोष्टी शिकून निस्सानने किक्स लाँच केल्याचे स्पष्ट होते. या सेगमेंटचा वाढता ग्राहक लक्षात घेता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या कायमच प्रयत्नशील दिसतात. त्यामुळे स्पर्धेचा फायदा ग्राहकांना उच्च दर्जाची फीचर्स, गुणवत्ता योग्य दरात मिळेल, असे वाटते. किक्स कशी आहे, याविषयी जाणून घेऊया.
डिझाईन
क्रेटाच्या तुलनेत किक्स थोडी रुंदी व लांबीला मोठी आहे. त्यामुळेच ती पाहताक्षणीच पुढील बाजूने मोठी वाटते. कंपनीने फ्रंटग्रील क्रोम फिनिश दिला असून, त्यातून इंग्रजी व्ही अक्षराचा भास येतो. त्याच्या दोन्ही बाजूला एलईडी आरएलएस दिले आहेत. तसेच फ्रंट बॉडी क्लॅडिंगला ड्यूएल टोन असून, फॉग लॅम्पच्या वर क्रोम फिनिश दिला आहे. त्यामुळे आकर्षकता अधिक वाढते. टेलगेटलाही स्माइली लुक दिल्याचा आभास होतो; तसेच नंबर प्लेटच्या वर क्रोमची पट्टी आकर्षित करते. रिअर बॉडी क्लॅडिंगला दिलेला सिल्व्हर ब्लॅक रंग चांगला वाटतो आणि साईड क्लॅडिंगला डोअर स्ट्रीपवरलाही क्रोम फिनिशिंग दिले आहे. तसेच, रुफ रेल्स व ड्युएल टोनमुळे (विशिष्ट मॉडेल) साईड अँगलने कारचा लुक बहरला आहे. त्यामुळेच आपले वाहन वेगळे दिसण्याला पसंती देणाऱ्यांना किक्स नक्कीच आवडेल.
इंटेरियर
पूर्वीच्या तुलनेत आता इंटेरियरही प्रीमियम असावे, अशी ग्राहकांची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळेच कंपन्याही इंटेरिअयरचा लुक चांगला करण्यावर भर देतायेत. त्यामुळेच ड्युएल टोन्ड वा सिंगल ब्लॅक टोन्ड करण्यावर भर दिला जातो. एका भारतीय कंपनीने एलईडी स्क्रीन कारमध्ये आणल्यानंतर बहुतेक सगळ्या कंपन्यांनी कारला प्रीमियम बनवण्यासाठी ॲपल व अँड्रॉइट ऑटो प्लेचे फीचर असणारे म्युझिक प्लेअर द्यायला सुरुवात केली. एसयूव्ही सेगमेंटमध्ये हे फीचर आहे. किक्समध्ये लेदरचा वापर खुबीने केला आहे. त्यामुळे प्रीमियम फील वाढला आहे. ऑटोमॅटिक एसी, रिअर एसी व्हेंट्स, स्टार्ट स्टॉप बटन दिले आहे. तसेच ३६० डिग्री कॅमेरा पहिल्यांदाच एंट्री लेव्हल कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये देण्यात आला आहे. यावरूनच कंपन्यांची स्पर्धा किती वाढली आहे, हे कळेल. हे फीचर लक्झरी कारमध्ये दिले जात होते. किक्समुळे अन्य कंपन्याही हे फीचर सामान्य कारमध्ये देऊ शकतात. निस्सानने एबीएस, ईबीडी, दोन एअरबॅग्सही दिल्या आहेत.
इंजिनची कामगिरी
किक्स दीड लिटरचे पेट्रोल व डिझेल इंजिन पर्यायात उपलब्ध आहे. डिझेल इंजिन सिक्स स्पीडचे; तर पेट्रोल इंजिन फाईव्ह स्पीडचे आहे; पण कंपनीने अजून ऑटोमॅटिक व्हर्जन दिलेले नाही. मात्र स्पर्धा लक्षात घेता ऑटोमॅटिक व्हर्जन लाँच होऊ शकते. कारण, स्पर्धक ठरणाऱ्या एसयूव्हींचे ऑटोमॅटिक व्हर्जन उपलब्ध आहे. गाडीचे एकूण वजन लक्षात घेता इंजिनची ताकद कमी असल्याचे जाणवते. त्यामुळेच पिकअप घेण्यासाठी एक गिअर कमी करावा लागतो. या सेगमेंटमधील मारुतीची एस क्रॉस सर्वांत फ्यूएल एफिशियंट आहे. क्रेटा आणि किक्स यांची फ्यूएल एफिशियन्सी जवळपास सारखीच आहे. सर्वांत कमी सीसी इंजिन एस क्रॉसचे; तर सर्वांत ताकदवान इंजिन क्रेटाचे आहे.
कोणता पर्याय?
एस क्रॉस या सेगमेंटमधील दुसऱ्या क्रमांकाची एसयूव्ही असली तरी किक्समधील फीचर पाहता विक्रीच्या संख्येबाबत ती एस क्रॉसला मागे टाकण्याची क्षमता राखते; पण किक्सच्या टॉप एंड व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर सीटला पॉवर नाही आणि ते मॅन्युअली ॲडजेस्ट करावे लागते. ऑटो डिमिंग आयआरव्हीएम्स, सनरूफही किक्समध्ये नाही; पण त्यामुळे फार मोठा फरक पडत नाही. त्यामुळेच क्रेटाला टक्कर देणारीच किक्स निस्सानने लाँच केल्याचे जाणवते. पण ह्युंदाईचे भारतातील प्रवासी व मारुतीची कॉस्ट ऑफ ओनरशिप लक्षात घेता निस्सानला या सेगमेंटमधील आव्हान तगडे आहे. पण निस्सानचा दर्जा किक्समध्ये बसल्यावर व चालविल्यावर जाणवतो. त्यामुळे या सेंगमेंटमधील गाडी घेण्यापूर्वी एकदा तुलना करा व त्यानंतर पर्याय निवडा.